पंधरा-वीस दिवसांनी एके दिवशी पहाटे पाच वाजताच राहुल आणि विभा येतात. विभा जीन्स आणि टॉपमध्ये, बॉबकट, तिचे स्वागत जरा नाराजीनेच होते. दोघेही चहा घेतात. थोडा आराम करून नऊ वाजता सगळे डायनिंग टेबलवर जमतात. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर राहुल म्हणतो,
“आई-बाबा ही विभा. विभावरी कुलकर्णी आमच्या ऑफिसमधली माझी कलिग नुकतीच आमच्या कंपनीत जॉईन झाली आहे. हिचे आई बाबा बंगलूरला असतात. आज संध्याकाळी येतील तिला न्यायला.”
“बरं झालं बाबा आता सकाळी अकरा वाजता ती देशपांडे मंडळी येणार आहेत त्यांच्या मुलीला-शोभाला घेऊन तुला दाखवायला. आम्हाला मुलगी फार आवडलीय. आता तुझी पसंती पाहू.
राहुल विभाकडे पाहतो. ती नाखुशीने मान फिरवते. पण उघडपणे तोंडावर खोटे खोटे हसू दाखवते.
“आई हे सगळे विभासमोर बोलायलाच हवे होते का? नंतर नसते का बोलता आले?”
“म्हणजे? तू तिला काहीच का कल्पना दिली नाहीस? बरं आता तर समजले ना? बरे झाले. राहूल तू हिला आपल्या मनूमावशीकडे पोहोचवून ये, म्हणजे तिलाही फार संकोच वाटायला नको. ती देशपांडे मंडळी येऊन गेली की हिला परत घेऊन ये. सॉरी हं विभा, तुझी थोडी गैरसोय होतेय.”
“छे छे, अहो तसे काही नाही.” राहुलकडे पाहून म्हणते, “याने मला आधी थोडी कल्पना द्यायला हवी होती. ठीक आहे. चला राहुल, आपण निघुया.
राहुल नाराजीने उठतो. तिला मनूमावशीकडे पोहांचवून येतो. मावशीचे घर जवळच असते. अकरा वाजतात. देशपांडे मंडळी येतात, पण दोघेच. त्यांची मुलगी शोभा त्यांच्याबरोबर नसते.
“हे काय? दोघंच आलात? शोभा कुठे आहे?”
“राहुलच्या आई माफ करा, अचानकच तिची तब्येत बिघडली. कालचा रात्रीचा प्रवास जरा बाधला तिला. संध्याकाळी जाऊ म्हणाली. आम्ही तेच सांगायला आलो. संध्याकाळी तिला आणले तर चालेल ना?”
“बरं आता आलात तर बसा. गप्पा मारू. राहुललाही तुमची माहिती समजेल. त्याच्याशीही ओळख होईल. मग संध्याकाळी तो आणि शोभा घेतील एकमेकांची माहिती विचारपूस करून. काय रे राहुल ठीक आहे ना?”
“हो, हो चालेल ना, चालेल मला.” आईमनात हसते.
“बरं शोभाच्या आई तो शोभाचा फोटो दाखवा आमच्या राहुलला. फोटो दाखवतात. फोटो पाहताच त्याला धक्का बसतो. एवढे साम्य?
“काय रे राहुल दचकलास का असा?”
“आई ही मुलगी अगदी विभा’ सारखीच दिसते नाही?”
“कोण विभा? राहुलच्या आई, राहुलरावांनी एखादी दुसरी मुलगी पसंत केली आहे का? तसे असेल तर खुलेपणाने सांगा. आम्हाला काही वाईट वाटणार नाही.
‘एवढ्यात बेल वाजते. राहूलचे बाबा दार उघडतात.
“ये, ये शोभा. अगं आत्ताच तुझे आई-बाबा सांगत होते तुला बरे वाटत नाही. तुम्ही संध्याकाळी येणार म्हणून.”
“हो बाबा, पण आता बरं वाटतंय, शिवाय पुन्हा संध्याकाळी यायचे त्यापेक्षा ठरल्याप्रमाणे कार्यक्रम झाला तर बरं म्हणून घाईघाईने आले. फार उशीर नाही ना झाला?”
“छे,छे, अगदी वेळेवर आलीस.ये बस.’
शोभा आत येऊन अदबीने बसते. पाचवारी सिल्क साडीत ती खुलून तोंडावर मोहक हास्य. राहुलकडे हसून पाहते. म्हणते,
‘आपणच राहुल वाटते? मी शोभा. शोभा देशपांडे.”
“राहुलराव ही आमची शोभा. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. बरीच वर्ष अमेरिकेत आहे. तिकडच्याच एका प्रतिष्ठित कंपनीत नुकतीच काम करीत आहे. शोभा आणि हे राहुल!’
अमेझिंग! राहुल तिच्याकडे पाहातच राहतो. तो चटकन मोबाईल उचलतो. विभाला फोन लावतो. तिला ठरल्याप्रमाणे न्यायला येतो सांगणार असतो. विभाचा मोबाईल वाजतो, इकडे शोभाच्या पर्समधल्या मोबाईलवर रिंग टोन वाजू लागते. गाण्याची ओळ वाजू लागते. ‘ये हवायें ये फिजायें बुला रही है तुम्हें।’ राहूल चमकून तिकडे पाहतो. शोभा पर्समधून मोबाईल काढते,
“हॅलो?
“विभा? हाऊ आर यू. आय ॲॅम कमिंग ॲज
डिसायडेड!”
“प्लीज, मी वाट पाहतेय. इथेच तुझ्यासमोर!”
“विभा! तू!” सगळे हसायला लागतात.
“आई? हे कसले नाटक?”
“अरे या नाटकाचं नाव ‘लग्नाची बेडी’ तू
लग्न करायला तयार होईनास म्हणून हे करावं लागलं.’
“अगं पण ‘विभा’ मला पसंत आहे म्हणून मी
तुला सांगितलं नव्हत का? तरी?”
“अरे माझी टेप शंभर वेळा वाजली, तेव्हा आता तुला शिक्षा करणे भाग आहे. तुझी सहजासहजी सुटका करायची नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी हे नाटक केले! काय घातली की नाही लग्नाची बेडी?”
शोभाकडे पाहून “ही बेडी? नको रे बाबा, त्यापेक्षा जन्मठेप परवडली!”
“राहूल, आता इथं बोल काय हवं ते. तिकडे गेल्यावर मी आहे आणि तू आहेस!”
“चला, आता लग्नाची बेडी पक्की झाली.”
आई.
हशा.
–विनायक अत्रे
Leave a Reply