संगीता परत कामावर जाऊ लागली होती. तेथे तिच्या अपरोक्ष बरीच उलट सुलट चर्चा होत असे. खर काय घडले आहे हे कोणालाच माहीत नव्हते. काही लोकांच्या निरर्थक सूचना कानावर येत, त्या कडे दुर्लक्ष करण्या शिवाय ती काय करू शकणार होती ?तिच्या दृष्टीक्षेपात कोणताही आशेचा किरण नव्हता.
एके दिवशी सकाळी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनचे एसीपी अभिजित सावंत यांचा संगीताला फोन आला. केसमधील काही महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले असून, त्या बाबत पुढे काय पावले टाकायची हे ठरविण्यासाठी तिला ताबडतोब पोलीस स्टेशनवर बोलावले होते. प्राथमिक तपासणी नुसार बिपीनने बंगाल मधील जलपईगुरी गावातून कलकत्त्यात फोन लावला होता, त्या गावातील एका हॉटेलमध्ये एक पुरुष व १० एक वर्षाची मुलगी काही दिवस राहिल्याची नोंद होती. याबाबतची पुढील चौकशी करण्यासाठी त्या गावात जाण्याची गरज होती, पोलीसा बरोबर संगीताला जावेच लागणार असल्याने धाकटा भाऊ विजय बरोबर सर्व जण जलपई गुरी येथे पोहचले. जीवाला घोर लावणारा असा कंटाळून टाकणारा प्रवास संपता संपत नव्हता. तेथे पोहचल्यावर परत तेथील पोलीस स्टेशन, विविध हॉटेलस, तेथील काम करणारी मुले, टॅक्सीचालक, प्रत्येकानं दोघांचे फोटो दाखविणे, आणी प्रत्येकाक्डून नन्नाचा पाढा हा सर्व चौकशीचा फंडा पाहून ती मनानी पार थकून गेली होती, तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. सावंत आपल्या परीने तपास फार काळजीपूर्वकपणे करीत होते, पर प्रांतातील पोलीस येत्रणेचे सहकार्य नेहमीच यथातथा असते.
८ दिवस थांबल्या नंतर एका टॅक्सी ड्रायव्हरला पोलीस स्टेशनवर आणण्यात आले, त्याने फोटोत दाखविलेल्या प्रवाशांना गंगटोक शहरात सोडले होते अशी जबानी दिली, या गावातून नेपाळ, सिक्कीम. भूतान अशा प्रदेशात रस्ते जातात, त्याच्या सांगण्यावरून गंगटोक पर्यंत जाऊन सर्वांनी मुख्य पोलीस स्टेशन गाठले, हाती काही लागणारच नव्हते, वेड्या आशेपायी वणवण भटकले होते, संगीता पार खचून गेली, नियतीच्या सुडाचे घाव पडतच होते.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply