कोण होतो, आहे कुठे, कुठे हा जाईन
कोण जाणे, किती वळणे कशी मी पाहीन
कुणाकुणाचे कोण जाणे कसे कधी नाते जडावे
कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे!
आगीने हृदयस्थ माझ्या सागर टाकावा गिळून
मस्तकाच्या ठिकऱ्या – ठिकऱ्या काळीज माझे छेदून
शून्यातल्या सुरुवातीने पुन्हा शून्यात का विरावे
कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?
मनी जन्मलेल्या स्वप्नाने का मला पोरके करावे
दबकत्या उमेदीचे स्वप्न पुन्हा कसे ठाकावे
अंधारातले धागे हे कसे मला सापडावे
कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?
काळापलीकडच्या वेदना या कशा कधी संपाव्या
ओल्या पापण्यामागील हास्यात किती त्या दडाव्या
व्याकुळ आर्ततेने गुदमरले मन भरावे
कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?
चांदण्या वेचीत कुणी ओल्या उन्हात तृप्त न्हावे
सूर्याकडे नजर माझी का पोकळीशी नाते जडावे
दैवाचे फासे माझ्याच का उलटे पडावे
कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?
शमावे वादळ आभाळ फाटके मागे ठेवून
विरावा वणवा जखमी खुणा जाग्या ठेऊन
संपून ही आग वेड्यापरी मन का धुमसावे
कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?
विझावेत कढ – सल उरी जागते ठेवून
उरावे तरी का हे हृदय विदीर्ण होऊन
दुबळ्या हातांनी अनाहूत अश्रू कसे रोधावे
कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे?
— यतीन सामंत
Leave a Reply