मुंबईत संध्याकाळचे ७ वाजत होते, शैलजा मराठे हिंदू कॉलनीतील आपल्या घरात नुकत्याच बाजारातून परतल्या होत्या, संगीता रात्री ९ नंतर कामावरून परतत असे. अखंड बॅंकेचा कामात वाहून घेणे हेच तिचे जीवन होते. त्यांच्या घरातील फोनची घंटा वाजू लागली, तिच्या आवाजा वरून ती ट्रंक कॉलची आहे हे आजींच्या लक्षात आले. समोरच्या बाजूनी एका मुलीनी सफाईपणे इंग्रजीत त्यांचा नंबर व नाव सांगितले व ते बरोबर आहेना हे ताडून पाहिले आणि दुसऱ्या बाजूनी हो बरोबर उत्तर ऐकता क्षणी मौशुचा आनंद गगनात मावत नव्हता. आता पुढील प्रश्नाचे उत्तर योग्य मिळाले तर तिच्या जीवनाचा सारीपाटच बदलणार होता. तिचा पुढचा प्रश्न होता ‘मला मिसेस संगीता नायर यांच्याशी बोलायचे आहे, मी त्यांच्याशी बोलू शकते का? या प्रश्नाचे उत्तर काय असणार? तिचे कान अधीर होऊन वाट पाहत होते, तो क्षण कधी संपतो असे झाले होते, तिचा श्वास कोंडला होता. आणि काही क्षणात आजी सांगत होत्या “ संगीता अजून बॅंकेतून आलेली नाही ती रात्री ९/९. ३० पर्यंत येते, ” हे तिने ऐकले आणि तिच्या नसानसातून अद्भूत उर्जेचा स्त्रोत वाहू लागला, आपल्या जीवनात सोनेरी पहात उगवणार याची तिच्या मनाची बालंबाल खात्री पटली, आपली आई आजीच्याच घरी राहते आहे, हे नक्कीच, आता आपला मार्ग मिळाल्याच्या आनंदात तिच्या तोंडून काही शब्दच फुटत नव्हते, समोरून आजीला काहीच कळत नव्हते, तिने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ”तू कोण आहेस? कोठून बोलत आहेस ? तुझे काम काय आहे? मौशूला भांबावलेल्या अवस्थेत पाहून तात्काळ तोंग्शेनी फोन आपल्या हातात घेतला, कोणत्याही परीस्थितीत फोन वरील संवाद व्यवस्थित चालू ठेवणे अत्यंत गरजेचे होते त्यानी अतिशय नम्रतेने बोलण्यास सुरवात केली ” आम्ही भूतान थिंपू येथून बोलत आहोत, आमचे संगीता नायर यांचे बरोबर बॅंके संदर्भात काही खाजगी काम असून त्याबाबत त्यांना घरी आल्यावर निरोप द्यावा, आम्ही रात्री १० वाजता फोन करू त्यावेळी सविस्तर बोलणे होईल, आपणास तसदी दिल्याबद्दल क्षमस्व. फोन बंद झाला काही वेळ आजी विचारात गुंग झाल्या संगीता आल्यावरच कळेल, असे मनाला समजवत त्या आपल्या कामात दंग झाल्या. रात्री ९ वाजता संगीता बरोबर जेवत असताना त्यानी आलेल्या फोनचा विषय काढला, पण त्यांच्या बॅंकेचा भूतान देशाबरोबर कोणताही व्यवहार नसल्याने तीही बुचकळ्यात पडली.
थिंपू मध्ये मौशु व तोंगशे भारतीय घड्याळा प्रमाणे रात्रीचे १० वाजण्याची चातकासारखी वाट बघत बसलेले होते. आपल्याला आईशी बोलताना मन खंबीर ठेवत, भावनांच्या उद्रेकाला आवर घालत बोलायचे आहे हे ती सारखी मनाला बजावत होती. रात्रीचे १० वाजले आणि मुंबईत संगीताच्या घरची फोनची घंटा घणाणू लागली. आईनेच फोन उचलून आपली ओळख सांगितल्याने मौशूच्या कानावर ते शब्द पडले मात्र आणि काही क्षण तिला शब्दच फुटेनात, आई हॅलो हॅलो करत होती, आणि मग एका क्षणात मौशुचा गोड आवाज बाहेर पडला, ”आई तुझी लाडकी मौशु भूतान देशतील थिंपू या शहरातून बोलत आहे, मीच मौशु आहे या माझ्या सांगण्यावर तू विश्वास ठेव, आणि पुढील काही मिनिटे दोन्ही बाजूनी नुसते हुंदक्याचे आर्त विलाप येत होते, संगीताचा ऐकलेल्या गोष्टीवर प्रथम विश्वास बसणे कठीण होते, कोणीतरी आपल्याला फसवत तर नाही ना? अनेक संशयांनी काहूर माजले, परत मौशु गोंधळलेल्या अवस्थेत बोलू लागली, ”आई मी अगदी सुरक्षित आहे, तोंग्शेंच्या लक्षात आले की आपण बोलल्या शिवाय संगीताचा विश्वास बसणार नाही. आता भावनांना आवर घालीत घडलेल्या घटनांचा इतक्या वर्षाचा इतिहास काही मिनिटात सांगायच्या आणि याबाबत खात्री पटविण्याच्या मुख्य गोष्टी मुद्देसुद सांगण्याचे महाकठीण जबाबदारीचे काम तोंगशे हे फोनवरील बोलण्यातून करीत होते. त्यानी मौशु व बिपीन यांची सर्व खाणाखुणा सकट माहिती तर दिलीच. व मुंबईहून आलेल्या पर्यटन कंपनीच्या दोन मराठी बायकांचे टेलिफोन नंबरही दिले. त्यांच्या कडे अनेक फोटो असून त्यात तुम्हाला मौशु दिसु शकेल, त्याचबरोबर स्वताचे भूतान मधील फोन नंबरही दिले. मुख्य मुद्द्याकडे वळत त्यानी सांगितले ‘ याबाबतीत अतिशय गुप्तता पाळणे अत्यंत गरजेचे आहे, तुम्ही माहिती पडताळून पाहताना ही काळजी अवश्य घ्यावी. उद्या रात्री याच वेळी आम्ही दोघेही परत फोनवर बोलू त्यावेळी पुढचा प्लान कसा असेल याचा तपशील सांगू. तुम्ही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा अशी कळकळीची विनंती करत त्यानी फोन ठेवला. या जबरदस्त आनंदाच्या धक्क्यातून सावरणे म्हणजे सगळ्यांची कसोटी पणाला लागणार होती, घटना झंझावाता सारख्या घडल्या होत्या.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply