बिपीन व त्याचे ज्येष्ठ सहकारी यांच्यातील तणावपूर्ण वातावरण तापतच चालले होते. बॅंकेकडून कर्ज व्यवस्थित मिळत होते, पण कामाच्या ऑर्डर्स कमी झाल्या होत्या. याच्या तीरसट भांडखोर स्वभावामुळे शेवटच्या क्षणाला काम हातातून जात होते. इकडे संगीताचा कामावर जम छानच बसला होता.
लग्नाला दोन वर्षे झालेली, तिसऱ्याचे घरात आगमन झाले तर पुढे मुलाचा सांभाळ कसा करायचा, त्याचे आई वडील येण्याची सुतराम शक्यता नव्हती, संगीताच्या आईने आनंदाने जबाबदारी घेतली असती, पण तुझ्या आईची मदत, छे हे कदापि शक्य नव्हते, संगीताने आपली नोकरी सोडून द्यावी, या बाबतीत वाद चालू होता, पण संगीता आपल्या नोकरी करण्या बाबत ठाम होती, दिवस पुढे जात होते तिढा सुटत नव्हता. वेळ आल्यावर तोडगा निघेल या आशेवर मिया बीबी सुखाने नांदू लागले होते. प्रेमाच्या रात्रीना बहर आला होता. संगीताला दिवस गेले आणी घरील वातावरणाला आनंदाचा बहर आला होता. तिला ८ एक महिने हक्काची रजा मिळणार होती, तिच्या डोक्यात पुढील व्यवस्थेची चक्रे जोरात फिरू लागली होती. मंगलाबाई आईच्या जुन्या परिचयातील गरजू बाई ज्यांना अगदी तान्ही बाळं सांभाळण्याचा अनुभव, गरजू होत्या. त्या २४ तास राहण्यास एकदमच तयार होत्या, त्यांचा एकच मुलगा पुण्यात नोकरीला होता, बाळंत होण्याच्या आधीच १० दिवस मंगलाबाई घरात आल्याने मोठा बिकट प्रश्न सुटला होता. गोंडस मौशुमीच्या आगमनाने घरात जल्लोषाचे वातावरण झाले होते. बिपीनला मुलगीच हवी होती, मग काय तिला तीन तीन जणांचे प्रेम मिळू लागले होते. पहिल्या दिवसापासून मंगला बाईंचा सहवास मिळाल्याने दोन आयांचे प्रेम मिळत होते. ७ महिने हा हा म्हणता गेले, संगीता कामावर रुजू झाली. घरात परत वितंडवाद नको म्हणून संगीता ना मौशूला आजीकडे नेत असे ना आई तिच्या घरी येऊ शकत असे, हा तिढा कधीच सुटणार नव्हता.
संगीता निर्धास्तपणे आपल्या कामात जीव ओतून काम करू लागली होती. घरी आल्यावर पूर्णपणे ती मौशुचे लाड करण्यात वेळ घालवित, छान छान गोष्टी सांगत रात्री कुशीत घेऊन झोपत असे. आजकाल बिपीनला बरेच दिवस कामाकरता कलकत्त्यात राहावे लागत असे, पण जेंव्हा घरी असे तेंव्हा मात्र मौशुमय होत असे. सर्वांच्याच लाडामुळे ती हळूहळू हट्टी बनत चालली होती. ती व मंगला बाईंचे घरात राज्य, रोज शाळेत नेण्याचे आणण्याचे काम त्यांचे, मधल्या वेळात त्या अखंड टीव्ही मध्ये बुडलेल्या, त्यामुळे मौशुही शाळेतून आल्या आल्या कपडे बूट न काढता टीव्ही समोर तासन् तास बसलेली असे. दुध पिण्या करता खटखट, खाण्यात अजिबात लक्ष नाही, मग कधी कधी मंगला बाईची चिडचिड होत असे.
मौशूच्या वाट्याला हल्ली आई बाबा कमीच मिळत होते. दोघेही कामामुळे बरेच उशीरा येत तोपर्यंत ती झोपलेली असे. एके दिवशी ती शाळेतून येण्या आधीच मंगला बाईनी टीव्हीचा रिमोट लपवून ठेवला. नेहमी प्रमाणे घरात शिरता शिरताच ती टीव्ही कडे गेली, रिमोट मिळाला नाही. बाबांनी कुठे ठेवला आहे ते मला माहीत नाही, असे सांगितल्यावर तिचे डोकेच फिरले. रागारागाने तिने त्यांना चापट्या मारण्यास सुरवात केली, अंगावर थूंकणया पर्यंत मजल गेली. मंगला बाईंचा रागाचा पारा चढतच चालला. त्यानी तीला घट्ट पकडून खुर्चीत बसविले, जोरात भोकाड पसरून दारावर लाथा मारत जोरानी किंचाळणयास सुरवात केली. त्या समजावण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण एक नाही की दोन नाही, तेवढ्यात दाराचे बेल वाजली, आणी दारात बीपेन दत्त म्हणून उभा, झालेला प्रकार लक्षात येताच त्याने तर रुद्रावतारच धारण केला, ’माझ्या मौशूला असे वागवलेले मला खपायचे नाही, तुम्ही एक नोकर आहात, तुमचे पातळी ओळखा, असे डोळे वटारून अपमानास्पद बोलत, मौशूला प्रेमाने कुरवाळत तिला खेळायला बाहेर घेऊन गेला. संगीताला आज कामावरून येण्यास बराच उशीर झाला, ती घरात शिरता शिरताच खडाजंगी भांडणाने तर कळसच गाठला. आणि शेवटी खापर संगीताच्या डोक्यावर फोडले तेंव्हा स्वारी शांत झाली.
दुसऱ्या दिवशी तो कलकत्त्यात कामासाठी १० /१५ दिवस राहणार होता. त्या ऑफीस मधील एक तडफदार चुणचुणीत मुलगी मृणाल सेन त्याचे सर्व व्यवस्था पहात असे. आजकाल दोघांच्या मैत्रीला भर येत चालला होता.
डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply