नवीन लेखन...

लढा सीमेचा- लढा अस्मितेचा !! (भाग २)

व्यर्थ न हो बलिदान !

बेळगावसह मराठी बहूभाषिक सीमाभाग कर्नाटकात विलीन केल्याची घोषणा  १६ जानेवारी १९५६ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. सीमा भागातील मराठी जनता राज्यकर्त्यांच्या कुटील राजकारणाची बळी ठरली. शासनाचा हा निर्णय स्वाभिमानी मराठी जनतेच्या जिव्हारी लागला. माय-लेकरांची ताटातूट झाल्यानंतर जशी दोन जीवांची तडफड होते, तसेच कांहीसे लोकांचे झाले.

संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्वप्रथम बेळगावात झाला. परंतु त्याच बेळगावला माय महाराष्ट्रापासून पोरके व्हावे लागले. हे शल्य स्वाभिमीनी मराठी जनतेच्या जिव्हारी लागले. अन्यायाने बेभान झालेली जनता रस्त्यावर उतरली. १७ जानेवारीला बेळगावसह संपूर्ण सीमा भागात प्रचंड निषेध मिरवणुक निघाली. सर्व जाती, धर्माचे लोक भाषेच्या मुद्यावरून एकत्र आले. त्यांच्या मनात होतं माय महाराष्ट्रापासून दूरावल्याचं दु:ख, मातृभूमीच्या विरहाची वेदना नि ताटातुटीस कारणीभूत असलेल्या शासनकर्त्यांबद्दल रोष! भव्य निषेध मिरवणुक काढून सरकारच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे| नही तो जेल मे।‘ असा निर्धार करून मराठमोळ्या मावळ्यानी सरकारला जणू आव्हानच दिले.   ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ची घोषणा आसमंतात निनादू लागली.

मराठी माणसाचा हा निर्धार नि संघटित उठाव पाहून कानडी पोलिस बिथरले. आंदोलन मोडून काढण्याचा त्यानी निर्धार केला. आंदोलनकर्त्यांवर बेछूट लाठीमार सुरू झाला. त्यात कित्तेकजण जखमी झाले. परंतु मराठी माणसाचं मन त्यांच्या लाठीपेक्षाही अधिक कणखर होतं. पोलिसांच्या लाठीनं ते विचलित होणारं नव्हतं. छत्रपती शिवरायांच्या जयजयकारानं त्याला उबारी मिळत होती, नसानसात स्फूर्ती येत होती. लाठ्याच काय तुमच्या संगीणीच्या गोळ्याही झेलू; पण आमचा निर्धार सोडणार नाही ….. असं पोलिसांना ते ठणकावून सांगत होतं.

मराठी माणसाच्या निर्धारांनं तत्कालीन म्हैसूर सरकार बेभान झाले. आंदोलन मोडून काढण्याचा पोलिसांना आदेश आला. कन्नड सरकारची हुजरेगिरी करणाऱ्या पोलिस प्रमुखांनी गोळीबाराचा आदेश दिला. परंतू स्वाभिमानी मराठी माणूस डगमगला नाही. माय महाराष्ट्राच्या प्रेमापोटी असंख्य युवक बलिदान देण्यास सरसावले. मारुती बेन्नाळकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, मधू बांदेकर या सारख्या युवकांनी आपल्या निधड्या छातीवर पोलिसांच्या गोळ्या झेलल्या नि माय महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं. माय महाराष्ट्रासाठी त्यांनी रक्त सांडलं. त्यांच्या रक्ताची शपथ घेऊन असंख्य युवक घराबाहेर पडले. आंदोलनाने उग्र रूप धारण केलं. संपूर्ण सीमाभागात त्याचे पडसाद उमटले.

बेळगावात झालेल्या गोळीबाराच्या प्रतिक्रीया निपाणीतही उमटल्या. लोक घोषणा देत घरा-घरांतून बाहेर पडले. 18 जानेवारी 1956 रोजी निपाणीत प्रचंड निषेध मिरवणुक निघाली, लोक निदर्शने करू लागले. आंदोलनकर्त्या तरुणावर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यात कित्त्येकजण जखमी झाले. त्याचा जाब विचारण्यासाठी महिलाही घराबाहेर पडल्या. महिलांचा विरोध पाहून निर्दयी पोलिस खवळले. त्यांनी बेछूट गोळीबार केला व त्यात कमळाबाई मोहिते ही तरुणी गतप्राण झाली.

सीमाप्रश्नाच्या होमकुंडात या महात्म्यानी सर्वप्रथम आपली आहूती दिली. त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान मराठी भाषेच्या नि संस्कृतिच्या रक्षणासाठी होते. कन्नडच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी होते. त्यांनी बलिदान दिले, कित्तेकजण जखमी होऊन कायमचे अपंग बनले. या असह्य वेदना सहन करत, लढत कांहीजण आता हे जग सोडून निघून गेले, तर अधूर स्वप्न मनात ठेऊन कांही जण  आशाळभुतपणे नव्यापीढीकडे आज पहात आहेत. मुकपणेच त्यांच्या नजरा सांगताहेत, ‘ पोरांनो, आम्ही लई सहन केलंय. जे गेले त्यांचं नि आमच एकच स्वप्न हाय; माय महाराष्ट्रात जायचं! कराल नां ते पुरं?’

त्यांच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेतृत्वाखाली गेली ६५ वर्षे अखंडपणे लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे.  मराठी माणसाचा हा संघर्ष सत्तेसाठी नाही तर, भाषेसाठी, संस्कृतीसाठी आहे. माय महाराष्ट्रात जाण्यासाठी आहे.

राजकीय स्वार्थापोटी मराठी माणसात फूट पाडून हे आंदोलन कायमचे बंद पाडण्याचा घाट कर्नाटक सरकारने चालविला आहे. राष्ट्रीय पक्षाचे नेते राष्ट्रीयत्वाचे धडे देऊन मराठी माणसाला आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपमतलबी नत्यांचे कुटील कारस्थान ओळखून मराठी माणसाने आता वेळीच सावध झाले पाहिजे. नाहीतर सगळेच गमावून बसावे लागेल … कायमचे! हुतात्म्यांनी बलिदान दिले ते माय मराठीच्या रक्षणासाठी… संस्कृतीच्या संवर्धनासाठी! शेवटी एकच प्रार्थना …

‘व्यर्थ न हो बलिदान !’

(क्रमश:)

— मनोहर (बी. बी. देसाई)

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..