स्टेशनवर शिरतानाच प्रवाशांना जी पहिली व्यक्ती भेटते ती म्हणजे लाल शर्ट व त्यावर पितळी बिल्ला असलेला हमाल. त्यांचं दुसरं नाव आहे ‘कुली’; परंतु ते नाव त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्या संस्थेनं हमालांना ‘पोर्टर’ ते म्हणावं अशी सातत्यानं मागणी केलेली आहे.
‘कुली’ या शब्दाचा हिंदीतील अर्थ ‘दिवसभर काबाडकष्ट करणारा कामकरी’ असा आहे. गुजरातमध्ये त्या नावाने एक जमात आहे. उर्दू, तुर्की भाषांत गुलामांचं नाव ‘कुली’ असे, तर चीन देशामध्ये ‘अतिशय कष्टाचं काम करणारी दुर्लक्षित जमात’ असा उल्लेख आहे.
१६ व्या शतकात संपूर्ण अशिया, आफ्रिका या खंडांत हजारोंच्या संख्येनं विविध कामांवर कुली मेहनतीची कामं करीत. चिनी कुलींच्या मदतीनं अमेरिका व कॅनडात संपूर्ण रेल्वे बांधणी पूर्ण होऊ शकली. ब्रिटिशांनी त्यांचा उपयोग चहा व रबराच्या मळ्यांत केला होता.
भारतात रेल्वे सुरू झाली आणि पाठोपाठ जड बोजे उचलण्यासाठी स्टेशना-स्टेशनांवर हमालांचं आगमन झालं. भारतात ब्रिटिश व त्यांचं अनुकरण करणारे उच्चभ्रू भारतीय प्रवासी हे रेल्वेच्या प्रवासात घरातील असंख्य वस्तू नेत असत. होल्डॉल, पोत्यात घातलेली स्वयंपाकाची भांडी, पाणी नेण्याकरता फिरकीचे तांबे नाहीतर खुजे, अनेक कप्पी डबे, भल्याथोरल्या पत्र्याच्या ट्रंका, हे सामान वाहून नेण्यासाठी हमालांची गरज असे. पुढे जसजशी प्रवाशांची गर्दी वाढू लागली, तसतशी डब्यात बसण्यासाठी जागा मिळविणं अशक्यप्राय झालं आणि ती समस्या हमाल मंडळी मोठ्या शिताफीनं सोडवू लागली. गाडीच्या डब्यांची संख्या वाढू लागली तेव्हा आपला डबा शोधणं शिकलेल्या माणसालासुद्धा कठीण जाऊ लागलं. धार्मिक यात्रा वाढल्या, प्रवासी कंपन्या आल्या आणि हमालांचं भाग्य फळफळलं. विशेषत: मधल्या स्टेशनातून गाडीच्या डब्यात शिरण्यासाठी हमालांची नितांत गरज भासू लागली. यार्डातून गाडी मुख्य स्टेशनात शिरतानाच रिकाम्या गाडीच्या डब्या-डब्यातून ‘लाल डगलेवाले जागांचा ताबा घेऊ लागले. जो प्रवासी जास्त पैसे देणार त्याच्या सेवेसाठी हमालांची गर्दी होऊ लागली. हमाल ही स्टेशनवरची एक अति महत्त्वाची व्यक्ती बनू लागली.
गाडी स्टेशनामध्ये शिरते न शिरते तोच हमाल डब्याचा ताबा घेऊ लागले. आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना सामानासकट घोडागाडी, टॅक्सी, ऑटारिक्षापर्यंत नेऊन सोडू लागले. फार पूर्वी तर प्रवाशाचं घर किंवा हॉटेल स्टेशनच्या आसपास असल्यास हमाल अगदी थेट निवासस्थानापर्यंत सामान पोहोचविण्यासही मदत करू लागले. कामाची व्याप्ती इतकी वाढत गेली, की लाल डगलेवाल्यांची संख्या अपुरी पडू लागली. बेकायदेशीर हमालांची दुसरी फौज तयार होऊ लागली. बेकायदा हमालांना रेल्वेची मान्यता नव्हती. त्यांच्याजवळ क्रमांक असलेला बिल्ला नसे. लाल डगलेवाल्या बिल्लाधारी हमालांची शिफारस रेल्वेच्या प्रत्येक उद्घोषणेतून केली जाई. अधिकृत हमालांकडून सामानाच्या पळवापळवीचा प्रसंग घडल्यास त्यांना क्रमांकावरून पकडणं शक्य होत असे, परंतु पुढेपुढे हमालांची गरज इतकी वाढली, की अधिकृत व अनधिकृत अशा दोघांनाही पुरेसं काम आणि दाम मिळत होता.
गाड्यांचे क्रमांक, डब्यांची जागा, गाडी किती उशिरानं येणार, यांचं ज्ञान हमालाइतकं दुसऱ्या कोणाला असणं शक्यच नाही. तिकिटावर नमूद केलेल्या डब्याजवळ सर्व सामानासह हमाल जाणार याविषयी मनात कधीही शंका बाळगण्याचं कारण नाही. गाडीला उशीर असेल तर तो सामान ठेवून कुठेतरी गायब होतो, पण गाडीचं इंजिन स्टेशनमध्ये शिरताना तो वेळेवर आपल्याजवळ येणार हे शंभर टक्के नक्की असतं. हमाली ठरविणं, त्यांच्याशी भाव करणं ही मात्र एक कला आहे, त्याचे उपजत ज्ञान पट्टीच्या प्रवाशाकडेच असतं. बहुसंख्य प्रवासी शेवटी घासाघीस करीत त्याच्यापासून लवकर मोकळे होतात. तुमचं सामान पळविण्यात त्याला कधीही स्वारस्थ नसतं. तुमच्याकडून भरकन पैसे घेऊन तो दुसरं गि-हाईक शोधण्याच्या मार्गी लागतो.
रेल्वेबोर्ड हमालांकरता काही शिबिरं भरवीत असतं. असं एक शिबीर अलाहाबाद स्टेशनावर साठ हमालांकरता घेण्यात आलं होतं. गावातील सर्व धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती त्यांना देण्यात आली, जी त्यांनी आपल्या प्रवाशांना द्यावी हा त्यामागे उद्देश होता. त्या माहितीचा फायदा घेऊन प्रवासी त्या वेळात भेट देण्याबाबत मनातल्या मनात काही स्थळं पक्की करू शकतो. प्रवाशांनादेखील गावातील हॉटेल्सची उत्तम माहिती हमालांकडून मिळते.
लहानपणापासून शाळेत ‘हमाल’ या विषयावर बरेचदा निबंध लिहावयास सांगत. त्यात हमाल म्हणजे लुच्चा, फसविणारा अशी प्रतिमा उभी केली जात असे. काही वेळा पोटापाण्याकरता ते दादागिरी करतात, पैशांबाबत फसवतात ते हे खरंही आहे, पण असं असलं तरी त्यांच्याही अनेक समस्या आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत बोजे उचलण्याचं काम केल्यावर त्यांना कसेबसे महिना ५ ते ६ हजार रुपये मिळतात. काही वेळा चाळीस किलो वजनदेखील उचलून घेऊन जावं लागतं. जेवण करण्यासाठी धड जागा नसते. रिकाम्या प्लॅटफॉर्मवरील नळाजवळ डबा खायचा. इंजिनांची व गाड्यांची ये-जा चालूच असताना जिथे डबा खाल्ला तिथेच कुठेतरी वामकुक्षी करायची, हे प्राक्तन हमालांना चुकत नसतं.
काही हमाल रात्रपाळी करतात. स्टेशनवरील या हमालांच्या गटावर मुकादम असतात. हे मुकादम हिशोब ठेवतात, हमालांसाठी पतपेढी चालवितात.
स्टेशनजवळील मंदिरात वा मशिदीत ते आपले सण साजरे करतात.
नवी दिल्ली, हावरा स्टेशन, येथे हमालांची संख्या हजारावर असून, अनेक नवीन गाड्या सुरू झाल्यानं या जागा हमालीच्या धंद्यास उपयुक्त आहेत. प्रत्येक राज्यातील राजधानी एक्सप्रेस दिल्ली मुक्कामी येतात, त्यामुळे हमालांचा धंदा चांगला होतो; परंतु छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्ही.टी.) स्टेशनवरील हमालांची परिस्थिती मात्र हलाखीची आहे. दूर पल्ल्याच्या अनेक गाड्या आता दादर व कुर्ला टर्मिनस येथून सुटत असल्यानं या स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत आणि त्यामुळे इथल्या हमालांची मिळकतही कमी झाली आहे.
गर्दीच्या समुद्रातून वाट काढत प्रवाशांना गाडीच्या डब्यापर्यंत पोहोचविण्याचं कौशल्य असणाऱ्या, उन्हा-पावसात राबणाऱ्या या समाजघटकाच्या आर्थिक व आरोग्यसमस्येकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करतात. ते रेल्वेचे कर्मचारी म्हणून गणले जात नसल्याने नोकरीचे कोणतेही फायदे त्यांना मिळत नाहीत. फक्त वर्षातून एकदा गावी जाण्यासाठी साध्या आरक्षण नसलेल्या डब्यातून प्रवास करण्याचा पास त्यांना मिळतो.
आता काळ बदलला आहे. स्ट्रोल बॅग्जमुळे (चाकं असलेल्या) प्रवासी आपलं सामान स्वत:च खेचून नेतात. पर्यायानं सर्वच हमालांना एकसारखं काम व पैसे मिळतील याची शाश्वती नसते. यावर उपाय म्हणून सर्व हमालांना मिळणारी मिळकत एकत्र केली जाते. तत्पूर्वी, त्यांतील ४० टक्के रक्कम स्वत:ची मिळकत म्हणून बाजूला ठेवली जाते व नंतर बाकीची रक्कम सर्वांमध्ये विभागली जाते. या कामाकरता एक मुकादम नेमलेला असतो. हे सर्व लोक पैशांच्या व्यवहाराबाबत प्रामाणिक असतात. मुंबई सेंट्रल स्टेशनवर असा उपक्रम राबविला जातो. मुंबईतील बरेचसे हमाल वारकरी संप्रदायाचे आहेत. ते स्टेशन परिसरात अनेक उत्सव साजरे करतात. सर्वच हमाल अशिक्षित आहेत असं नाही, तर काही जण पदवीधरदेखील आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून ते स्टेशनवर हमाली करतात व पुढे रेल्वेशी रोजचा संबंध आल्यानं एखादे वेळी रेल्वेत नोकरी मिळेल या आशेवरही ते हमालीचं काम करतात. पाठीचा मणका, गुडघे, विविध सांधे यांच्या आजारानं त्यांतील अनेक जण ग्रस्त असतात, पण वैद्यकीय सेवेसाठी त्यांची रेल्वे हॉस्पिटलमध्ये सोय होत नाही. बरेच वेळा त्यांना स्वत:चेच पैसे खर्चावे लागतात. एकंदरीत हमालांच्या समस्यांकडे गांभीर्याने कोणाचेच लक्ष नाही. पत्र्याच्या ट्रंका, होल्डॉल, पाच कप्पी पितळी डबे, फिरकीचे तांबे, खुजे, इतिहासजमा झाले आहेत आणि काही वर्षांत लाल डगलेवाला हमाल काळाच्या पडद्याआड जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं झालं, तर भारतीय रेल्वेचा एकेकाळचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ अस्तंगत होईल.
लाल डगल्याच्या रेल्वे हमालाचा होणारा कायापालट रेल्वेहमाल वा कुली’ म्हणजे डोक्यावर, खांद्यांवर सामानाचे ओझे उचलणारा प्रवाशांचा आज्ञाधारक सेवक हे त्याचे रूप हळूहळू पालटणार असून, त्याला ‘सामान सहाय्यक’ असे नाव असेल व त्याच्या दिमतीला विमानतळासारख्या ट्रॉलीज असतील. त्याला नवीन त-हेचे कपडे दिले जातील, ज्यांवर विविध कंपन्यांच्या जाहिराती असतील. पंतप्रधान मोदींच्या मते आज क्रिकेटच्या स्टंपवर, खेळाडूंच्या टी-शर्टवर जाहिरात असते, तर या साहाय्यकांनाही तसेच कपडे द्यावे. त्यांमधून रेल्वेला उत्पन्न मिळेल आणि हे ‘सामान सहाय्यक’ स्टेशनवर प्रवाशांच्या दिमतीला हजर राहतील; शेवटी या ‘सामान सहायकां’चा दरही ठरवावाच लागेल, कारण प्रवासी हुज्जतीला कंटाळतो.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply