नवीन लेखन...

कुंपण

“त्यांच्या घरापासून थोडं लांब , एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालं होतं.. बरेच दिवस जाऊया जाऊया म्हणत शेवटी एका विकेंडला योग आला..

आपली आलीशान गाडी घेऊन जोडपं तिकडे पोचलं … वेटिंग , वेलकम ड्रिंक, येरझारा अशी एकंदर अर्धा तास घालमेल .. ती तपश्चर्या फळली आणि नंबर लागला एकदाचा ..

दोघेही मोठ्या उत्साहात आत शिरले .. टेबल काबीज केलं… आता आनंदी आनंद गडे , जिकडे तिकडे चोहीकडे …

तेवढ्यात मुख्य वेटरनी मेनू कार्ड दिलं ….. “गुड ईव्हिनिंग सर !!”

बायकोनी त्या वेटरकडून सगळ्या सूपच्या नावांचा इतिहास-भूगोल काढून घेतला.. शेवटी एकदाचं नक्की केलं आणि ऑर्डर दिली ..

हा मात्र नुसताच मेनूकार्डकडे बघतोय .. चेहराही थोडा उतरलेला ..

“काय रे तुझं कुठलं सूप ??”

“कुठलंही सांग.. पण आटप पटकन !!”

शेवटी तिनी सांगितलेली ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला ..

“काय झालं अचानक तुला ?.. रेट बघून हडबडलास ना ? हाहाss”

“नाही ….. तसं काही नाही !!”

बायकोनी वेटरला बोलावून सूपसोबत थोडे ड्राय नूडल्स मागवले ..

“अगं .. त्याला नको बोलावू सारखं सारखं … एकदाच घे ना काय ते !!”

त्यानी कसंबसं सूप संपवलं………..

“मी आलो हां दोन मिनिटात !!”.. असं म्हणत हा बाहेर आला..

तिथे उभ्या रेस्टॉरंटच्या द्वारपालाकरवी त्या “वेटर” ला बाहेर येण्याचा निरोप पाठवला.. आतल्या मॅनेजरची परवानगी घेऊन वेटरसुद्धा लगेच बाहेर आला ..

“काय रे मित्रा ? .. ओळखलंस की नाही ??? …. त्यानी वेटरला विचारलं.

“मग काय ?? … शाळेतल्या मित्राला विसरतं का कुणी ?? .. वेटरचं प्रत्युत्तर

“तू तर मोठा साहेब झाला रे आता !!”..

“अरे बास का ?.. असं काही नाही”

“ तू टेबल बदलून देतोस का मला किंवा दुसऱ्या कोणाला सांग ना आमची ऑर्डर घ्यायला” ..

“का रे बाबा ? मी काही गडबड केली का ?”

“अरे नाही रे ss.. !! पण तू माझा इतका जुना मित्र , मला तुला हे असं सगळं सांगायला कसंतरीच वाटतंय रे .. एकदम ऑकवर्ड फिलिंग येतंय”..

“असं काय दोस्ता ? माझं कामच आहे ते… आपल्या घरी कुणी जेवायला येतं तेव्हा स्वतः न जेवता गृहिणी सगळ्यांना वाढतेच ना .ss …. तसंच ….आणि तू म्हणतोस तसं मी जरी दुसऱ्या कोणाला सांगितलं तरी तो वेटर सुद्धा कोणाचा तरी मित्र , भाऊ , नातेवाईक आहेच ना ? तसा मी तुझा मित्र .. एवढंच !!”

अगदी “प्रॅक्टिकल” म्हणावा असा विचार होता हा …. पण आपला एक शाळेतला मित्र शाळा सोडून इतक्या वर्षांनी अचानक भेटला आणि तो सुद्धा दोघांच्या अशा विभिन्न परिस्थितीत … त्यामुळे त्याला कसं व्यक्त व्हावं हेच समजत नव्हतं ..
हा इथे काम करतोय हे जर आधीपासून माहिती असतं तर कदाचित अशी विचित्र मानसिक कोंडी झाली नसती त्याची …

वेटर मित्र पुढे बोलू लागला .. “तू इतकी दाढी वाढवली असलीस तरीही मी लगेच ओळखलं होतं हां तुला ; पण मला बघून चेहरा पडला तुझा .. म्हणून काही बोललो नाही …… उगाच तुला लाज वाटायला नको मी वेटर असल्याची ??”

वेटर मित्राचा हात धरत तो म्हणाला ….. “ए sssss .. अरे बिलकुल नाही तसं … अजिबात मनात आणू नकोस असं काही … पण इतक्या वर्षानी भेटलो आणि अशा ठिकाणी म्हणून जरा sssss !!….. खरं तर मी माझ्या बायकोला तुझी ओळख करून देणार होतो पण विचार आला की तुला ओशाळल्यासारखं वाटेल का ??.. म्हणून नाही सांगितलं तिला …आपण शाळेतले मित्र म्हणून इतकं स्पष्ट बोलतोय हां !!”

“छे ss छे ss !! त्यात काय ? ….. मी काही चोरीमारी किंवा कुठलं वाईट कृत्य तर करत नाहीये . माझं काम मी प्रामाणिकपणे करतोय , मग मला कशाला ओशाळल्यासारखं वाटेल ?? ….जर मी मालक असतो आणि गल्ल्यावर बसलेलो असतो तर लगेच भेटवलं असतंस ना मला सगळ्यांना ? तसंच वेटर आहे म्हणून सांगायचं की !! .. अरे sss आपण दोघेही आपापल्या परिस्थितिनुरूप आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदऱ्या पार पाडतोय त्यामुळे तुला काय किंवा मला काय ; कुणालाच कसलीच “लाज” तर बाळगायला नकोच आणि “अपराधी” सुद्धा वाटून घ्यायची गरज नाहीये !! “…

“हो रे sss …. हे एकदम खरं आहे तुझं … मीच उगाच काहीतरी विचार करत बसलो… तू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस लेका .. आता एकदम मोकळं वाटतंय बघ !!”

इतक्यात आतुन मॅनेजरनी बोलवल्याचा आवाज आला ….

“चल रे बाबा …. चल आता आतमध्ये.. “

“अरे एक काम करू या का ? तू आत्ता तासभर सुट्टी घे आणि आमच्या बरोबर बस … गप्पा मारत जेवू एकत्र ….मी तुझ्या मॅनेजरशी बोलतो हवं तर!!” ….

“नाही … नको रे .. इथे गप्पा मारल्या ते ठीक आहे … पण आत गेल्यावर ते बरं नाही दिसणार …. तिथे आपापल्या भूमिकेत शिरायचं … हाहा ss !!”

“अरे पण ? … मला ते”…

त्याचं बोलणं तोडत वेटर मित्रानी त्याच्या खांद्यावर एक चापट मारली आणि आत जात “सोड रे आता सगळं ते …. चल बिनधास्त … एक से एक डीशेस सुचवतो ….. मस्त व्हीआयपी सर्व्हिस देतो तुम्हाला … एंजॉय कर आमच्याकडचं झक्कास फूड …. मग नंतर एकदा भेटू निवांत कधीतरी !!”

हा त्याच्या जागी जाऊन बसला … बायकोला बराच वेळ एकटं बसायला लागलं म्हणून माफी मागितली ..

पण लगेच हे सगळं संभाषण तिला कथन केलं … “बघ ना !! आपलं मन अगदी मोकळ्या शिवारासारखं असतं पण बरेचदा त्या स्वच्छंदी मनाला उगीचच नसतं “कुंपण” घालतो आपणच .. मेंदू आणि मन यांच्या संघर्षातून येणाऱ्या , न पटूनही .. पटतंय असं वाटणाऱ्या आभासी विचारांचं “कुंपण” …आणि मग आपलेच योग्य विचार आपणच विनाकारण थोपवतो .. हे असे …. मगाशी त्याच्याशी बोललो आणि ते “कुंपण” एकदम नाहीसं झालं …. उगीचच मनावर एक वेगळंच दडपण आलं होतं …. पण आता अगदी हुश्श ss !! … आता मस्त ताव मारूया !! “

नंतर एकदम खेळीमेळीच्या वातावरणात “डिनर कार्य” पार पडलं …

काही दिवसांनी त्याच्या संपर्कातल्या अनेक शाळू मित्रांना तो त्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला …..

एकदा तर त्या वेटर मित्राला आणि त्याच्या परिवाराला आपल्या घरी जेवायला बोलावून अगदी उत्तम घरगुती “सर्व्हिस” सुद्धा दिली …

पण हे सगळं घडलं ते त्या भलत्या विचारांच्या “कुंपणानीच शेत खाण्याआधी” मनाच्या मळ्यातून वेळीच ते “कुंपण“ काढून टाकलं sss म्हणून ….

— क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..