कुणी त्यागतो पूर्ण वैराग्य त्याचे
कुणी त्यागतो पावित्र्य देहाचे
त्यागूनी कुणाचे पाय न धरावे
गुरू ला मनी अंतरी हो स्मरावे!
त्यागूनी काय मिळते?
मागूनी काय मिळते?
मागण्यासाठी हा जन्म नाही
त्यागूनी तो सर्व दुरुनीचं पाही!
अर्थ–
कुणी त्यागतो पूर्ण वैराग्य त्याचे, कुणी त्यागतो पावित्र्य देहाचे, त्यागूनी कुणाचे पाय न धरावे, गुरू ला मनी अंतरी हो स्मरावे!
(पूर्वी वैराग्य म्हणजे अलिप्तता धारण केली जायची. इथे धारण म्हणजे घालणे नसून तो मार्ग पत्करणे असा होतो. पण आजच्या काळात कितीही वय झालं तरी वैराग्य मार्गावर चालणं माणसाला झेपत नाही याचं कारण मनात असलेली असमाधानी वृत्ती आणि पैशाचा प्राप्त झालेला जादुई डोंगर. याच वृत्ती मूळे कित्येक लोक आपलं वैराग्य चुलीत ठेवतात तर कुणी त्या आपलं पावित्र्य. गरज ही शोधाची जननी आहे पण जर तिला ओरबडणारा कुणी मिळाला तर मात्र गरज ही वादळी गोष्ट ठरू शकते. केवळ गरजेपोटी कोणाचे पाय धरू नये त्याने समोरच्याची वृत्ती वाईट होण्यास मदत होते तर आपलं साधेपण समाजात हास्याला आमंत्रण देऊ शकत म्हणून जो कुणी गुरुस्थानी असेल त्याला मनातून आदर द्यावा.)
त्यागूनी काय मिळते?, मागूनी काय मिळते?, मागण्यासाठी हा जन्म नाही, त्यागूनी तो सर्व दुरुनीचं पाही!
(केवळ एखादी गोष्ट त्यागली म्हणजे सोडली किंवा तिचा स्वीकार न केला म्हणजे वैराग्य प्राप्त होते असा लावणं चुकीचे ठरेल. पूर्वीच्या काळी केला जाणारा त्याग हा मनाशी निगडित होता, आता केला जाणारा त्याग हा तनाशी आणि दिखाव्याशी निगडीत असतो. जसे त्यागून आजकाल काही मिळत नाही तसेच उगाच मागूनही काही मिळत नाही. केवळ फुकट ते पौष्टिक या तत्वावर पुण्य कमावता येत नाही. आपल्याला मिळालेला जन्म हा मागण्यासाठी नाही तर आपल्याकडे जे आहे ते देण्यासाठी झाला आहे हे जेव्हा कळेल तेव्हा समाजात साधेपणा येईल. आणि असा वागणारा आपल्या वृत्तीचा गवगवा करीत बसत नाही तो आपलं काम करून शांतपणे इतर सूरु असलेला मासळी बाजार पहात बसतो.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply