कुमार गंधर्व म्हटलं की मला हेरॅक्लिटसची आठवण यायची. ”तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकूच शकत नाही; तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरुप बदललेलं असतं” असं हेरॅक्लिटस म्हणे. कुमारांचं तसंच काहीसं होतं. त्यांचा एकदा बागेश्री ऐकला की पुन्हा तो तसाच यायचा नाही. अगदी तीच बंदिश असली तरी! ”टेसूल बन फुले, रंग छाये, भंवर रस लेत फिरत मद भरे” ही कुमारांची बंदिश मी प्रत्यक्ष मैफिलीत कितीतरी वेळा ऐकली असेल. पण प्रत्येक वेळी तिचा बाज काही वेगळाच असायचा. पळसाचं बन फुललंय हे निसर्गचित्र कुमार यात उभं करतात. ”फेर आयी मौरा अंबुवापे” ही त्यातलीच द्रुत बंदिश. ही बंदिश त्यांना क्षिप्रा नदीच्या काठावर सुचली. आंब्याचा मोहोर पुन्हा फुललाय, निसर्गचक्र काही थांबत नाही असं ही बंदिश आपल्याला सांगते. भानुमती या त्यांच्या पहिल्या पत्नीला आंबे खूप आवडायचे. त्यांच्या स्मृतीतूनच ही बंदिश त्यांना स्फुरली असावी. पण गंमत अशी की आंब्याला मोहोर दरवेळी जसा नवा येतो, तशीच ही बंदिश कितीही वेळा ऐकली तरी दरवेळी वेगळी आणि नवीनच वाटायची. दरवेळचा त्यातला ताजेपणा आणि त्यातली टवटवी वेगळीच असायची. त्यांच्या बागेश्रीतल्याच ”सखी मन लागेना” या चीजेवर आणि त्यानंतरच्या ”तान दे रे ना” या तराण्यावर तर आम्ही आयआयटीतली अनेक वर्षं काढली होती. ती 18 मिनिटांची लाँगप्ले रेकॉर्ड मला संपूर्णपणे पाठ होती. ती रेकॉर्डच असल्यामुळे दरवेळी तशीच ऐकू यायची इतकंच. पण तरीही पुन्हा दरवेळी तीच ऐकताना काहीतरी नवं सापडायचं. आणि हे फक्त बागेश्रीचंच नव्हे तर इतरही रागांचं व्हायचं. एकतर अनेक नवनवे राग ते गायचे, अनेक राग स्वत: निर्माण करायचे, त्यात सुंदरसुंदर नव्या बंदिशीही तेच रचायचे आणि त्यातही तोच राग दरवेळी वेगळ्याच तऱ्हेनं सादर करायचा म्हणजे काही चेष्टा नव्हती. ही सर जनशीलता म्हणजे अजबच होती. त्यांनी मध्यलयीला खूपच लोकप्रिय करुन मानाच्या स्थानावर नेऊन बसवलं.
कुमारांची भजनं हा एक अद्वितीय प्रकार असायचा. त्यांची निर्गुणी भजनं म्हणजे तर ग्रेटच. पण याशिवाय, त्रिवेणी, गीतवर्षा यातलीही भजनं सुंदरच होती. मुख्य म्हणजे त्यात आपल्याला लोकसंगीत झकासपैकी त्यातल्या रांगड्या सौंदर्यासह ऐकायला मिळायचं. अनेक रागांची निर्मितीही लोकसंगीतापासूनच झालेली आहे असं त्यांचं ठाम मत होतं. फक्त फरक हा की त्यांनी लोकसंगीत आपल्या घरातल्या वातानुकूलीत खोलीत बसून ऐकलं नाही तर ते मिळवण्यासाठी ते चक्क अनेक आदिवासी पाड्यातून फिरले. अनेक खेडेगावांत त्यांनी बराच काळ भ्रमंती केली. लोक शेतावर, मळ्यावर, जात्यांवर आणि इतर अनेक ठिकाणी काम करताना गात असत. तेव्हा कुमार चक्क झाडामागे लपून ते संगीत कानांत टिपून घ्यायचे. आणि या सगळ्या संगीताचे संस्कार फक्त त्यांच्या भजनांवरच झाले असं नाही तर रागसंगीतावरही झाले. गाणं हे आपल्या दैनंदिन आयुष्याशी, त्यातल्या सुखदु:खांशी, त्यातल्या निसर्गाशी अतूट नात्यानं जोडलेलं आहे हे त्यांच्या गाण्यात घडीघडीला जाणवायचं. आणि म्हणूनच त्यांनी रचलेल्या बंदिशीत नेहमीच फुलं, फळं, बागा, डोंगर, नद्या, जंगलं, भ्रमर, पक्षी, प्राणी हेच जास्त दिसायचे. कित्येकदा या निसर्गात रमणार्या माणसांचं आयुष्यही त्यात डोकवायचं. पायात घुंगरू वाजतंय, सासू-नणंद त्रास देताहेत किंवा प्रियकर परदेशी किंवा दूरदेशी गेलाय वगैरे वर्णनं त्यात फारशी नसायचीच. त्यांच्या बंदिशीही त्यांच्या हसर्या व्यक्तिमत्वासारख्याच असायच्या. एका बाजूनं या निसर्गातलं सौंदर्य, लोकांचा साधेपणा दाखवताना आपल्याला ते या विश्वातली गूढताही कबिरांच्या भजनातून दाखवत. कुमारांनी आयुष्यात इतकी दु:खं झेलली असूनही त्यांनी एवढं प्रसन्न असावं, निसर्गावर आणि माणसावर एवढं प्रेम करावं याचं मला खूपच कौतुक आणि आश्चर्य वाटे. एकेकाळी प्रचंड आजारानं, व्याधींनी ग्रासलं जाणं, जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर उभं असणं, त्यातून कसंबसं वाचणं, त्यात त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागणं, पुन्हा गाता येईल की नाही हे माहीत नसताना मनातच संगीताविषयी खोलवर विचार करणं, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर या सगळ्यातून बाहेर येणं, भानुमतीसारख्या प्रेमळ पत्नीचा मृत्यू झेलणं हे काही सोपं नव्हतं. कदाचित यातूनच हे सूफी संगीत मनात पिंगा घालायला लागलं असेल. ”धुन सुनके मनवा मगन हुवा जी..” हे भैरवीतलं भजन तर माझ्या मनात इतकं खोलवर रुजलं होतं की एकदा कुमारांनी आपली मैफल या भजनानं संपवली तेव्हा ते भजन मनात पुढचे तीन दिवस घोळत होतं. पुढच्या 2-3 दिवसांत त्या मैफिलीच्या पटांगणात मी 8-10 वेळा जाऊन आलो. आता तिथल्या खुर्च्या, सतरंज्या उचललेल्या होत्या. स्टेजवर कोणीच नव्हतं. सगळं कसं सामसूम, शांत, नॉस्टॅल्जिक होतं. पण तरीही कुमार माझ्या कानात अजून गातच होते, ”धुन सुनके मनवा …!”कुमारजी आमच्या घरी अनेकदा आले. पुजारी सर त्यांना घेऊन यायचे. एकदा तर आठवतंय, ते गॉगल्स घालून आले होते आणि हातात हरभर्याच्या पेंड्या होत्या. हरभरा खातखातच ते घरी आले होते. त्यावेळी मी शाळेत होतो. मला हरभरा आणि गावठी बोरं प्रचंड आवडायची. ती विकत घेतल्यानंतर मला घरी येईपर्यंत धीर निघायचा नाही. त्यामुळे मी ती रस्त्यावरुनच खातखात घरी येई. मग आईवडील रागवायचे. पण तो लटकाच राग असायचा हे कळायचं. ”अच्चा असाच विचित्र आहे बाई”, असं आई किंचित कौतुकानंच म्हणायची. पण जेव्हा कुमारजीच हरभर्याचा डहाळा खात घरी आले तेव्हा आपण काहीच चुकीचं करत नाही आहोत याची खात्री पटली होती. पुन्हा माझ्या रस्त्यावरुन खाण्याचा विषय निघाला की मी कुमार गंधर्वांचं उदाहरण द्यायचो. मग सगळे गप्प बसायचे. पण एकदा वडील म्हणाले ”अरे, ते भारताचे महान गायकही आहेत, तुझं काय?”
सोलापूरला असताना कुमार गंधर्वांच्या अनेक मैफिली ऐकायला मिळाल्या. कुमार आले की पुजारी सरांकडेच उतरायचे. मग तिथे गप्पांचा फड रंगायचा. मला आठवतंय कुमार हातात अडकित्ता घेऊन सुपारी कापत काहीतरी सांगत असत. मी कान एकवटून ते सगळं ऐकत असे. एकदा तर गाणं संपलं तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते. त्यानंतर गप्पा सुरु झाल्या. त्यावेळी मात्र मी, सुलभाताई, पुजारी सर, कुमार गंधर्व आणि माझा मित्र प्रदीप कुलकर्णी एवढेच जण तिथे होतो. पुढचे तीन तास कसे गेले ते कळलंच नाही. अगोदरच त्या मैफिलीचे सूर कानात घोळत होतेच आणि त्यातून त्या गप्पा, ते हास्यविनोद, त्या कुमारांच्या आठवणी, अनेक मैफिलीतले मजेदार किस्से, काही रागांची एक-दोन मिनिटांची प्रात्यक्षिकं हे सगळं तर विलक्षण वेड लावूनच गेलं. आपण भारतातल्या एवढ्या महान गायकाबरोबर इतके तास काढले याचं मला खूप अप्रूप वाटलं होतं. त्यावरुन मी शाळेत किती महिने भाव खाल्ला होता! आणि जसं मीच भारतातला महान गायक असल्यासारखे माझे मित्र माझ्याकडे आदरानं बघत होते!
यानंतर कुमारांची आणि माझी गाठ पडली ती आयआयटीत असताना. शेख, जोगळेकर आणि इतर काहींनी स्थापन केलेल्या ”स्वरांजली” या संस्थेत आम्ही काहीजण स्वयंसेवकासारखी कामं करत असू. त्या काळात मुंबई-पुण्यात कुमारांच्या कित्येक मैफिली ऐकल्या. स्वरांजलीतर्फे आम्ही त्यांची मैफल आयोजितही केली होती. माझ्या मित्रांपैकी काहीजणांना कुमार गंधर्व सर्वश्रेष्ठ वाटत. मला भीमसेनही तेवढेच ग्रेट वाटत. मला आठवतंय की त्यावरुन आमच्यात प्रचंड वाद होत. अगदी अबोला होण्यापर्यंत किंवा जवळपास हमरीतुमरीवर येईपर्यंत!
यानंतर कुमारांकडे देवासला मी दोनदा जाऊन आलो. एकदा सुलभाताई आणि मी गेलो होतो. कुमार गंधर्वांकडे जायच्या नुसत्या कल्पनेनंच मी मनातून खूप बहरलो होतो. देवासमधे शिरल्यावर पहिल्यांदा जर काही डोळ्यात भरत असेल तर ती देवासची टेकडी. त्या टेकडीवरुन संपूर्ण देवासचं दर्शन घडतं. टेकडीवर चामुंडीचं देऊळ आहे. कुमारांचं घर टेकडीच्या पायथ्याशीच होतं. कुमारांच्या घरात शिरतानाच एक डेरेदार बकुळीचं झाड अंगणात दिसलं. तिथेच व्हरांड्यातच एक छानसा झोपाळा होता. झोपाळ्यावर गादी आणि आजूबाजूला वेताच्या खुर्च्या. त्याच्याशेजारीच कुमारांची खोली होती. तिथे एक साधी बैठक होती. व्हरांड्यातूनच हे सगळं दिसायचं.
त्या घरात शिरताक्षणीच एकदम शांत वाटलं. वाटलं की इथे समाधान आहे. आत गेलो तर मुकुल आणि सत्यशील यांना कुमार शिकवत बसलेल. सकाळची वेळ होती. नुकतीच उन्हं पडली होती. बाहेरही प्रसन्न वातावरण होतं. कुमार तोडी शिकवत होते. कुमार गात होते आणि ते दोघं त्यांच्यामागून गात होते. मुकुल हा तर कुमारांचा मुलगा. सत्यशील हा वामनराव देशपांडे यांचा मुलगा. पण कुमारजी मुकुलइतकंच किंबहुना खरंतर तर मुकुलपेक्षा कणभर जास्तच लक्ष सत्यशीलकडे देत होते. दोघंही झकासच गात होते. मुकुल तेव्हा लहान होता, पण आवाज लावायची त्याची पद्धत विलक्षणच होती. तासभर ती मैफल रंगली आणि नंतर मस्तपैकी गप्पा झाल्या. कुमारांचं ते प्रसन्नपणे हसणं, बोलणं, त्यातले ते गंमतशीर मराठी उच्चार मी कधीच विसरु शकणार नव्हतो.
कुमार गंधर्व कुठेही मैफिलीला गेले की त्या गावात ते फेरफटका मारायचे. त्या गावाची रचना, त्याची संस्कृती, त्यातले लोक याचा अंदाज मग त्यांना यायचा. मग त्यांचा एक वेगळाच मूड बनायचा आणि मग त्यांना त्याच रागाच्या वेगवेगळ्या छटा दिसायला लागायच्या. त्यामुळे तोच राग दरवेळी नवीन वस्त्रं परिधान करुन यायचा. त्यामुळे कुठल्याही रागामधे सूर तेच असले तरी भाव तेच असतात असं नाही असं ते मानत नसत. प्रत्येक रागाला अनेक रुपं असतात आणि त्याक्षणी त्यांना जे रुप दिसेल, जे भावेल ते ते त्यावेळी सादर करत. हमीरच्या संदर्भात बोलताना याला ते ”रागाची प्रोफाईल” असं म्हणाले होते. ”अरे, हा राग याही दृष्टिकोनातून बघता येतो” असं ते म्हणायचे. हे मला नेहमीच ग्रेट वाटायचं. याऊलट प्रत्येक रागाचा एक ठरावीकच मूड असतो (उदा. आसावरी म्हणजे करुण, दरबारी म्हणजे धीरगंभीर …) असे पारंपारिक विचार होते. कुमारांनी ते अमान्य करुन क्रांतीच केली असं मला वाटायचं आणि अजूनही वाटतं.कुमार गंधर्व हा एक गाण्यातला विलक्षण प्रकार होऊन गेला हे मात्र खरं. त्यांच्या सर्जनशीलतेबरोबरच मला त्यांचं कौतुक आणखी एका गोष्टीबद्दल वाटतं. ते म्हणजे इतर कलांविषयी वाटणारा आदर आणि आस्था. जहांगिर आर्ट गॅलरीमधलं चित्रप्रदर्शन असो, कवी बेंद्रे किंवा इतर कोणाचं काव्यवाचन असो किंवा पु.ल.देशपांडे यांच्यासारख्या लेखकांचं लिखाण असो. चित्रकला, साहित्य आणि अशा अनेक कलाप्रकारात हा माणूस रस घ्यायचा. स्वत: इतरांच्या कार्यक्रमांनाही जायचा. त्यांनाही दाद द्यायचा. या कलाप्रकारांना त्यांनी कमी लेखलं नाही. पण इतर अनेक कलाकारांमधे मला हे दिसलं नव्हतं. कुमार सगळ्यापेक्षा वेगळे होते. कुमार आपल्या मनातल्या खोलवरच्या भावविश्वासाठी गायचे. गाण्याशी त्यांनी कधीच प्रतारणा केली नाही. ”सिंगिंग फॉर दी गॅलरी” हा प्रकार त्यांच्याकडे नव्हताच. एकदा ते मैफिलीत आले. जाहिरात देताना काही चूक झाली होती की त्यावेळी इतर काहीतरी गडबड होती ते आठवत नाही. पण भल्यामोठ्या हॉलमधे कुमार आत शिरले तेव्हा हातावर मोजण्याइतकीच माणसं आत बसलेली होती. दुसरा एखादा गवई हे बघून खचलाच असता किंवा त्यानं कार्यक्रम रद्द केला असता. पण कुमार त्यादिवशी आणखीनच चवताळून, तब्येतीत गायले. त्यांच्या अंगात काय संचारलं होतं ते कळत नाही पण त्यादिवशीचं गाणं अविस्मरणीय होतं हे निश्चित! सगळं गाणं संपल्यावर त्यांना याविषयी कोणीतरी विचारलं, ”समोर इतके कमी लोक बघून तुम्ही नाराज नाही का झालात?” कुमार त्यावेळी म्हणाले, ”अरे आपण थोडंच बाहेरच्यांसाठी गातो? आपण तर आतल्यासाठी गातो”. या ”सिंगिंग फॉर दी गॅलरी” वाल्यांना आयुष्यभर प्रयत्न करुनही हे जमलं नसतं. उलट त्यांनी गाणं सुरु केल्यावर जे डोळे मिटले आणि ध्यानस्थासारखं गाणं आळवायला सुरुवात केली ते त्यांनी तो राग संपल्यावर उघडले होते. त्यावरुनच ते प्रचंड रंगणार हे उघड होतं.
कुमार गंधर्व देवधरांकडे शिकायला गेले ही माझ्या मते खूप मोठी गोष्ट होती. कुमार गंधर्व मोठे होऊ शकले याचं कारण कुमार स्वत: ग्रेट होतेच पण देवधरांनी त्यांना ज्या तऱ्हेनं घडवलं त्याचाही वाटा त्यात भरपूर होता. देवधरांना पाश्चिमात्य संगीताचंही खूप खोलवर ज्ञान आणि आवड होती. त्यांना कुठलीच बंधनं मान्य नव्हती. त्यांनीच कुमारांना नवीन वाटा धुंडाळायला शिकवल्या. पठडीतलं शिकवून तासनतास घोटून घेण्यापेक्षा कसं शिकायचं हे शिकवलं. मला वाटतं हे फक्त गाण्यातच नव्हे तर देवधरांचा धडा सगळ्याच शिक्षकांनी घेतला पाहिजे. पाठांतर करुन परीक्षेला येणारे अपेक्षित प्रश्न सोडवून घेण्यापेक्षा विचार करायला शिकवायला पाहिजे. देवधरांनी तेच केलं.
यहुदी मेनुईन या जगप्रसिद्ध व्हायोलिनवादकावर एक फिल्म काढली होती. त्यात त्यांना कोणीतरी संगीतानं तुम्हाला काय दिलं असा प्रश्न विचारलाय. त्यावर मेनुईन यांचं उत्तर खूपच मार्मिक होतं. ”मला संगीतामुळे पैसा, मानमरातब हे सगळं काही भरपूर मिळालं. पण यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे संगीतानं मला ऐकायला शिकवलं”. देवधरांनीही कुमारांना सगळ्या घराण्यातली गायकी ऐकून आत्मसात करायला सांगितली आणि कुमारांनी ती केली. किराणा घराण्याचे अब्दुल करीम खाँसाहेब, आग्रा घराण्याचे फैय्याज खाँसाहेब, ग्वाल्हेर घराण्याचे ओंकारनाथ ठाकूर यांची गायकी त्यांनी फक्त आत्मसातच केली नाही तर कुमार त्यांच्या हुबेहूब नकला करत असत. पण आता फक्त त्यांच्या नकला करण्यापलीकडे जाण्याची गरज होती. त्यावेळी देवधरांनी त्यांना नेमका रस्ता दाखवला आणि त्या अनुकरणातून बाहेर पडून स्वत:चा रस्ता शोधून स्वत:ची शैली निर्माण करायला मदत केली.
एक चिनी म्हण आहे. ”तुम्हाला एक वर्षाची सत्ता हवी असेल तर धान्य पेरा, दहा वर्षांची सत्ता हवी असेल तर झाडं लावा आणि 100 वर्षांची हवी असेल तर माणसं घडवा”. त्याचप्रमाणे जर एखादंच गाणं आपल्याला गायचं असेल तर तेवढंच गाणं पाठ करावं लागेल. पण उत्तम गायक बनायचं असेल तर गाण्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं. एखाद्याच गाण्याऐवजी त्या गायकाचे गाण्याबद्दलचे विचारच पक्के घडवावे लागतील. देवधरांनी कुमारांच्या बाबतीत नेमकं हेच केलं. त्यांनी त्यांच्याकडून फक्त एकच राग घोटवून घेण्याऐवजी गाण्याकडे बघण्याची नवीन दृष्टीच कुमारांना दिली. आणि म्हणूनच या चिनी म्हणीप्रमाणे कुमारांचं गाणं 100 वर्षांनंतरही ताजंतवानं राहील यात शंकाच नाही!
अच्युत गोडबोले202/203, इंदुकृपा, प्लॉट नं 50, तरुण भारत सोसायटी चकाला, अंधेरी, मुंबई 400099मो: 98200 30600achyut.godbole@gmail.comwww.achyutgodbole.com
— अच्युत गोडबोले
Leave a Reply