सर, कुणीतरी आवाज दिला,मी मागे वळून पाहिले तर गावातील भावकीमधला एक मनुष्य होता.एरवी नोकरीच्या ठिकाणी ‘सर’ माझ्यासाठी स्वाभाविक होते परंतु गावामध्ये सर,ते देखील जवळच्या व्यक्तींकडून! थोडे नवल वाटले कारण ती व्यक्ती मला कायम माझ्या नावाने’ नारायण’ नावानेच हाक देत असे. शिक्षक झालो आणि मला गावातील लोक देखील सर म्हणू लागली.सर , हे लेबल मला असे काही चिकटले आहे की मरणोपरांत देखील ते कायम राहील.
लेबल, उपाधी,बिरुद,पदनाम एकदा चिकटले की अविभाज्य भाग होऊन जाते, काही केल्या ते सूटत नाही, नोकरीतून निवृत्त झाले तरी त्याचा ससेमीरा साथ सोडत नाही. लेबलमध्ये एकदा मनुष्य अडकला की तो त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.चोविस तास लेबल घेऊन जगणारी माणसे आपले जीवन हरवून बसतात.केवळ लेबल जपण्यात आयुष्य खर्ची घालतात.जन्मासोबत नाव देखील नसते,लेबल तर फारच खतरनाक.कुणी एखाद्या छोट्या मोठ्या वर्तमानपत्रात काम करत असेल तर सगळे त्यास पत्रकार म्हणतात.आफिसात जे साहेब आहेत ते कुठेही साहेबच कसे असतात , हे मला कळत नाही.बायकोनेही साहेब म्हणून हाक मारावी ह्याचे नवल वाटते , एवढे कमी म्हणून काय बायकोला साहेबीन म्हंटले जाते. अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदनावाने ओळखले जाते,हाक मारली जाते किंवा तसे लिहिले जाते.किमान निवृत्ती नंतर तरी हे पदाचे जोखड बाजूला सारले पाहिजे.
आपण केवळ त्या पदासाठी जगत नसतो, किंवा त्यासाठी अवतार घेतलेला नसतो.कार्यक्षेत्रापूरते व कार्यकाळापूरते हि संबोधणे बरी वाटतात परंतु हे लेबल बाजूला सारता आले पाहिजे.भोवती लेबलचे कुंपण घातले की मनुष्य, मनुष्य राहत नाही.जीवनाच्या विविध
भूमिकेत वावरता आले पाहिजे.मी पदाने कुणीही असलो तरी मी एक मनुष्य आहे ,हे विसरता कामा नये. शाळेत जरी मी शिक्षक असलो तरी बाहेर मी एक व्यक्ती आहे.मलाही इतर बाबींमध्ये आवड आहे.सर, लेबल लागले म्हणून त्याचं भूमिकेत सर्वत्र मिरवायचे हे मला अजिबात आवडत नाही.कुणीतरी आपणास भाऊ,दादा म्हणावं,कुणी अरेतूरे बोलावं, कुणीतरी जवळच्या चारदोन शिव्या हासाडाव्यात तेव्हा आपण जगत आहोत असे वाटते.आपले वागणे असे असावे की आपण नेमके काय करतो हे कार्यक्षेत्रा बाहेर कुणाला जाणवू नये,कायम लेबलच्या आविर्भाव हा हास्यास्पद वाटतो. कुणीतरी कधीतरी सरपंच किंवा चेअरमन होता तर त्यास आयुष्यभर त्याच लेबलने ओळखतात.
बांधकाम करणाऱ्या लोकांना ‘ मिस्त्री ‘ हे लेबल लागले की मग तो नवरदेव असला तरी मिस्री. काही लेबल तर असे असतात की माजी शब्द लाऊन पुढे अनेक वर्षे लेबल वापरले जाते. मुलांनी तरी ‘ बाबा ‘ म्हणावं.तेही लेबलनेच हाक मारतात. कुणी शाहीर असला की चिकटलेच लेबल.मग तो चांगला स्वयंपाकी असेल तरी शाहीरच! कधीकाळी प्राचार्य असले तरी आमरण प्राचार्यच.बरे इतरांनी म्हटले तर वेगळी गोष्ट ते.स्वत:च तशी ओळख सांगतात.पदे कार्यक्षेत्रापूरती मर्यादित असतात, सगळीकड त्याचा शिरकाव अयोग्य आहे.बस कंडक्टरला फक्त बसमध्येच कंडक्टर म्हणावयास हवे मात्र लग्न पत्रिकेवर देखील त्याचे पद,लेबल लावले जाते.
बदलत्या भूमिकेत गेले की लेबल निघाले पाहिजे.सर फक्त शाळेत.साहेब आफिसात, कंडक्टर बसमध्ये इतर ठिकाणी हे लेबल काढता आले तरच माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त होतो.
– ना.रा.खराद
Leave a Reply