नवीन लेखन...

लक्षवेधी – स्वप्नाली पाटील

स्वप्नाली पाटील… सध्याची ओळख म्हणजे ‘ग्रहण’ मालिकेतील मंगल… निरागस चेहरा, नजरेतील प्रचंड ऊर्जा तिचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करते…

‘शंभुराजे’, ‘झुलवा’ यांसारख्या नाटकांतून आपल्या अभिनयाची छाप रसिक मनावर पाडत ‘जिवलगा’, ‘कादंबरी’, ‘चि. सौ. कांक्षिणी’ या मालिकांतून याआधीच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या स्वप्नाली पाटीलने ‘स्टार प्रवाह’वर सुरू असलेल्या ‘नकळत सारे घडले’ तसच ‘झी मराठी’वरील ‘ग्रहण’ या मालिकेतून पुन्हा एकदा रसिकांवर आपल्या अभिनयाची मोहिनी घातली. स्वप्नालीचा अभिनय क्षेत्रातला गेल्या दहा वर्षांतला हा प्रवास अनेक चढउतारांचा होता. मात्र अभिनयातील सातत्य, अभ्यासू वृत्ती आणि अभिनयातला प्रामाणिकपणा हेच तिच्या यशाचं गमक सांगता येईल.

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ – २००८ साली ठाण्यातल्या घंटाळी मंदिरात मी आणि स्वप्नाली पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलो. निमित्त होतं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या एका शूटचं. या मंदिराच्या आवारात असलेल्या डौलदार झाडांच्या बॅकग्राऊंडला आम्ही शूट करत होतो. आजूबाजूला कैलासपती या वृक्षाच्या फुलांचा पडलेल्या सडय़ामुळे तिथे जणू नवचैतन्यच निर्माण झालं होतं. त्यातच मराठमोळी संस्कृती उठून दिसावी असाच पेहराव स्वप्नालीचा होता. लाल रंगाची नक्षीदार साडी, नाकात नथ, लाल रंगाची मोठाली टिकली, अंबाडा त्यावर हळुवारपणे सजलेला मोगऱयाचा गजरा आणि या सगळ्यात तिचा खुललेला चेहरा. हे सारं काही कॅमेऱयात बंदिस्त करण्याची माझी धडपड सुरू होती. अत्यंत प्रसन्न वातावरणात आमचं शूट तासाभरात पार पडलं.

या शूटनंतर आमची मैत्री चांगलीच खुलली. गेल्या दहा वर्षांच्या आमच्या मैत्रीच्या प्रवासात मला स्वप्नालीची प्रगती पाहता आली. स्वप्नाली मूळची डोंबिवलीतली. या शहरानं तिच्यावर संस्कार घडवले. तिचं संपूर्ण शालेय शिक्षणही डोंबिवलीतलंच. लहानपणापासूनच तिला अभिनय आणि नृत्याची आवड असल्याचं ती सांगते. अभिनय क्षेत्रात सतत काही ना काही करत असलेल्या स्वप्नालीने तिने आपल्या कथ्थक नृत्याचाही सराव सुरूच ठेवला होता. कथ्थकचं धडे तिने तिच्या गुरू रंजना फडके यांच्याकडे गिरवले. पंधरा वर्षे अखंड सराव केला. या कथ्थकच्या जोरावर तिने महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमांत तसंच इतर संस्थांच्या कित्येक कार्यक्रमांत आपलं बहारदार सांस्कृतिक नृत्य सादर केलं.

स्वप्नालीने पांढऱया, काळ्या, राखाडी अशा अनेक अभिनयातल्या शेड्स आजवर रसिकांसमोर साजर केल्या. स्वप्नाली या भूमिका रंगवत असताना तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ – उतार आले. याला स्वप्नाली मोठय़ा मनानं सामोरं गेली. कधीच खचली नाही. उलट नव्या जिद्दीने पुनः पुन्हा उभी राहिली. स्वप्नालीच्या याच जिद्दीने तिच्यातला अभिनयही सातत्याने जिवंत ठेवला.

स्वप्नालीचं गुढीपाडव्यासाठी केलेल्या शूटनंतर पुन्हा तिचं शूट करण्याची संधी मला मिळाली. शूट नेमकं कसं असेल याची आखणी करताना स्वप्नालीचा स्वभाव सगळ्यात आधी लक्षात घेतला. अनेक नाटकांतून आणि मालिकांतून प्रेक्षकांसमोर आलेली स्वप्नाली प्रत्यक्षात मात्र मनमिळाऊ, हसरी, आनंदी, खोडकर आहे हे मला समजलं. तिच्या स्वभावातील हाच वेगळेपणा, किंबहुना खरेपणा शूट करण्यासाठी तिचं एक वेगळं शूट करायचं आम्ही ठरवलं. स्वप्नाली जशी आहे तशी मॉडर्न स्वप्नाली कॅमेराबद्ध करायचं असं आम्ही ठरवलं. शूटचा दिवस ठरला. सुरुवातीला आम्ही कोणकोणत्या कपडय़ांत शूट करायचं हे ठरवून घेतलं. सुरुवातीला काही पारंपरिक वेषभूषेतले, साडीतले स्वप्नालीचे फोटो मी कॅमेराबद्ध केले, तर त्यानंतर मॉडर्न लूकमधली स्वप्नाली मी कॅमेराबद्ध केली. काही स्टुडिओत इनडोअर लाईटिंगमधले तर काही आऊटडोअर नॅचरल लाईटिंगमधले फोटो मी टिपले.

पोर्ट्रेट आणि कँडिड फोटोंची एक शृंखलाच मला यावेळी टिपता आली. सुरुवातीला स्वप्नाली अबोल होती. मोजकेच हावभाव करत होती. तिची कृती कृत्रिम वाटत होती आणि म्हणूनच काही मोजके फोटो एका लूकमध्ये काढल्यानंतर मध्ये थोडा ब्रेक घेऊन आम्ही पुन्हा शूट करत होतो. काही तासांच्या शूटनंतर हळूहळू ती खुलली आणि मग आम्ही तिचं ग्लॅमरस लूकमधलं शूट करण्याचं ठरवलं. स्टुडिओत पांढऱया रंगाच्या फरवर तिच्या काही दिलखेच अदा मला कॅमेराबद्ध करता आल्या. यावेळची लाईटिंग आणि स्वप्नालीचा मूड हे दोन्ही इतकं सुरेख जुळून आलं आणि म्हणूनच मला तिचे काही अप्रतिम फोटो टिपता आले. याआधी कधीही न पाहिलेली स्वप्नाली मला आणि तिलाही या फोटोंमुळे पाहता आली. कॅमेऱयाची हीच जादू कलाकाराच्या आयुष्यातील खरे रंग आणि मनात दडलेले भाव टिपायला मदत करते असं यानिमित्ताने म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

— धनेश पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..