माणूस लहानपणापासून जसजसा चित्रपट पहात मोठा होतो, तसतसा प्रत्येक चित्रपटातील नायिकेला तो आईच्या, मैत्रिणीच्या व पत्नीच्या भूमिकेतून पहात राहतो.. जे कधीही प्रत्यक्षात न येणारं, आयुष्यातील एक ‘स्वप्न’च रहातं..
माझ्या बाबतीतही तसंच घडलं.. लहानपणापासून मी चित्रपटातील आवडत्या नायिकांना त्या त्या भूमिकेत पहात आलो.. काॅलेजनंतर ‘कामचोर’ चित्रपट पाहिला.. व त्यातील जयाप्रदाला पाहून, राकेश रोशनच्या ठिकाणी स्वतःला समजू लागलो.. इतकी जयाप्रदा, मला आवडली!!!
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेले सत्यजित रे, हे देखील जयाप्रदाचे निस्सीम चाहते होते.. मग मी तर ‘किस झाड की पत्ती’.. भारतीय स्त्रीचं सौंदर्य हे पारंपरिक साडीमध्येच खुलतं.. हे सर्वार्थानं सार्थ करणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे ‘जयाप्रदा’!! सुप्रसिद्ध ‘विमल’ कंपनीने तिला माॅडेल म्हणून घेऊन असंख्य जाहिराती केल्या.. ती पोस्टर्स व मासिकांतील तिच्या जाहिराती, मी अजूनही जीवापाड जपून ठेवलेल्या आहेत..
जयाप्रदाचे मूळ नाव ललिता राणी.. तिचा जन्म, आंध्रमधील राजामुंद्री येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात ३ एप्रिल १९६२ रोजी झाला. तिचे वडील, कृष्णा हे तेलुगू चित्रपटाचे फायनान्सर होते. आई नीलावाणी, ही गृहिणी होती. तिने लहानपणापासून तिला नृत्य व संगीताचे शिक्षण दिले. ललिता आठवीत असताना, तिने शाळेच्या स्नेहसंमेलनात नृत्य सादर केले. त्यावेळी प्रेक्षकांतील एका सिने दिग्दर्शकाने तिचे नृत्यकौशल्य पाहून एका चित्रपटात काम करण्याची तिला ऑफर दिली. ललिताने साफ नकार दिला, मात्र आई-वडिलांच्या आग्रहाखातर शेवटी, ती तयार झाली. त्या तीन मिनिटांच्या नृत्य सादरीकरणासाठी तिला दहा रुपयांचे मानधन मिळाले, जे काही वर्षांनंतर, दहा लाखापर्यंत वाढले..
तिचा पहिला चित्रपट होता, ‘भूमिकोसम’ त्यानंतर १९७६ मध्ये तिचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले व ती खऱ्या अर्थानं ‘स्टार’ झाली. ७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘अडवी रामुडू’ चित्रपटाने तर याआधीची बाॅक्स ऑफिसची रेकॉर्ड मोडली..
७६ मधील ‘सिरी सिरी मुव्वा’ या चित्रपटाचा रिमेक ‘सरगम’ या नावाने हिंदीत झाला व जयाप्रदाचे बाॅलीवुडमध्ये पदार्पण झाले.. या चित्रपटातील नायिका मुकी असते त्यामुळे तिचे, हिंदी भाषा बोलता न येणे हे खपून गेले.. सहाजिकच तिला हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी, भाषा शिकून घ्यावी लागली.. तीन वर्षानंतर तिचा, के. विश्वनाथ दिग्दर्शित ‘कामचोर’ चित्रपट आला व सुपरहीट झाला..
१९८४ साली के. राघवेंद्र राव यांचा ‘तोहफा’ चित्रपट प्रदर्शित झाला, ज्या चित्रपटापासून श्रीदेवी आणि तिची जोडी जमली.. या चित्रपटातील सर्वच गाण्यांनी धमाल उडवून दिली होती.
याच वर्षी प्रकाश मेहरांचा ‘शराबी’ झळकला व अमिताभ बच्चन सोबत तिची ‘केमिस्ट्री’ जुळली.. ‘शराबी’ने अफाट यश मिळविले. ‘संजोग’ या कौटुंबिक चित्रपटातील तिच्या दुहेरी भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले व चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला..
१९८५ साली जयाप्रदाचा गिरीश कर्नाड बरोबरचा के. विश्वनाथ दिग्दर्शित ‘सूर संगम’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा देखील १९८० सालातील ‘शंकराभरणम’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता.. या चित्रपटातील तिची भूमिका अप्रतिम व सशक्त होती..
तीस वर्षांत तिने सात भाषेतील एकूण ३०० चित्रपट केले. यामध्ये तिचे सर्वाधिक चित्रपट हे जितेंद्र सोबत आहेत. त्यानंतर अमिताभ बच्चन व श्रीदेवीचे. राजेश खन्ना सोबतही तिने काही चित्रपटांतून दर्शन दिले. दहा वर्षांच्या कारकिर्दीनंतर, तिने श्रीकांत नहाटा यांच्याशी लग्न केले. या नाहटाचे, आधी लग्न झालेलं आहे व त्याला तीन मुलंही आहेत. त्याने जयाप्रदाशी लग्न करुनही तिला पत्नीचा दर्जा दिला नाही. सध्या ती एकटीच रहाते.. तिला मूलबाळ नाही.. बहिणीच्या मुलांवर ती स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करते..
एकूण सिने कारकिर्दीत तिला जीवनगौरव पुरस्काराशिवाय तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. पहिल्यांदा ‘सरगम’ साठी, नंतर ‘शराबी’ साठी व शेवटी ‘संजोग’ साठी!! दहा वर्षांतच सौंदर्यवती नायिकांचं रंगरुप पालटून जातं..
जयाप्रदाचंही तसंच झालं.. तिनं काही चरित्र भूमिका केल्या व नंतर चित्रपट सृष्टीपासून ती दूर झाली.. आज तिचं चेन्नईमध्ये स्वतःच्या मालकीचं एक थिएटर आहे..
१९९६ पासून तिने राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला तिने आंध्रप्रदेशाचे प्रतिनिधित्व केले.. नंतर बदल होत होत, सध्या ती भाजपा मध्ये आहे..
२००२ साली महेश टिळेकर दिग्दर्शित ‘आधार’ चित्रपटात जयाप्रदाने पाहुणी कलाकार म्हणून एक गाणे केले होते.. मी त्या चित्रपटाच्या पहिल्या सत्रात स्थिरचित्रणाचे काम केले होते. दुसऱ्या सत्राचे वेळी, इतरांचे ऐकून महेशने ते काम दुसऱ्याकडून करुन घेतले.. अन्यथा मला जयाप्रदाचे फोटो काढण्याची सुवर्णसंधी नक्कीच मिळाली असती…
आज ती साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे.. आज तिचा चेहरा मोहराही बदलून गेलाय.. चाळीस वर्षांपूर्वीची ‘कामचोर’ ची नायिका, गीता ही स्वप्नसुंदरीच वाटते.. आणि नकळत तोंडातून शब्द बाहेर पडतात.. ‘तुमसे बढकर दुनिया में, ना देखा कोई.. और जुबां पर आज दिल की बात आ गयी…’
‘साडीक्वीन’ जयाप्रदा यांना साठीत पदार्पण करताना, त्यांच्या असंख्य चाहत्यांबरोबर माझ्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा ‘तोहफा’!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-४-२२.
Leave a Reply