ललिता पवार यांचं माहेरचं नाव अंबिका लक्ष्मण सगुण व शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झालं होतं. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी झाला.१९२८ साली “आर्यमहिला ” या मूकपटात सर्वप्रथम भूमिका साकारली व त्यानंतर “गनिमी कावा” ,”राजपुत्र” , “समशेर बहादूर” , “चतुर सुंदरी”, “पृथ्वीराज संयोगिता”, “दिलेर जिग़र” यासारख्या मुकपटातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. मुंबईच्या चंद्र आर्ट्सच्या “हिम्मतो मर्दा” या बोलपटात त्या नायिका होत्या आणि हाच त्यांचा पहिला बोलपट देखील होता. १९३८ साली टॉलस्टॉयच्या रेसरेक्शन या कादंबरीवरून” दुनिया क्या हे ? “चित्रपटाची त्यांनी निर्मिती करून त्यात भूमिकाही केली. या चित्रपटात गाणी सुध्दा त्यांनी स्वतःच गालली होती. भालजी पेंढारकर लिखित-दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या १९३९ रोजी प्रदर्शित झालेल्या नेताजी पालकर या चित्रपटात “काशी” या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट (बोलपट). याशिवाय ललिता पवार यांचे महत्त्वाची व मध्यवर्ती भूमिका असलेले मराठी चित्रपट म्हणजे “अमृत”, “गोराकुंमार”, “जय मल्हार”, “रामशास्त्री”, “अमर भूपाळी”, “मानाचं पान”, “चोरीचा मामला” तर हिंदीत “दहेज”, “परछाई”, “दाग”, “श्री ४२०”, “अनाडी”,” जंगली”, “प्रोफेसर”, “घराना”, “खानदान”, “घर बसा के देखो”, “परवरिश”, “सास मी कभी बहू थी”,”बहूरानी”, “आनंद” मधून विविधांगी व्यक्तीरेखा साकारून रसिकाची मनं जिंकली. १९४२ च्या सुमारास “जंग-ए-आजादी” चित्रपटासाठी ललिता पवार भगवानदादांसोबत एका प्रसंगाचे चित्रण करीत होती. थंडीच्या दिवसात, तळय़ात स्नान करीत असलेल्या ललिताला मास्टर भगवान थोबाडीत देतो असा एक सीन होता. भगवानदादांसाठी अश्या प्रकारचा सीन नवीनच होता. ललिताजी या त्यांच्यापेक्षा वयाने देखील मोठ्या असल्याने प्रथमत: त्यांनी हा सीन नाकारला. पण दिग्दर्शक तसंच ललिता पवार यांनी समजवल्यानंतर ते कसेबसे या सीन साठी तयार झाले;त्या सीन साठी भगवानदादांनी ललिताजींच्या इतकी सणसणीत कानफटात ठेवून दिली की त्यामुळे ललिता पवार यांच्या डाव्या डोळ्याची रक्तवाहिनी तर फुटलीच त्याशिवाय चेहर्या ला तात्पुरता पॅरॅलिसिसचा अॅाटॅक आला. सतत तीन वर्षे उपचार करुन देखील शेवटी त्यांच्या डाव्या डोळ्यात दोष निर्माण झाला. त्या प्रसंगापासून ललिता पवार यांना नायिकेच्या भूमिका सोडून देऊन पुढे चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या, पण त्या भूमिका सुध्दा एवढ्या गाजल्या की ललिता पवार हे नाव भारतीय चित्रपटांत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले. ललिता पवार यांच्या व्यक्तिमंत्त्वात एकप्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब असल्यामुळे त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहर्यामवरील विशिष्ट प्रकाराचा भाव असल्यामुळे खानदानी, तडफदार, सोजवळ तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या व त्यामध्ये नैसर्गिकता देकील पहायला मिळली. अभिनेत्री ललिता पवार यांनी तीनशे चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारल्या असून त्यामध्ये मराठामोळी तरुणी, गृहिणी, वृद्ध महिला, खाष्ट सासू , प्रेमळ घरमालकीण, कामगार महिला पर्यंतच्या सर्वच व्यक्तीरेखा प्रभावी व उत्तमपणे रुपेरी पडद्यावर अगदी हुबेहुब उभ्या केल्या. रामानंदसागर यांच्या रामायण या लोकप्रिय अध्यात्मिक मालिकेत ललिता पवार यांनी “मंथरा” ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. ललिता पवार यांना १९६१ रोजी “संगीत नाटक अकादेमी पारितोषिक” तर १९९६ साली महाराष्ट्र राज्य शासनाचा “व्ही.शांताराम पुरस्कार” प्राप्त झाला असून गृहस्थी, सजनी, अनाडी, घर बसा के देखो या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर सह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ललिता पवार यांचे २४ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / सागर मालाडकर
Leave a Reply