काही लोकांच्या कडे जन्मताःच प्रतिभेच लेण असंत असं म्हणतात. विद्यापीठ सेवकांच्या प्रश्नांसाठी गेली चार दशके अहोरात्र झटणा-या बाबांच्या सामाजिक कर्तृत्वाच्या, आणि संघटनात्मक नेतृत्वाच्या अनेक पैलुंचे दर्शन वेळोवेळी त्यांच्या कार्यातून दिसून येते. बाबांनी आपल्या या आजवरच्या प्रवासात अनेक मित्र जोडले आहेत. आज अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सामान्यांपासून ते असामान्यांपर्यंतचे लोक बाबांचे जवळचे मित्र आहेत. बाबांच्या या अनेक पैलुंपैकी अनेकांना माहित नसणा-या या अनोख्या मैत्रीच्या लाखाच्या पैजेची ही गोष्ट…
जगात अनेक जण पैजा लावत असतात. काही चांगल्या तर काही वाईट असतात. पण दोन मित्रांनी आपल्या वयाच्या पंच्च्याहत्तरीत अशी एक आगळीवेगळी पैज लावली आणि ती पुर्णही केली. जी, शिक्षणाचे स्वप्न अर्धेवट राहीलेल्या अनेक तरूणं-तरूणींना शिक्षणाची नवउमेद आणि प्रेरणा देईल.
स्थळ….. शहाजी छत्रपती काॅलेज, दसरा चैक, कोल्हापूर. शिवाजी विद्यापीठाचे एम.ए.चे पहिल्या सेमीस्टरचे पेपर सुरू होते. माझा पहिलाच पेपर होता. वर्गात पेपर सुरू झाला आणि माझं लक्ष शेजारील बाकावर बसलेल्या आणी शांतपणे पेपर सोडवणा-या एका विद्यार्थ्यांकडे गेल. खरं तरं हे विद्यार्थी होते एक 75 वर्षांचे गृहस्थ. मला याचे फार आश्चर्य वाटले आणि कौतूकही! या वयात एम.ए. करताहेत म्हटल्यावर या गृहस्थांशी बोलण्याची माझी उत्सूकता वाढली होती आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छाहि झाली होती. पेपर संपल्यावर ते लगेच निघून गेेले आणि त्यांच्याशी भेट काही झाली नाही. पण दुस-या दिवशीच्या पेपरला सकाळी काॅलेजवर पोहचल्यावर ते गृहस्थ काॅलेजच्या परिसरातील एका कटयावर पुस्तक वाचत बसलेले दिसले. त्यांच्या जवळ जावून त्यांना नमस्कार केला आणि त्यांना म्हटले की, मी हि एम.ए.ची परीक्षा देतोय आणि आपल्याच वर्गात माझा नंबर आहे. तेवढयात ते हसून म्हणाले!! मी तुम्हाला काल पाहिले आहे. मग त्यांच्या बरोबर बोलत असताना त्यांना विचारले की, सर तुमचं गाव कोणत? आणि आता या वयात तुम्ही परीक्षा देण्याच कारणं काय?
या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यायला सुरवात केली. मी, पुण्याचा. कारेकर माझं नाव. यावर मी म्हटले की, सर, मग तुम्हाला पुण्यात एम.ए. ला अॅङमिशन मिळाल असत. या वयात तुम्ही एवढया लांब परिक्षा देण्यासाठी कस काय आला? तुम्हाला पुण्यात परिक्षा देणं सोयीच झाल असत. यावर ते हसले आणि म्हणाले की, ती एक मनोरंजक गोष्ट आहे. त्यांनी असं म्हटल्यावर तर माझी उत्सुकता आणखी वाढली. एवढयात ते म्हणाले! तुम्हाला शिवाजी विद्यापीठ माहिती असेल. मी म्हटले होय! माहित आहे. आणि मी तिथेच नोकरी करतोय. मग ते म्हणाले, मग तर तुम्हांला बाबा सांवत माहीती असतीलच! मी म्हटले की होय माहीती आहेत. मग ते म्हणाले की, बाबा आणि मी एकाच गावचे आहोत. लहानपणापासून बाबा माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत. बाबा आणि माझ्यात अगदी कौटुंबिक मित्रत्वाचे संबध आहेत आणि बाबांच्या मुळेच मी एम.ए. करतोय. मी म्हणालो कस काय? तर ते म्हणाले, बाबा आणि आम्ही सर्व मित्र कोल्हापूरात आल्यावर नेहमी एकत्र भेटतो. एकदा असेच कोल्हापूरला आल्यावर आम्ही सर्व मित्र गप्पा मारीत असताना बाबा म्हणाले की, कारेकर तुझ्या नावापुढे फक्त (बी.ए.) असं लिहीलेल मला आवडत नाही. तुझ्या नावापुढे जर श्री. कारेकर (एम.ए.) अस लिहीलेल असेल तर ते आणखी चांगल दिसेल आणि मला आवडेल. यावर मी म्हणालो की, बाबा आता या वयात मला एम.ए. करण शक्य आहे का? यावर बाबा म्हणाले की, शिक्षणाला वयाची अट नसते. मी काही एम.ए. करायला तयार नव्हतो. आणि बाबा काही ऐकायला तयार नव्हते. मग शेवटी हा मुद्दा पैजेवर आला आणि बाबा म्हणाले की, जर तु एम.ए. पुर्ण केलस तर तुला एक लाखाची पैज देतो. बोल मान्य आहे काय? मग मी बाबांची हि पैज स्विकारली आणि शिवाजी विद्यापीठ दूर शिक्षण विभागातून एम.ए.ला अॅडमिशन घेतले. आणि ही आता परिक्षा देतोय. शेवटी बोलता बोलता ते बोलले की, मी एम.ए. केल्यावर पैज काही घेणार नाही. पण बाबांच्या शब्दांसाठी मी, ही पैज जिंकणारच! पुढे बोलण्याच्या ओघातून मला हे समजले की, श्री. कारेकर एस.टी.महामंडळातून डी.सी. पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची मुले उच्च शिक्षीत असून परदेशात नोकरी करतात. अतिशय चांगल्या कुटुंबातील बाबांच्या या मित्रांना भेटून मला खूप आनंद तर झालाच पण मला पदव्यूत्तर शिक्षण घेण्याची प्रेरणा हि त्यांच्यापासून मिळाली. पुढे दोन वर्षे श्री. कारेकर यांच्या बरोबर मला परिक्षेच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहता आल. त्यांनी आणि मी एम.ए. चांगल्या गुणांनी पूर्ण केल. एम.ए. झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी त्यांना फोन केला असता या परिक्षेच्या यशाच श्रेय त्यांनी बाबांना दिले. ते म्हणाले की, बाबांच्या त्या प्रेरणेमुळेच मी एम.ए. पुर्ण केल आहे. आणि मला याचा अभिमान आहे. आज माझ्या नावापुढे मी अभिमानाने श्री. कारेकर (एम.ए.) अस लिहीतो. माझी मुलं, सुना आणि नातू यांना सुध्दा याचा अभिमान वाटतो.
खरचं जीवनात पैजा लावणारे अनेक जण असतात. पण वयाच्या पच्च्यांहत्तरीत शिक्षणासाठी आपल्या मित्राबरोबर लाखाची पैज लावणारे आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे बाबा आणि त्यांचे मित्र श्री.कारेकर आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरतात. बाबांच्या या प्रेरणेमुळे मी ही पदव्यूत्तर शिक्षण घेवू शकलो. याचा मला नेहमीच अभिमान वाटतो…..
— प्रल्हाद गंगाधरे
Leave a Reply