आता हे काय नवीन ?
असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल .
…तर ते एक छोट्याशा हॉटेलचे नाव आहे .
अर्थात ही जाहिरात नाही त्या हॉटेलची किंवा तिथल्या खाद्यपदार्थांची !
मग हे लगन गंधार मध्येच कुठं आलं , असा एक सवाल पैदा होऊ शकतो .
तर त्यासाठी थोडा प्रवास करायला हवा . रत्नागिरीहून कोल्हापूरला जाताना , आंबा घाट चढून गेल्यावर , थोड्या अंतरावर उजव्या हाताला एक अगदीच छोटेसे हॉटेल दिसते , त्याचे नाव लगन गंधार . खूप छान काव्यात्मक नाव असलेले हॉटेल ,जसे नावामुळे लक्षात राहिले ,तसे दोन वर्षांपूर्वीच्या प्रसंगामुळे लक्षात राहिले आहे. ज्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर ते हॉटेल आहे , तो डोंगर दोन वर्षांपूर्वी, अतिपावसामुळे त्या हॉटेलवर कोसळला होता . प्रचंड आर्थिक नुकसान होऊनही ते हॉटेल पुन्हा दिमाखात उभे होते .
पण त्यापेक्षासुद्धा माझ्या लक्षात राहिली, ती रसिकता , संवेदनशीलता आणि कुमार गंधर्वांच्या गाण्यावरील प्रेम !
अरेच्चा !
आता हे काय नवीन ?
मग सगळं सांगायलाच हवं मला …
तुम्ही आंबा घाटातील पाऊस अनुभवलाय ?
प्रचंड धुकं . सोसाट्याचा वारा . आडवातिडवा कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शरीर गोठवून टाकणारी बोचरी थंडगार हवा …
पुण्याहून येताना त्यादिवशी असंच वातावरण होतं. किंबहुना जास्तच . पुढचं काही दिसत नव्हतं . अशा परिस्थितीत गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता . त्या अंधुक गूढ वातावरणात लगन गंधारचा बोर्ड दिसला आणि गाडी थांबवली . पळतच हॉटेलात घुसलो . त्या गारठ्यात गरम चहाची तल्लफ आली होती . पण ऑर्डरचे शब्द तोंडात येण्यापूर्वी कानात कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे स्वर घुमू लागले .
बिन सतगुरु नर रहत भूलाना ।
भजन थांबलं तेव्हा भानावर आलो . आणि काउंटरवर हातांनी ताल धरणाऱ्या मालकाला न राहवून विचारलं ,
‘ एफ एम वर लागलं होतं का हे भजन ?’
तो माझ्याकडे बघत राहिला , म्हणाला ,
‘ मी ,यु ट्यूबवर ऐकतो कुमारजी , मला आवडतो त्यांचा आवाज , त्यांची निर्गुणी भजनं , खूप समाधान मिळतं मला …’
तो भरभरून बोलत होता . आमच्याप्रमाणे इतर गिऱ्हाईक सुद्धा त्याचं बोलणं ऐकत होती . आम्ही न सांगता त्यानं गरमगरम वाफाळलेला चहा आमच्या समोर आणला.
ते क्षण अविस्मरणीय होते .
तिथून निघताना त्यानं शुभ्र पांढऱ्या शेवंतीचं , एक छान रोप सुद्धा दिलं.
त्याचा निरोप घेताना वाटलं ,
जपून दांडा धर ,
साजूक तुपातली पोरगी,
शांताबाई,
वाट बघणारा रिक्षावाला,
ही आणि अशीच सैराटलेली गाणी ऐकवण्याची क्रेझ असताना , हा संगीतप्रेमी लगन गंधार हॉटेलवाला वेगळा कसा ? याची आवडनिवड वेगळी कशी ? ही सांगितिक सुसंस्कृतता येते कुठून ?
प्रश्न मला पडले पण त्याची उत्तरं तुम्हाला माहिती असतील कदाचित .
खरं ना….
— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
Leave a Reply