लग्न ठरलंय, तारीख ठरली, वेळ ठरली, स्थान ठरलंय ना… मग बस्स. हाच माहितीवजा एसएमएस तयार करा अन् धाडा आपल्या गणगोताला, मित्रांना. एवढेच नाही. व्हॉट्स अॅपवरही मस्त वधू-वरांचे छायाचित्र घ्या आणि त्यांखाली हाच मजकूर लिहा अन् करा की तुमच्या ग्रुपला सेण्ड. फेसबुकवरही असतेच की अनेकांचे अकाउंट. त्यावरही येणाऱ्या वऱ्हाडींना शेअर करा की… म्हणजे काय तर, लग्नपत्रिका छापा रे, कोण कुठल्या गावी राहतो त्याच्या घरी उन्हातान्हात जा रे, पत्रिका द्यायची, परत दुसरे गाव… कशाला ही कटकट.. दोन सेकंदांत लग्नाचे निमंत्रण… आहे की नाही झकास ऑनलाइन आयडिया.
हल्ली होतेही असेच आहे. आठवडा-आठवडा कधीकाळी लग्नविधी चालत. ते आता दोन दिवसांवर आले. त्या वेळी संपर्काची तर नाहीच; पण दळणवळणाचीही साधने फारशी अन् जलद नव्हती. पत्रिका वाटताना तर आठ-दहा जणांना नेमले जायचे. त्यांनी त्या-त्या गावी मिळेल त्या साधनाने जायचे, पत्रिका द्यायच्या अन् आग्रहाने ‘लग्नाला या’ असे म्हणायचे. त्यामुळे अनेकांना लग्नाच्या पत्रिका वाटायच्या म्हटले की दरदरून घाम फुटतो, तर काहींना फिरायला भेटते म्हणून आनंदही होतो.
पण अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाइलद्वारे चुटकीसरशी संपर्क होऊ शकतो. एसएमएसद्वारे तत्काळ संदेशवहन होते. व्हॉट्स अॅप व फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंगमुळे क्षणापूर्वी घडलेली माहिती दृश्य स्वरूपात कळते.
लग्नकार्यासाठीही याचा उपयोग करत काहींकडून नाममात्र लग्नपत्रिका छापल्या जातात. महत्त्वाच्या व्यक्तींना वाटप केल्या जातात. इतरांना निमंत्रित करण्यासाठी एसएमएसचा वापर केला न जात आहे. त्याचप्रमाणे लग्नाची पत्रिकाच व्हॉट्स अॅप अन् फेसबुकवर टाकून संबंधितांना शेअर करून -. लग्नाला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे.
रुसवाफुगव्याचाही गेला ताण…
लग्नाचे निमंत्रण द्यायचे तर त्यासाठी लग्नाची निमंत्रणपत्रिका हवीच व तीही घरपोच दिली पाहिजे. देताना ‘लग्नाला या’ असे आग्रहपूर्वक म्हटलेही पाहिजे. नाहीतर पत्रिका तर दिली फक्त, कुठे म्हटले या म्हणून… असा टोमणा ऐकावा लागणारच. एवढेच नाही, तर एखादवेळी नजरचुकीने एखाद्यास पत्रिका देणे जमले नाही किंवा कोणी घाईगडबडीत राहून गेला तरीही रुसवा आलाच. बरे, लग्नपत्रिकेत एखाद्याचे नाव राहूनच गेले तर ते मोठेच महासंकट. पप्ण आता नव्या तंत्रज्ञानामुळे कार्यभार .उरकणाऱ्याचा बराचसा ताण कमी झाला आहे.
छपाईचा खर्च वाचला
लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेचे महत्त्व कमी झालेले नाही. मात्र पत्रिकांची संख्या कमी झाली आहे. अगदी साध्या पद्धतीची लग्नपत्रिका ही किमान ५०० ते ७00 रुपये शेकडा दराने छापली जाते, तर चांगल्या पत्रिकेचे दर ८-१० रुपयांपासून ते दीडशे-दोनशे रुपयांपर्यंतचे आहेत.
याहीपेक्षा महागड्या पत्रिका बाजारात आहेत. परंतु सर्वसाधारणपणे पाच-सात हजार रुपयांचा खर्च पत्रिकांवर होत असतो. आधुनिक फंड्यामुळे अनेकांचा पत्रिकांचा खर्च अर्ध्यापेक्षाही कमी झाला आहे.
खान्देशातील एक प्रथा…
खान्देशात लग्नकार्य ठरल्यास गणगोताला पत्रिका दिली जाते. पण त्या घरातील महिलेला लग्नाला येण्यासाठी पत्रिकेबरोबरच १० ते २० रुपये येण्याचे भाडे म्हणून ‘माना’ने दिले जातात. त्यामुळे त्या महिलेला लग्नाला जावेच लागते. अन्यथा भाडे दिल्यावरही न आल्याचा टोमणा कायमचा ऐकावा लागतो. अर्थात लग्नाला जाण्यासाठी प्रत्यक्षातील खर्च अधिक असतो, मात्र मान महत्त्वाचा असतो.
Leave a Reply