संगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले. चौकशीची चक्रे जोरात फिरू लागली होते. मुंबई पोलीसांनी कलकत्ता गुन्हे विभागाकडे सर्व माहिती पुरविली होती. त्यानी मृणाल सेनला चौकशी साठी स्टेशन वर बोलावले होते, पण धूर्त पणाने तिने उत्तरे देत आपणास या माणसा बद्दल फारशी माहिती नसल्याचे नमूद केले. बिपीन काहीतरी खेळी खेळत आहे हे चाणाक्ष मृणालला लक्षात आले होते.
गेल्या वर्षातील त्या दोघांच्या भेटीगाठीनी ती तर बिपीनच्या व्यक्तीम्त्वाने भारावून गेली होती. तिच्या मनात एक वेगळेच वादळ निर्माण झाले होते. त्याच्या भोवतालच्या चौकशीचा गुंता वाढण्याच्या आत त्याला जागरूक करणे अत्यंत गरजेचे होते, त्याच्या फोनची ती आतुरतेने वाट पाहत होती, एके दिवशी सकाळी ती ऑफीस मध्ये शिरता शिरता बीपिनचा थिंपू येथून फोन आला, ज्या आवाजाची ती सतत प्रतिक्षेत होती, तो आवाज कानावर पडतच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला, दोघांच्या गोड गप्पा झाल्या आणी तिने पोलीसांनी केलेल्या चौकशी बाबत माहिती दिल्यावर त्याच्या पायाखालची वाळूच घसरू लागली, आता हिच्या समोर आपले बिंग उघडण्या शिवाय त्याला तरणोपाय नव्हता. नाहीतर त्याच्या जीवनाची राखरांगोळी झाली असती, आपल्या प्रेमाच्या जाळ्यात मृणालला अडकविण्याची नितांत गरज होती, आणि ती तर स्वत;हूनच जाळ्यात शिरण्यास खुशीने तयार होती. मृणाल म्हणजे एक आदर्श सेक्रेटरीचे गुण असलेली, आकर्षक व्यक्तीमत्व संपन्न स्वच्छंदी वृत्तीची मुलगी, घरी आई वडीलांचा घटस्पोट, आजतागायत एकटी वाढलेली, लग्नाचा विचारही केलेला नव्हता.
थिंपूत बापलेक हळूहळू स्थिरावत होते, आता मौशूला सांभाळण्याचा मोठा गहन प्रश्न बिपीन पुढे होता, घर सांभाळण्यासाठी व मौशु कडे बघण्यास एका जबाबदार बाईची गरज होती. याशिवाय तो कामावर जाणे अशक्य होते. काही वेळा मन भरकटत असे तेव्हां मौशु वर आपण अन्याय करत आहोत का असा क्षणभर विचार डोकावे, पण लागलेच दुसरे मन उफाळून येई, ”नाही संगीताला जन्माची अद्दल घडविली आहे, माझ्या आणत जे आहे ते मी अमलात आणणारच, अशा अहंकाराच्या वलयातच तो गुरफटून गेला होता.
आपले कोणतेही बिंग फुटू नये, व मौशूला खुश ठेवणे अशी तारेवरची कसरत खेळावी लागणार होती, या करता तेनसिंग ड्रायव्हरची मदत घेण्याच्या दृष्टीने आपली पावले टाकण्यास सुरवात केली.
तेनसिंगची मोठी बहीण तिच्या लहान पणापासून थिंपू मधील ताशीचोड झांग धर्मपीठात भिक्षुणी म्हणून राहात होती. अतिशय प्रेमळ, शांत स्वभावाची पण निरुस्ताही वातावणात खितपत पडलेली होती. आपल्या बहिणीचे आयुष्य सुखाचे व्हावे असे त्याला मनापासून वाटत होते. प्रेमापोटी तिला वेगळ्या जीवनात आणण्ण्याचा मनापासून प्रयत्न करीत होता.
बिपीनने तेनसिंगशी हितगुज करीत मौशूबरोबर घरात राहण्यासाठी एखादी चांगली बाई बघ, जी आमच्या घरी कायमचे वास्तव्य करेल, हे सर्व सांगताना आपल्या जीवनातील घडलेल्या घटनांचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. मी पैसे व्यवथित देईन, पण आमच्या कुटुंबा बद्दल उगाच चर्चा करायची नाही अशी धमकीही दिली होती. इकडे तेनसिंगच्या डोक्यात निराळीच चक्रे फिरू लागली, त्याला आपल्या बहिणीचे भविष्य या घरात बदलेल याची स्वप्ने पडू लागली. एक दिवस आपली बहीण जोगानाला घेऊन तो बिपीनच्या घरी घेऊन आला. तिचे इंग्रजी व हिंदी बेताचे, पण पहिल्याच भेटीत तिचा प्रेमळ हात मौशूच्या अंगावरून फिरला मात्र आणी जादूची कांडी फिरावी तशी मौशूच्या चेहऱ्या वर आनंदाच्या लहरी उमटल्या, आणी ती जोगानाला बीलगलीच. जणु त्यांचे पूर्वजन्मातील निकटचे संबंध होते, काही मिनिटात दोघींची अशीकाही गट्टी जमली की टे पाहून बिपीन अवाक्च झाला, त्याचे तारू वादळातून सहीसलामत वाचले होते.
नव्या ऑफीस मध्ये बिपीनच्या तडफदार व्यक्तीमत्वाने सर्च जण प्रभावीत झाले होते, कामात निर्णय घेण्यात तर तो वाघच होता. भूतानी लोक अतिशय शांत, मित भाषी, नम्र, अगदी देशाच्या निसर्गरम्य वातावरणाला साजेसे, काही दिवसातच कंपनीला भराभर कामे मिळू लागली, त्याच्या प्रगतीचे घोडे वेगात पळू लागले होते.
मौशु इंग्रजी शाळेत जाऊ लागली, जोगना तिला अतिशय प्रेमाने वागवत होती, हळूहळू आईची आठवण मनातून पुसली जात होती, काळ थांबत नाही हेच खरे सत्य होते.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply