श्रीमद् आदिशंकराचार्य विरचित ललिता पञ्चकम् – मराठी अर्थासह
हिंदू धर्मातील १० महाविद्या या पार्वती देवीच्या विविध रूपांचे प्रकटीकरण म्हणजे आदिशक्तीच्या दहा पैलूंचा समूह होय. त्यांनाच दशमहाविद्या असे संबोधले जाते. देवीची ही रूपे कौल तंत्र साहित्यात आढळतात. ती म्हणजे काली, तारा (हिंदू देवी), त्रिपुरसुंदरी (षोडशी), भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमलात्मिका. यापैकी एक प्रमुख स्वरूप म्हणजे ललिता, जिला षोडशी, लीलावती, लीलामती, ललिताम्बिका, लीलेशी, लीलेश्वरी, तसेच राजराजेश्वरी अशीही नावे आहेत. भैरवयामल आणि शक्तिलहरी मध्ये त्रिपुर सुन्दरीच्या उपासनेचे विस्तृत वर्णन आले आहे. आदिगुरू शंकराचार्यांच्या सौन्दर्यलहरीमध्येही त्रिपुरसुन्दरी श्रीविद्येची अत्यंत रसाळ स्तुति येते.
श्रीमत् आदिशंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणजे देवी ललिता त्रिपुरसुंदरीचा भक्तिप्रद मंत्र आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीचक्राची (श्रीयंत्र) ती अधिष्ठात्री देवता आहे. काही अभ्यासकांच्या मते ती सोळा वर्षांची कन्यका (षोडशी) कल्पिलेली आहे, तर काहींच्या मते ती सोळा विद्यांनी परिपूर्ण असल्याने तिला षोडशी असे नाव मिळाले आहे.
वसंततिलका (ताराप भास्कर जनास जनास गा गा) वृत्तात रचलेले हे स्तोत्र म्हणावयास अत्यंत सोपे व गेय आहे.
प्रातः स्मरामि ललितावदनारविन्दं
बिम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् ।
आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यं
मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम् ॥१॥
मराठी- मी प्रभातकाळी ललिता त्रिपुरसुंदरीच्या मुखकमळाचे, पिकलेल्या तोंडल्यासमान (बिंबफळासमान) ओठांचे, टपो-या मोत्यामुळे शोभिवंत झालेल्या नासिकेचे, कानांपर्यंत पसरलेल्या मोठ्या नेत्रांचे, दोन रत्नजडित कर्णभूषणांचे, तिच्या स्फुटहास्याचे व हरिणांच्या कस्तूरीमुळे झळाळणा-या कपाळाचे स्मरण करतो.
मी आठवी मुख-सरोज नि नासिकेला
मोतीप्रभेत, अधरा जणु बिंब, डूला ।
कानी मणी उभय, हास, सुदीर्घ डोळां
कस्तूरि लेप झळके ललिता कपाळा ॥ ०१
प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं
रक्ताङ्गुलीयलसदङ्गुलिपल्लवाढ्याम् ।
माणिक्यहेमवलयाङ्गदशोभमानां
पुण्ड्रेक्षुचापकुसुमेषुसृणिदधानाम् ॥२॥
मराठी- मी प्रभात काळी ललिता त्रिपुरसुंदरीच्या, इच्छिलेले सर्व देणा-या हातरूपी कल्पलतांचे पूजन करतो, ज्यांची लाल अंगठ्यांनी तळपणारी, संपन्न पालवीसारखी बोटे आहेत, जे रत्नजडित कंकणामुळे शोभिवंत झाले आहेत, ज्यांनी ऊस व माधवीलतेचे धनुष्य, पुष्पबाण, अंकुश धरलेले आहेत.
भानूदयी भजत मी कर-कल्पवेली
बोटेंच पल्लव, वळी बहु तेज लाली ।
वाकी मणी खचित कांचन शोभताहे
अंकूश पुष्पशर ऊस कमान साहे ॥ ०२
टीप- येथे काही अभ्यासकांनी ऊस हे धर्माचे, धनुष्य हे अर्थाचे, फुलांचा बाण हे कामाचे व नियमन करणारा अंकुश हे मोक्षाचे प्रतीक मानून देवीच्या चार हातात चारी पुरुषार्थ सामावले आहेत असा अर्थ घेतला आहे.
प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं
भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम् ।
पद्मासनादिसुरनायकपूजनीयं
पद्माङ्कुशध्वजसुदर्शनलाञ्छनाढ्यम् ॥३॥
मराठी- मी सकाळी भक्तांना हवे असलेले दान देण्याने प्रसन्न होणा-या, भवसागर तरून जाण्यासाठी होडीच असणा-या, ब्रह्मा वगैरे देवांच्या अग्रणींकडून पूजिल्या जाणा-या, कमळ, अंकुश, झेंडा, चक्र अशा शुभ लक्षणांचे धनी असणा-या ललिता त्रिपुरसुंदरीच्या पदकमळांना वंदन करतो.
सूर्योदयी नमन त्या पदनीरजाला
भक्तां हवे खुषित दे, भवसागराला ।
तारी जहाज, विधि देवहि पूजिताती
चिन्हे सरोज ध्वज अंकुश चक्र भाती ॥ ०३
प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं
त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम् ।
विश्वस्य सृष्टिविलयस्थितिहेतुभूतां
विद्येश्वरीं निगमवाङ्मनसातिदूराम् ॥४॥
मराठी- जिची महती वेदत्रयी (वेद,उपनिषदे,स्मृती) यांनाच ठावी आहे (वेदत्रयीच्या अध्ययनाने ठाऊक होते), जिची (भक्तांवरील) दया परिपूर्ण आहे, जगताचे सृजन,स्थिती आणि लय यांना जी कारणीभूत आहे, जी शास्त्रे, वाणी आणि मन यांच्या पलिकडे आहे, अशा ललिता भवानीची मी सकाळी स्तुती करतो.
सूर्योदयी स्तुति महा शुभ भैरवीची
माहात्म्य जाणत श्रुती, करुणा जियेची ।
बट्ट्याविना, स्थिति तिन्ही करणी जियेची
आहे पल्याड मन शास्त्र तशी श्रुतीची ॥ ०४
प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम
कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति ।
श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति
वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति ॥५॥
मराठी- हे ललिता देवी, मी प्रातःकाळी तुझी कामेश्वरी, कमला, महेश्वरी, विश्वाची माता श्रीशाम्भवी, वाणीची देवता ‘परा’, त्रिपुरेश्वरी अशी पुण्यप्रद नावे घेतो.
मी गात नाव ललिते तव सुप्रभाती
कामेश्वरी नि कमला नि महेश्वरी ती ।
श्रीशाम्भवी जगभरा जननी परा ती
भाषेस दैवत जशी त्रिपुरेश्वरी ती ॥ ०५
टीप- वाणीचे वैखरी,मध्यमा,पश्यन्ती आणि परा असे चार प्रकार आहेत. त्यापैकी परा ही सर्वश्रेष्ठ मानली आहे.
यः श्लोकपञ्चकमिदं ललिताम्बिकायाः
सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते ।
तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना
विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम् ॥६॥
मराठी- हे ललिता अंबिकेचे पाच श्लोकांचे भाग्यदायी सुरम्य काव्य जो सकाळी म्हणतो, त्याला ललिता त्रिपुरसुंदरी लगेच प्रसन्न होऊन ज्ञान, संपत्ती, निष्कलंक सुख, अनंतकाळपर्यंत कीर्ती देते.
जो पाच श्लोक म्हणतो ललितांबिकेचे
सौभाग्यदायक सुरम्य तया खुषीचे ।
तात्काळ ज्ञान, अकलंक सुखा, धनाते
कीर्ती अपार, ललिता चिरकाल देते ॥ ०६
॥ आदिशंकराचार्यविरचित ललिता पंचरात्नम् समाप्त ॥
धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)
अर्थ आणि काव्य रूपांतर दोन्ही आवडले. मराठीत उपलब्ध झाल्यामुळे सोय झाली.
महोदयाः भवतः काव्यप्रतिभायै नमः!