१८२० साली इटलीमध्ये फ्लाॅरेन्स येथे नाइटिंगेलचा जन्म झाला. वयाच्या ३३व्या वर्षी १८५३ मध्ये झालेल्या क्राइमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची तिने अहोरात्र शुश्रुषा केली. रात्री हातात दिवा घेऊन जखमी सैनिकांना शांत झोप लागली आहे का? हे ती प्रत्येक खाटेजवळ जाऊन पहात असे. इतकी तिने त्या जखमी सैनिकांची सेवाभावाने काळजी घेतली म्हणून तिला ‘लेडी विथ द लॅम्प’ असे संबोधले जाऊ लागले. १३ ऑगस्ट १९१० साली वयाच्या ९०व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. तिच्या शुश्रुषेच्या अलौकिक कार्याबद्दल तिचा १२ मे हा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून पाळला जातो.
परिचारिकेला इंग्रजीमध्ये नर्स म्हटले जाते. डाॅक्टरच्या हाताखाली नर्स, ही मदतनीस म्हणून काम करीत असते. पेशंटला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून नर्स त्या पेशंटची काळजी घेत असते. डाॅक्टरांची व्हिजीट झाल्यावर त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार पेशंटला इंजेक्शन, औषधे वेळेवर देण्याचे काम नर्सचे असते. पेशंटच्या हाकेला नर्सच धावून येत असते. पेशंट बरा झाल्यावर तो घरी जातो. पेशंट नर्सच्या संपर्कात राहिल्यामुळे ती त्याला सहसा विसरत नाही. तिच्या सेवाभावी वृत्तीमुळे दोघांत एक जिवाभावाचं नातं निर्माण झालेलं असतं.
माझा मात्र लहानपणापासून फक्त डाॅक्टरांशीच संपर्क आलेला आहे. जेव्हा कधी मी आजारी पडायचो तेव्हा आई मला आमच्या फॅमिली डाॅक्टरकडे घेऊन जायची. तिथे ‘टिपिकल’ कंपाउंडरच असायचा. तो कडू गोळ्यांची खलबत्त्यात कुटून पावडर करायचा व त्या पावडरीच्या कागदी पुड्या करुन द्यायचा. डोसांच्या खुणांसाठी कागदी पट्टी चिकटवलेल्या काचेच्या बाटलीत लाल रंगाचं पातळ औषध द्यायचा. त्या दवाखान्यात नर्स नसली तरी ‘तोंडावर बोट’ ठेवलेल्या नर्सचा फोटो दर्शनी लावलेला असायचा. त्या फोटो खाली लिहिलेलं असायचं ‘शांतता राखा’
हिंदी चित्रपट पहाताना काही सिनेअभिनेत्रींनी केलेल्या नर्सच्या भूमिका दीर्घकाळ लक्षात राहिल्या. त्यातील मला भावलेल्या या दोन परिचारिका…
१९६९ साली प्रदर्शित झालेला ‘खामोशी’ हा कृष्णधवल चित्रपट राधा (वहिदा रेहमान) या परिचारिकेभोवती गुंफलेला आहे. देव कुमार (धर्मेंद्र) या मनोरुग्णावर उपचार करताना राधा त्याच्यात नकळत गुंतत जाते. तो बरा झाल्यावर निघून जातो मात्र राधा त्याला सहजासहजी विसरु शकत नाही. या मानसिक धक्क्यातून सावरेपर्यंत अरुण चौधरी (राजेश खन्ना) हा नवीन पेशंट दाखल होतो. तिची इच्छा नसतानाही स्टाफच्या आग्रहाखातर ती अरुण चौधरीची जबाबदारी घेते. अरुण, राधाकडे एक नर्स म्हणूनच पहात असतो. आपला भूतकाळ सांगून, त्याला विश्र्वासात घेऊन, राधा अरुणला बरं करते. अरुणच्याही बाबतीत काळजी घेऊनही ती त्याच्यामध्ये गुंतते. उपचारा दरम्यानच्या मानसिक तणावामुळे राधा स्वतः पेशंट होते. अरुणच्याच खोलीत तिच्यावर उपचार चालू होतात. जेव्हा अरुण चौधरीला हे समजतं तेव्हा तो राधा बरी होण्याची प्रतीक्षा करीत राहतो…
वहिदा रेहमानच्या सिने कारकिर्दीतील ही तिची सर्वोत्कृष्ट भूमिका आहे. तिने आपल्या अभिनयातून एक आदर्श परिचारिका उभी केली आहे!!
१९७१ साली याच राजेश खन्नाचा ‘आनंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए’ असं सांगणाऱ्या आनंदला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली तरीही त्याला आपण विसरु शकत नाही…
‘लिम्फो सरकोमा ऑफ द इंन्टस्टाईन’ या असाध्य आजाराने ग्रस्त झालेल्या आनंदवर अमिताभ (बाबूमोशाय) आपल्या हाॅस्पिटलमध्ये उपचार करीत असतो. आनंदलाही माहीत असतं की, आपण सहा महिन्यांचेच सोबती आहोत. तो त्या उरलेल्या दिवसांत सर्वांना ‘आनंद’ देत राहतो. अनोळखी जाॅनी वाॅकरला ओळखीची हांक मारुन बोलावतो. त्याच्याशी मैत्री करतो.
हाॅस्पिटलमधील नर्स डिसाला (ललिता पवार) जेव्हा आनंदच्या आजाराबद्दल कळतं, तेव्हा ती भावविवश होऊन जाते. डिसा आनंदमध्ये मुलाला पाहते, तर आनंद डिसाला, आई मानू लागतो. एका प्रसंगात तो डिसूझाला म्हणतोही, ‘पुढच्या जन्मी, मी तुझ्या पोटी जन्म घेईन.’ हे ऐकून डिसा बरोबर प्रेक्षकांचेही डोळे पाणावतात. त्या सहा महिन्यांत डिसा आनंदची शुश्रुषा स्वतःच्या मुलासारखी करते.
शेवटी आनंद जगाचा निरोप घेतो. उपस्थित असलेले सर्वजण दुःखी होतात, मात्र डिसाचे दुःख हे परिचारिकेचे नसून एका आईचे असते…
आजच्या ‘जागतिक परिचारिका दिना’ निमित्त या कोरोना महामारीतही रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांना विनम्र अभिवादन!!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
१२-५-२१.
Leave a Reply