नमस्कार मंडळी,
तुलना करणे योग्य की अयोग्य ? या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि सोपे आहे. तुलना करणे हे चुकीचेच आहे. वागणूक बद्दल बोलायचे झाले तर वागणूक ही माणसाने प्रत्येक लहान मुलांसोबत चांगलीच ठेवायला हवी. कधीही कोणी पण कोणाची तुलना दुसऱ्या व्यक्ती सोबत करू नये. पण दुर्दैवाने ही गोष्ट आपल्या मुलांसोबत दररोज घडत असते. मी अनुभवलेल्या समाजातील काही गोष्टी आपणास सांगणार आहे.
आई असो किंवा बाबा , आजी असो किंवा आजोबा मामा असो किंवा काका त्यांचा नातू ,मुलगा यांची तुलना ते इतर लहान मुलांसोबत करतातच. बाळाचा जन्म झाल्यापासून तर तो मोठा होई पर्यंत हे काम रोज सुरू असते. चार लोक एका ठिकाणी जमले तर तुलना जास्त प्रमाणात केल्या जाते.
तुलना करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. जसे बाळ जन्माला आल्या नंतर सर्वात चर्चेचे आणि प्रसिद्ध असे तुलना करण्याचे विषय म्हणजे काळा आणि गोरा रंग. माझा नातू गोरा आहे तर तुझा नातू काळा किंवा सावळा आहे.
दुसरा विषय म्हणजे माझ्या मुलाला केस दाट आहेत तर याला कमी आहे. असे बऱ्याच प्रकारचे विषय आहेत जे बाळ जन्माला आल्याआल्या त्याच्या नातलगांना तुलना करण्यास भाग पाडतात. जे की अत्यंत चुकीचे आहे.
लोकांनी प्रत्येकाच्या बाळाला प्रेम द्या, कौतुकाचे २-३ शब्द बोला, त्याला प्रेमानी जवळ घ्या, शिकवा हे केले तर फार चांगले. पण असे न करता माझा मुलगा आंगात भरलेला आहे तर तुझा मुलगा रोड दिसतो आहे.
माझा मुलगा बोलायला लागला आणि तुझा अजून बोलत नाही का ? माझे मत आहे की प्रत्येक मुलगा हा त्याच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास क्षमते नुसार वाढत असतो. त्यामुळे एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी उशिरा जर बोलत असेल तर त्याला किंवा त्याच्या बौद्धिक क्षमतेला कमी लेखू नये.
एखादा मुलगा रोड असतो तर एखादा शरीरानी चांगला असतो तर सारखे सारखे त्या मुलाला रोड म्हणू नये. कारण त्याची शारीरिक वाढ ही तशीच असेल. लोक कसलाही मागचा पुढचा विचार न करता असेही म्हणतात की याला खायला देत नाही का ? खुप रोड झाला आहे. डॉक्टर ला दाखऊन या. माझ्या मते या गोष्टी निरर्थक आहेत. प्रत्येक आई बाबांना स्वतःच्या मुलाची इतरांपेक्षा जास्त काळजी असते. या साध्या गोष्टी असे विचार करणाऱ्या लोकांना कळायला हवे.
बरेचशे आई वडील लोकांच्या या तुलना करण्याच्या वाईट खेळाला बळी पडून स्वतःच्या मुलांवर वेगवेगळे प्रयोग करतात. रोड झाला तर डॉक्टर कडे नेऊ दे, उंची वाढत नसेल तर गोळ्या देऊ दे, सारखे विचार विचारांमध्ये त्या मुलाचा आनंद, स्वतःच्या मुलाचे बालपण हरवून बसतात. हा विचार आपण स्वतःच एक पालक म्हणून करायला हवा.
तुलना करतांना पण वागणूक हा महत्वाचा एक घटक आहे. बरेचशे लोक म्हणा किंवा नातलग मंडळी स्वतःचा मुलगा सर्व गोष्टीत चांगला असल्यावर दुसऱ्याच्या मुलासोबत अपमानजनक वागणूक करतात.
दुसऱ्याच्या मुलावर जळणे, निंदा करणे, अपमानास्पद शब्दांचा प्रयोग करणे या सर्व गोष्टी तुलना करतांना लोकांच्या वागणुकीतून दिसून येतात.
तुलनात्मक गोष्टी तर मुलांचे लग्न होईपर्यंत चालतात. लग्न झाल्या नंतर पण चालतात आणि चालूच राहतात. पण निदान बाळ जन्माला आल्या नंतर तरी आई वडील आणि नातलगांनी त्या लहान चिमुकल्या बाळाची तुलना करू नये.
माझा हा लेख लिहायचा उद्देश हाच आहे की, समाजातील लोकांनी मुलांच्या मनावर आणि मानसिकतेचा विचार करून त्यांच्या आई वडील यांच्या समोर बोलावे. तुलना करू नये. त्या चिमुकल्या निरागस बाळाला आनंदानी तो जसा आहे त्या परिस्थितीत जगू द्या, खेळु द्या त्याला स्वीकारा. तुलना करणे बंद करा आणि सगळ्या चिमुकल्या मुलांना चांगली आणि समान वागणूक द्या.
निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती
९९२२६१३००१
Leave a Reply