संगीताला आपल्या जीवनाचे चक्र कसे चालू करायचे हेच उमगत नव्हते. विचारांचा गुंता वाढतच चालला होता, डोळ्यासमोरून मौशु जाता जात नव्हती. एका नराधमाने त्या दोघीना खोल समुद्रात ढकलून दिले होते, आशेचा एखादा किरणही डोकविण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण पुढे काय? हा न सुटणारा यक्षप्रश्न होता.
आई व विजयच्या आग्रहामुळे सद्दस्थितीत बांद्र्याचे घर बंद करून हिंदू कॉलनीतील आई जवळ राहण्या शिवाय दुसरा मार्गच नव्हता. पोलीस स्टेशनच्या फेऱ्या चालूच होत्या. पोलीसी खाक्याप्रमाणे धीम्या गतीने तपास चालू होता. कोणताही महत्वाचा धागा न मिळाल्याने तपासाला योग्य दिशाच मिळत नव्हती.
बॅंकेत तर चर्चेला उधाणच आले होते. सर्वांचा करुणा व दयेचा सूर होता. या सर्व परीस्थितीला तोंड देता देता संगीता कंटाळून गेली होती.
पोलीसांनी त्यांच्या पद्धतीने भारतातील प्रमुख पोलीस ठाण्यांना दोघांचे फोटो पाठवले होते, नुसत्या मुंबई शहरात अनेक पोलीस ठाण्यावर अशा तऱ्हेची बेपत्ता झालेली मुले, आया, वडील यांच्या रोजच नोंदी होतच असतात, त्यात ही एक केस असे पाहिले जात होते, पण क्राईम विभागाचे पेंडसे जातीने लक्ष घालत असल्याने केसला अग्रस्थान मिळाले होते.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply