MENU
नवीन लेखन...

कुंकू – सौभाग्याच लेणं

लेखिका – सौ. वृषाली राजे – कायस्थ विकास 2023 च्या दिवाळी अंकातून


सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धामधूम सुरु आहे. विविध देवतांची देवळं गर्दीने ओसंडून वाहात आहेत. चौका चौकातून देवीची स्थापना करून आरास व रोषणाई यामुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. तासनतास स्त्रिया दर्शनासाठी रांगेत नटून उभ्या आहेत. सवाष्णी पूजन हळदी-कुंकू समारंभ उत्साहाने साजरे होत आहेत मात्र सवाष्णी पूजन, व हळदी कुंकू समारंभ यातून विधवा स्त्रिया मात्र चार हात लांबच आहेत. कारण हकदीकुंकू हा समारंभ फक्त सवाष्णी असलेल्या स्त्रियांसाठी असतो अशी समाजाची धारणा झाली आहे. खास करून महिला वर्गाची.

कुंकू हे सौभाग्याच लेणं म्हणून आपल्या देशातील सर्वच राज्यात महिला वर्ग अतिशय महत्त्व देतात. स्त्रिया एक मंगल वस्तू म्हणून याच्याकडे पाहतात. स्त्रियांच्या जीवनाशी जोडलेला घटक किंवा शब्द म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते.

पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती पण हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने वेळात वेळ काढून नटून थटून त्या आनंदाने जात असत. या समारंभातून त्यांच्यात संवाद घडे. विचारांचे आदान प्रदान होई. सुख दुःखे मोकळेपणाने बोलता येत असत, असा ही त्यामागे हेतू असे.

श्रावण महिन्यातील शुक्रवारी जिवंतीकेचे हळदीकुंकू, मंगळागौर, मग मंगळागौरीचे हळदी कुंकू, जागरण, विविध खेळ, गाणी यात स्त्रिया रमून जात असत. गणपती पाठोपाठ गौरी पूजन, नवरात्री उत्सव, पौष महिन्यातील संक्रांतीसणानिमित्त हळदी कुंकू त्यावेळी स्नेहाचा, प्रेमाचा तिळगुळ देणे, चैत्रगौरीचे हळदी कुंकू त्यावेळी हरभऱ्याने ओट्या भरणे, उन्हाळ्याचे शमन करणारे ते पन्हे, आंबे डाळ खाणे, आणि मग गप्पांमध्ये रंगून जाऊन हळदी कुंकू समारंभ पार पडे.

पूर्वी पुरुष वर्ग शिकार करीत असत. मग शिकार झाल्यावर विजयोत्सव म्हणून प्राण्यांच्या रक्ताचा टिळा कपाळावर लावीत असत. तसेच लढायला जाताना मोहिमेवर निघताना पुरुषांनासुद्धा कुंकू लावले जायचे. पण कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक म्हणून त्याकडे जास्त पाहिलं जाई आणि मग पती निधनानंतर एकदाच त्यांना कुंकवाचा मळवट भरला जाई व पतीच्या यात्रेचा प्रवास सुरू झाला की त्यावर फराटा मारला जाई. त्यानंतर ती विधवा स्त्री कुंकू कपाळी लावत नसे. नव्हे तर विधवा स्त्रियांनी कुंकूच लावू नये अशी अलिखित प्रथाच समाजात मान्यता पावली होती. समाज आपल्याला काय म्हणेल या भीतीने सुद्धा विधवा स्त्रिया लाल कुंकू लावत नसत. मग अशा स्त्रिया बुक्का लावू लागल्या. पूर्वी मेणावर लाल कुंकू सुवासिनी लावीत असत नंतर मग कुंकवाचे मार्केटिंग सुरू झाले. दरबार कुंकू आले. शृंगार कुंकवाने तर संपूर्ण बाजारपेठ काबीज केली. कालांतराने विविध आकारातील, लाल, मरुन, काळ्या टिकल्या आल्या. मॅचिंग टिकल्यांची पाकीटं दुकानात लटकू लागली.

मग एका कवीने चारोळी केली. ‘ टिकल्या बाजारात आल्या अन् न्हाणीघरातील भिंती सौभाग्यवती झाल्या. आज ही हिंदू धर्मात कपाळाला टिकली लावणे हा संस्कृतीचा भाग मानला जातो. टिकली हा एक सौदर्यालंकार आहे. सौभाग्याची निशाणी म्हणून टिकलीकडे पाहिलं जातं. हिंदू स्त्रियांच्या मनामध्ये जे 16 शृंगार आहेत त्या मध्ये कुंकवाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्यात टिळा लावणे ही प्रथा आहे. कुंकवाचा टिळा अथवा चंदनाचा टिळा, गोपीचंदन टिळा लावला जातो. त्यामुळे मस्तक रेषा थंड राहून ताण दूर होतो व डोकं शांत राहतं. महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुंकू महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करते. ही ऊर्जा नष्ट करण्यासाठीच की काय बायकाच बायकांच्या शत्रू बनल्या. लग्न समारंभ असो वा कोणताही हळदी-कुंकू समारंभ असो विधवा स्त्रियांना कुंकू न लावता हेटाळणी करून हळदीकुंकू लावणारी स्त्री पुढे सरकून जात असते.

पण मुख्य म्हणजे स्त्री कडे जन्मताच एक शक्ती आहे. तिला बाह्य ऊर्जेची गरज नाही. पती हयात असेपर्यंत ती देवता म्हणून तिचा उदो उदो करायचा पूजन करायचे आणि पती निधनानंतर अपमानीत वागणूक द्यायची हे किती काळ चालणार आहे देव जाणे. समाजाच्या दृष्टीने जोडीदार गेला म्हणजे तिचं आयुष्य, मन, भावभावना याला काहीजण काहीच किंमत देत नाही.

पती आणि पत्नी हे आयुष्याच्या एका ठराविक वळणावर भेटणारे आयुष्याचे जोड़ीदार, सहप्रवासी. आपली मुलगी किंवा मुलगा यांचा एकमेकांच्या सोबतीने सुखाचा संसार व्हावा. तो संसार बहरावा. यातून वंशवृद्धी व्हावी. सुख, दु:ख आनंद, सहवास मनसोक्त फिरणं, आनंदाने स्वीकारलेलं (एकमेकांच्या सहमतीने) पालकत्व तितक्याच जबाबदारीने दोघांनी संभाळणं या साठी एकमेकास पूरक जोडीदार लागतो. पण काही वेळा पत्नीच्या आधीच सर्वांच्या साक्षीने लग्नमंडपात आयुष्यभरासाठी बांधलेली सहवासाची लग्नगाठ सुटते आणि पती साथ सोडून जातो. अशावेळी कोणतीही स्त्री असो ती एकटी स्त्री दोन्ही भूमिका पार पाडते. संकटाशी सामना करायला कष्ट करायला सज्ज होते. मुलांचे संगोपन, शिक्षण दोन्ही कुटुंबाची कर्तव्ये ती समर्थपणे पार पाडते. तेव्हा तिच्या कपाळावरील कुंकू अथवा काही टिकली आड येत नाही. सामाजिक, शैक्षणिक साहित्य कला क्रिडा, नोकरी या सर्वांवर आघाडीवर ती एकटी सर्वशक्तिनिशी स्वार होते. यशस्वी दुर्गा म्हणून समाजापुढे आदर्श निर्माण करते. या साऱ्याचा समाज विचार करणार का नाही? आयुष्याचा जोडीदार, तिचा पती जीवंत नाही म्हणून तिची हेटाळणी करणार? तिला तुच्छ लेखणार, कमी लेखणार? पण समाजातून अनेक घरा-घरातून ही स्थिती आजही पाहायला मिळते. विधवा-सधवा असा भेद किती काळ चालणार? तिचं कपाळावरील कुंकू नजरेत भरतं पण तिचं कर्तृत्व, तिची कर्तबगारी, तिची हुशारी, तिचे कष्ट, तिची निर्णय क्षमता, तिची धडाडी दिसत नाही का?

सन 1980 साली मी शारदा बाल मंदिराची स्थापना माजिवडे गावात केली. माजिवडा गाव व तेथील सामाजिक स्थिती त्यावेळी खेडेगावासारखी होती. त्या काळी मी स्त्रियांचे आरोग्य शिक्षण, कुटुंब नियोजन, अंधश्रद्धा, अनेक सामाजिक प्रश्नावर व्याख्यानं आयोजित करत असे. त्यांना एकत्रित आणण्यासाठी मी सुद्धा हळदी-कुंकवाचा मार्ग अवलंबित असे. त्या मुळे तरी स्त्रिया एकत्र येतील, माझा हेतू सफल होईल ही त्या मागील माझी भावना होती. एका समारंभाला काही स्त्रीपालक गैरहजर राहिल्याने मी दुसऱ्या दिवशी मुलाजवळ विचारणा केली. न येण्याची कारणे विविध होती. कोणी रेशनिंगच्या रांगेत उभं, तर कोणी पाण्यासाठी नळावर उभं तर कोणत्या बाईला कावळा शिवलेला पण एका मुलाने सांगितलं ” बाई मी आईला शाळेत चल म्हणून खूप वेळा सांगितलं पण आई म्हणाली “तुला बाबा नाहीत न मग आज आपण शाळेत कार्यक्रमाला जायचं नाही.’ हे ऐकून मला चांगलीच चपराक बसली. आणि तेव्हापासून हळदी-कुंकू या शब्दाला माझ्या मनातून हदपार केल. त्यांनी चांगलंच डोळ्यात अंजन घातलं होतं आणि तो छोटा जीव रडायला लागला. माझं मन हललं–त्या नंतर हळदी-कुंकू समारंभ हा शब्दप्रयोग मी फलकावर कधीच केला नाही.

आपण म्हणतो आपण विद्यार्थ्यांना शिकवतो पण काही गोष्टीतून विद्यार्थ्यी आपल्याला खूप काही शिकवून जातात.

खास नवरात्रीत कुमारिकांची पूजा करून कुंकू लावले जाते. ओटी भरली जाते. मुलगी तेरा चौदाव्या वर्षी वयात आल्यावर सुद्धा संस्कार केले जातात. ओटी भरली जाते. पती निधनानंतर ही त्या महिलेची शेवटची ओटी भरून ती त्या पती सोबत देऊन नंतर कुंकू लावणे, ओटी भरणे यापासून तिला वंचित ठेवतात. पण हे असं का? हा मला पडलेला न सुटलेला प्रश्न आहे.

एखाद्या विधवा स्त्रीने पुनर्विवाह केला तर तिला सवाष्ण म्हणून धरलं जातं म्हणजे एखाद्या बाईला आयुष्याचा जोडीदार असणं म्हणजेच ती सवाष्ण होते का? कुंकू लावण्याचा निकष काय? तो कोणी ठरवला? पण काही का असेना आजकाल 20 टक्के समाजाच्या विचारात तरी फरक पडलेला दिसतोय.

या वर्षीच्या नवरात्रीच्या पर्वात शपथ घेऊ या आणि सगळ्याच स्त्रियांचा सन्मान करु या.

वृषाली राजे
84240 99344
vrushaliraje1951@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..