“नातिचरामि” चा मंत्र जपत,
त्याच्या पाठोपाठ घरात
आलेल्या कुंकवाच्या पावलांना
त्याच्याच पावलावर पाऊल टाकण्याची
दीक्षा अग्नीच्या साक्षीने मिळालेली ।
खरं तर तुझं ते माझं – माझं ते तुझं,
असं फार पूर्वी ठरलेलं, पण,
काळ्या मण्यांनी गारुड केलं,
नि ती भरलेली नागीण
त्याच्या आज्ञेत डोलू लागली ।
हिरव्या कंकणात, पायीच्या जोडव्यात,
पुनवेच्या चांदण्यात, त्याचं असणं
तिच्या गात्रोगात्री भिनलं ।
एक पानवेल निर्धास्त वृक्षावर विसावलेली ।
तिला चंद्रकोर लावण्याची भारी हौस,
तो म्हणायचा, असं अर्ध कुंकू
नको कधी लावत जाऊस,
आता, भाळी पूर्णचंद्र रेखताना,
तिच्या डोळ्यांत पाऊस ।
एक वटवृक्ष वादळाने कोलमडलेला ।
— सुधा मोकाशी
Leave a Reply