दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.
या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात.. निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आíथक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply