शहरामध्ये बँकांचे आपसातील व्यवहार जेथे चालतात, त्याला समाशोधनगृह (Clearing House) म्हणतात. बँकेचे ग्राहक विविध बँकाचे चेक, डिव्हिडंड वारंट (Dividend Warrant), ड्राफ्ट वगैरे त्यांच्या खात्यात जमा करावयास देतात. ते चेक, डिव्हिडंड वारंट वगैरे त्या त्या बँकेला देण्यात येतात. ती बँक ते चेक, डिव्हिडंड वारंट ज्यांचे आहेत, त्यांच्या खाते नावे टाकतात. आणि ती रक्कम ते देणाऱ्या बँकेच्या खात्यात जमा करतात. तीच रक्कम बँक पुढे ग्राहकांच्या खात्यात जमा करते, क्लिअरिंग हाऊसमध्ये सगळ्या बँकांचे प्रतिनिधी आपले चेक, डिव्हिडंड वारंट घेऊन येतात. ते त्या त्या बँकेला देतात. ते प्रतिनिधी त्यांना मिळालेले, त्यांच्या बँकेवरील सर्व चेक, डिव्हिडंड वारंट घेऊन आपल्या बँकेत जातात, तेथे ते संबंधित खात्यात नावे टाकतात. जे चेक, डिव्हिडंड वारंट खात्यात पुरेसे पैसे नाहीत वा अन्य काही तांत्रिक कारणांमुळे नांवे टाकणे शक्य नाही. ते त्या त्या बँकेला परत देतात. पुढे ते चेक, डिव्हिडंड वारंट त्या त्या ग्राहकाला परत देतात. अशाप्रकारे बँकांचे प्रतिनिधी दिवसातून दोन वेळा एकत्र जमतात.
सोलापूरला क्लिअरिंग हाऊसचे काम स्टेट बँकेच्या बाळीवेस शाखेकडे होते. शाखेचे मॅनेजर क्लिअरिंग हाउसचे पदसिद्ध अध्यक्ष असत. विविध बँकांच्या प्रतिनिधीकडून क्लिअरिंग हाऊसचे काम व्यवस्थित करून घ्यावे लागे. बरेच वेळा असेही लक्षात यायचे की, ज्या बँकेत जो त्रासदायक कर्मचारी असतो त्यालाच क्लिअरिंग हाऊसमध्ये पाठविले जाते. असो.
एक दिवस बिना मॅडम केबिनमध्ये आल्या. हातात प्रत्येकी रु. 50,000/- चे चार डिव्हिडंड वारंट होते. त्या म्हणाल्या की, त्यांना ह्यांच्या खरेपणाबद्दल शंका वाटते. मॅनेजरने ते चारही डिव्हिडंड वारंट घेतले. लगेच त्याची झेरोक्स काढली. झेरोक्स मॅडमकडे दिली. मूळ (खोटे) स्वतःच्या ड्रॉवरमध्ये ठेवून घेतले. मॅडमला सांगितले की, ‘हे संबंधित बँकेला ‘उद्या पुन्हा सादर करावे’ म्हणून परत करा. झेरोक्स प्रती साक्षांकित (Attested) करून द्या. बँकेनी सादर केलेल्या मूळ प्रती आम्ही परीक्षणाकरिता ठेवून घेतल्या आहेत, असे त्यांना सांगा. ते काही म्हणाले तर माझ्याकडे पाठवा.’
मॅनेजरने लगेच स्टेनोला बोलाविले. त्याला या डिव्हिडंड वारंटच्या झेरोक्स प्रती दिल्या व त्या मुंबई मुख्य शाखेच्या डिव्हिडंड वारंट विभागाला फॅक्स करायला सांगितले. त्याने फॅक्स केल्यावर, ते तेथील पुराणिक साहेबांशी फोनवर बोलले. ते म्हणाले की, ‘आपण हे काम बाहेर (Out Source) दिले आहे. त्या कंपनीच्या माणसांना मी बोलावून घेतो व उद्या सकाळी तुम्हाला नक्की काय ते सांगतो.’
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा फॅक्स आला की, ते चारही डिव्हिडंड वारंट खोटे (Fake) आहेत. त्याचे पेमेंट करू नये.
मॅनेजरने बिना मॅडमला बोलावून फॅक्सची प्रत दिली व सांगितले, ‘बँकेचे लोक आले की, त्यांना माझ्याकडे पाठवा…’
मॅनेजरने, त्या बँकेचे लोक आल्यावर त्यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली. तुम्ही दिलेले डिव्हिडंड वारंट मी ठेवून घेतले आहेत. पोलिसांना प्रथम माहिती अहवाल (FIR) देताना हे पण द्यावे लागतील म्हणून सांगितले. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना डिव्हिडंड वारंटची रंगीत झेरॉक्स देण्यात आली.
झाल्या प्रकारची सविस्तर माहिती वरिष्ठांना दिली गेली. पुण्याहून नंदू कुलकर्णी साहेबांचा फोन आला की अशाच प्रकारच्या 3 डिव्हिडंड वारंटच्या संदर्भात आपल्या सातारा शाखेत रु. 1,50,000/- ची फसवणूक उघडकीस आली आहे. मॅनेजरने संध्याकाळी सर्वांची एक मिटिंग बोलावून बिना मॅडमचे, त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेबद्दल, अभिनंदन, कौतुक केले.
बँकेनेसुद्धा याची दखल घेतली. बिना मॅडमला मुंबईला बोलावून ‘सतर्कता पुरस्कार’ दिला. बँकेला होणारा धोका टळला व लाखाची गोष्ट संपली.
–मीना जोशी
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply