एका अथांग विश्वातल्या एका आकाशगंगेतल्या एका सूर्यमालेतल्या एका ग्रहावरच्या, कोट्यावधी सजीवांमधील एक प्रजाती म्हणजे ‘माणूस’. उत्क्रांतीत लाभलेल्या मेंदूचा वापर करीत प्रगतीचा वेग वाढवत नेला या मानव समुहाने. थोड्याच काळात बौध्दिक व भौतिक पातळीच्या सीमा गाठण्याच्या वल्गना हा समूह करू लागला. Nature आणि Nurture या दोन्हींचा समतोल राखण्याचे भान तो या घोडदौडीत विसरला. ‘Nature काय? किस झाडकी पत्ती’ ही प्रवृत्ती वाढत गेली. अधून मधून भूकंप, महापूर, प्रदूषण अशातून निसर्ग (Nature) आपलं रूप दाखवू लागला. साडेसात अब्जांमधील काही हजार जीवांची, दोनशेमधील दोन-चार भौगोलिक प्रदेशांची, अशी उत्पात क्षेत्राची व्याप्ती गंभीरपणे घेतली गेली नाही. नाही म्हणायला प्रदूषणाविषयी जनजागृती उच्च पातळीवर पोचली म्हणून दुर्लक्ष करणे कोणासही परवडणारे नव्हते. परिणामी विचार विनिमय होऊन उपाययोजना सिध्द झाली. प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्याची वेळ येताच अंग काढून घेणारे टीकेचे धनी झाले.
मानव समुहाने एव्हाना प्राणी वर्गातील अन्य प्रजाती व वनस्पती यांना पूर्णपणे कह्यात ठेवले होते. बाकी सगळे निर्जीवच आहे. त्यांची कशाला चिंता करायची? ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे उत्क्रांतीचे एक सूत्र आहे. ‘बळी तो कान पिळी’ हे दुसरे सूत्र. जंगलातल्या वणव्याचे परीणाम म्हणून मानवी वस्तीला धोका ठरू शकणार्या प्राण्यांच्या सामुहिक हत्येचा निर्णय हा दूसर्या सूत्राचा वापर. एका विस्तीर्ण भूभागावर राहणारांनी ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या पहिल्या सूत्राचा अतिरेक केला. मानवेतर जीव हे तेथील रहिवाशांचे भक्ष्य बनले.
Nurture चा महिमा वाढू लागला. दबलेला Nature उसळ्या मारू लागला. ‘बळी’ने याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. गडाच्या दारांवर हत्तीच्या धडका बसल्या, बुरुजांवर गोळे बरसले. तरीही बळी तटबंदीत सुरक्षित राहिला. यापूर्वी सूक्ष्म जीवांपासून महाकाय सजीवांपर्यंतची आक्रमणे परतविण्यात मानव समाज यशस्वी झाला होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती तसेच स्वतःच्या मूर्खपणाने निर्माण झालेल्या संकटांपासून ‘गांभिर्याने घेण्यासारखे काही नाही’ हा समजही दृढ झाला होता. एका मानव समुहाने निर्माण केलेला सांस्कृतिक ठेवा होता दोन महाकाव्यांचा. त्यात ‘Trojan Horse’ ची कथा आहे. एक निराळी खेळी पटावर आकार घेत होती. मानव समूहाच्या बेताल वर्तनामुळे Trojan Horse तटबंदीतून कसा आत आला ते कोणासही कळले नाही.
या Trojan Horse च्या पोटाखालील झडपेतून बाहेर पडलेली फौज हि कोणा सजीवांची नव्हती. आक्रमण झाले ते निर्जीव प्रथिनांकडून. त्यांना पेशींसारखी विभाजन कला अवगत नव्हती पण प्रतिस्पर्ध्याला गलितगात्र करण्याची क्षमता होती त्यांच्याकडे. प्रगत जीवाची प्रतिकारशक्ती कोलमडून जाईल एवढी ताकद होती त्यांच्याकडे. अतिविकसित सजीव विरुध्द सूक्ष्म निर्जीव अशी होती समोरासमोर ठाकलेली सैन्यदले. केवढी विसंगती? अकरा अक्षौहिणी विरुध्द सात अक्षौहिणी, तीस हजार विरुध्द तीनशे अशा विषम लढाया यापूर्वी लढल्या गेल्या आहेत. पण आता भुतकाळात रमणे परवडणारे नव्हते. मानगुटीवर ‘भविष्यकाळ’ बिघडविणारे भूत बसले होते. नको असलेल्या शेजार्यांनी येऊ नये म्हणून भिंत उभारण्याची गरज एका समुहाला राहिली नाही. कारण यायला हवे असलेले सुध्दा येणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली. ‘आपल्या मदतीवर उर्वरित जग विसंबून आहे’ अशी यांची दर्पोक्ती आता ‘वाढ ना गे माय’ या लाचारीत बदलली. समृध्दी, शिस्त व स्वच्छता यांच्या परम सान्निध्यात राहणार्या अनेक समुदायांना, ‘तगण्यासाठी हे पुरेसे नाही’ याची जाणीव झाली. निर्जीवाला मारता येत नाही हे सत्य आहे. असा निर्जीव जर धोकादायक असेल तर आपणच त्याच्यापासून दूर राहिले पाहिजे हे त्रिवार सत्य आहे. नारायणास्त्राला ‘नमस्कारा’ने निष्प्रभ केले, प्रतिअस्त्राने नाही. या निर्जीव प्रथीनाला गरज असते एका यजमानाची (Host). त्याला पथारी पसरायला मिळाली की ‘भटाला दिली ओसरी’ चा प्रत्यय येतो. म्हणून याच्यापासून चार हात लांब राहिले तर हा शत्रू प्रभावहीन ठरतो. सध्या या शत्रूशी मुकाबला करण्यायोग्य परिस्थितीत एका ठिकाणचा मानव समूह आहे. यासाठी लागणारी एकजूट या समूहाने दोन प्रसंगातून सिध्द केली आहे. त्यांच्याकडून यापुढेही अशीच अपेक्षा आहे. केवळ पहिल्यांदा आणि एकदाच विशेष नामे वापरतो. ‘कोरोना’ शी यशस्वीपणे लढा देऊ शकेल असा हा मानव समुदाय म्हणजे भारत देश.
! जय हिंद !
— रविंद्रनाथ गांगल
Leave a Reply