कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत, एवढ्या त्या एकरूप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतु स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. माझे मालवणीतून अर्थवाही कविता करणारे मालवण स्थित कविमित्र श्री. विनय सौदागर यांनी स्त्रीचं चार ओळीत यथार्थ वर्णन केलं आहे. ते म्हणतात, पोराटोरा, घरचा, भायला बायलांर जास्ती वजां.. टिकली तेची लावन् समाळतत पुरुष प्रधान, ती राजा..!!
सौदागरांनी स्त्रीचं ‘राजा’ म्हणून अगदी योग्य वर्णन केलंय. स्त्री हा कुटुंबाचा कणा असतो. पूर्वीच्या काळातही तिची भूमिका कण्याची होती, आजही आहे आणि उद्याही राहाणार आहे. कुटुंबांची व्याख्या काळानुसार बदलत गेली. माझ्या लहानपणी कुटुंब म्हणजे सर्व सख्खे चुलत धरून १५- २० जणांचं असायचं. त्याकाळीही त्या विस्तारीत कुटुंबाचा कणा स्त्रीच असायची. त्या काळी, म्हणजे साधारण पन्नासएक वर्षांपूर्वी, स्त्रिया शिकत असल्या, तरी ते तेवढ्यापुरतंच असायचं.
कित्येकींना तर आई-वडिलांनी लग्न करून दिलं म्हणून शिक्षण सोडावं लागायचं. शिक्षणाचा संबंध तेव्हाच्या काळी आजच्यासारखा अर्थार्जनाशी लावलेला नव्हता.
कुटुंब ही संस्थाच मुळी स्त्रियांमुळे सुरू झाली आहे. कुटुंब व्यवस्था अवतरण्यापूर्वी मनुष्य भटक्या अवस्थेत होता. शिकार, कंदमुळं जिथे मुबलक प्रमाणात मिळेल, अशा जागेच्या शोधात भटकत जायचं. अशी जागा मिळाली की तेथील अन्न संपेपर्यंत तिथे राहायचं आणि त्या ठिकाणचं अन्न संपलं, की मग पुन्हा नवीन जागेच्या शोधात निघायचं. हाच घटनाक्रम वर्षानुवर्ष चालू असायचा. त्या काळचं मनुष्य जीवन, माणसापेक्षा प्राण्यांच्या जवळचं होतं. पुढे कधीतरी शेतीचा शोध लागला आणि मग एकाच जागी राहूनही अन्न मिळवता येतं, हे माणसाच्या लक्षात आलं आणि भटका माणूस स्थिर झाला.
शेतीच्या शोधाला कारणीभूत ‘माणूस’ झाली, ती स्त्री. याचाच अर्थ असा, की मनुष्य’प्राण्या’ला म्हणून ओळख मिळवून दिली, ती स्त्रीने. शेतीचा शोध ही मनुष्याच्या उत्क्रांतीतील अतिशय महत्त्वाची घटना ठरली कारण ‘प्राण्यां’सम जीवन जगणारा माणूस, इथून पुढे ‘मनुष्य’ म्हणून जगू लागला. भटका मनुष्य स्थिर झाला आणि नवरा-बायको-मुलं कुटुंब व्यवस्था आकाराला आली. स्त्री जन्मदात्री होतीच, आता ती कर्तीही झाली..!
मनुष्यप्राण्याला माणूस आणि बनवणारी जिच्यामुळे कुटुंबव्यवस्था जन्माला आली, ती स्त्री त्या कुटुंबाचा कणाच कशाला, पायाही न होती, तरच नवल. स्त्री हा कुटुंबव्यवस्थेचा पाया झाली, तो आजतागायत आणि पुढेही राहील. स्त्री ही नुसतीच कुटुंबाचा कणा नाही, तर जगायचं कशाला हे शिकवणाऱ्या संस्कृतीचा स्त्रोतही आहे. प्राणी अवस्थेतून मनुष्य अवस्थेत येताना एक ठळक फरक घडला आणि तो म्हणजे मनुष्य सुसंस्कृत होत गेला. संस्कृतीला स्त्रीनेच जन्म दिला असावा, हे ‘संस्कृती’ या स्त्रीलिंगी शब्दांवरूनही कळते.
तेव्हापासून ते कालपर्यंतच्या घटनांचा स्त्रीच्या संदर्भातून आढावा घ्यायचं म्हटलं, तर एक अख्खं पुस्तक होईल. त्यामुळे स्त्री आणि कुटुंब यांच्यातील संबंधावर आजच्या काळापुरता थोडासा स्पर्श या लेखात केला आहे.
कुटुंबाचा कणा असलेली स्त्री आज घर आणि कार्यालय अशा दोन आघाड्यांवर लढताना दिसतेय. तिची दमछाक होतेय हे खरं असलं, तरी शक्तीचा अमर्याद स्त्रोत असलेली ती, या दोन्ही आघाड्यांवर समर्थपणे लढताना दिसतेय. पूर्वीची विस्तारीत कुटुंब मोडकळीला येऊन आता न्युक्लिअर फॅमिलीची पद्धत आली. नवरा-बायको आणि एखाद दुसरं मूल असलेल्या या कुटुंबातील स्त्रीला कुटुंबाच्या वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी नोकरी करणंही गरजेचं बनलंय. यात मुलं, शिक्षण, संस्कार, कुटुंब आणि कार्यालयीन आव्हानं अशा दोन्ही बाजू तिला सांभाळायला लागतायत. कालपर्यंत घरात असणारी स्त्री, अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्याने, तिची नवनवीन क्षितिजं धुंडाळण्याची आस वाढू लागली. कर्तृत्वाची नवीन क्षेत्र तिला खुणावू लागली.
तिच्या आयुष्यात आता ‘करियर’ नांवाची एक नवीनच नवलाची गोष्ट आली. गेल्या काही वर्षातील सर्वच क्षेत्रातील घटनांवर नजर टाकली, तर घराबाहेरची जबाबदारीही स्त्री समर्थपणे पेलताना दिसते. असं असलं तरी, काही जेव्हा तुरळक अपवाद वगळता, कुटुंब आणि करियर यातील कुठलीही एक गोष्ट निवडायची पाळी येते, तेव्हा मात्र स्त्री कुटुंबाला प्राधान्य देताना आढळते. पुरुषाच्या कर्तृत्वाला आभाळ मोकळं करून देताना दिसते. उगाच नाही ‘प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ असं म्हणत. आपली पुरुषप्रधान समाजव्यवस्था आता हळूहळू मागे पडताना आढळत असली, तरी अजून ती म्हणावी तशी संपलेली नाही. काही कुटुंबांमधे मात्र त्या कुटुंबातील स्त्रीतल्या पोटेन्शिअलला ओळखून तिला त्या कुटुंबातल्या सदस्यांचा खंबीर पाठिंबा मिळू लागलाय. हे चित्र अजूनही दुर्मीळ असलं, तरी आश्वासक आहे.
आजही कुटुंबाचा कणा स्त्री आहे आणि त्याचं कारण स्त्री ही जन्मदात्री आहे. निसर्गाच्या नवीन पिढीच्या जडण-घडणीची जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली आहे आणि त्याकरीता तिच्यात विलक्षण शक्तीही भरलेली आहे. तिला भले अबला वगैरे म्हणोत परंतु ती शक्तीमान आहे. कुटुंबाच्या रक्षणासाठी ती जो लढा देते, तो पुरुषाला कदापीही देणे शक्य नाही. म्हणून तर आपल्या पुराणामधे जेव्हा जेव्हा देवांवर संकट कोसळलं, तेव्हा तेव्हा देवांनी कोणत्या न कोणत्या देवीला साकडं घातलेलं आढळतं. विष्णूलाही भस्मासुराचा वध करण्यासाठी मोहिनीरूप धारण करावं लागलं होतं. देव देवांच्या मदतीला स्वस्वरूपात धावल्याची उदाहरणे अगदी दुर्मीळ आहेत..!
कुटुंबाचा पाया, कणा एवढंच कशाला तर प्रत्येक कुटुंबाचा जीवच स्त्रीमधे असतो. लहानपणीच्या गोष्टींत कसा एखाद्या राजाचा प्राण एखाद्या पोपटात ठेवलेला असायचा, तसा. स्त्रीशिवाय कुटुंब अशक्य आणि कुटुंबाशिवाय समाज अशक्य. म्हणून तर स्त्री हा केवळ कुटुंबांचाच नव्हे, तर समाजाचा आणि पर्यायाने एखाद्या देशाचाच पाया असतो. म्हणून ज्या समाजात स्त्री दुय्यम होते, त्या समाजाचं भवितव्य अवघड होते. मध्यपूर्वेतील देशात आजही स्त्रियांना, स्त्री म्हणून अनेक बंधनांना तोंड द्यावं लागतं. तेथील देश खनिज तेलामुळे समृद्ध जरी झाले असले, तरी संस्कृतीच्या पातळीवर ते अजून प्राणी अवस्थेतच आहेत. याचं कारण स्त्रीचं दमन. कुटुंब, समाज आणि देश यांचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर कुटुंब आणि स्त्री यांचं नातं ओळखून त्याप्रमाणे समाजव्यवस्था निर्माण करायला लागेल. स्त्रीमधील प्रचंड उर्जे ला वाव द्यावा लागेल अन्यथा ती ज्वालामुखीसारखी उसळून बाहेर यायला वेळ लागणार नाही.फरक एकच असेल, ज्वालामुखी विध्वंस करतो तर स्त्री काहीतरी विधायक करेल. या दोघात साम्यही आहे. ज्वालामुखीच्या विध्वंसातून नवसर्जन होते आणि स्त्री स्वतःच सर्जन आहे.
– नितीन अनंत साळुंखे
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
लेख खूप चांगला आहे , कुटुंबाचा कणा असलेली , जिच्यात कुटुंबाचा जीव आहे , कुटुंब संस्था हि केवळ स्त्रीवर अवलंबून आहे हे जरी खरं आणि वास्तव असलं तरी स्त्री घराबाहेर पडण्या आधी तिला कुटुंबात दुय्यम स्थान असायचं आणि त्यामुळेच कि काय स्वतःची ओळख दाखवण्यासाठी ती घराबाहेर पडली आणि यात फार मोठं नुकसान झालं ते पुढी पिढीचं.