नवीन लेखन...

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा – महालक्ष्मी

landmarks in History of Mumbai - Mahalakshmi Temple

मुंबईची महालक्ष्मी. तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. नवरात्रात महालक्ष्मीचा सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मीच्या देवळात हजेरी लावतात..

मुंबईतील महालक्ष्मीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे तो सारा परिसराच गर्भश्रीमंत ‘लक्ष्मीपुत्रां’ आणि ‘लक्ष्मीकन्यां’चाही..देवळाच्या समोरच पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’ मध्ये देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीच्या सारख्याच लाडक्या कन्या मंगेशकर भगिनी बंधू पंडित हृदयनाथांसोबत राहतात. देवळाला लागून असलेल्या ‘शिवतीर्थ’ इमारतीत मराठीची एकेकाळची आघाडीची नायिका ‘जयश्री गडकरां’चं वास्तव्य होत. देशातील सर्वात श्रीमंत असामी श्री. मुकेश अंबानीही इथून हाकेच्या अंतरावर राहतात. मला माहित असलेली ही काही उदाहरणं. शेजारचा ‘ब्रीच कँडी’, देवळापासून काही अंतरावर असलेला ‘कार मायकेल रोड’, ‘पेडर रोड’, ही ठिकाण म्हणजे देशाच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या मोठ-मोठ्या उद्योगपतींचा. या सर्वच परिसरावर महालक्ष्मीचा वरदहस्त असून इथे सहज म्हणून फेरफटका मारला तरी महा’लक्ष्मी’चे दर्शन अगदी सहजरित्या घडते..

अश्या या आई महालक्ष्मीचे वास्तव्य सध्याच्या ठिकाणी तिच्या दोन बहिणी, महाकाली आणि महासरस्वती, यांच्यासोबत साधारणतः १७८४-८५ पासून आहे. ‘मुंबईच्या इतिहासातील पाऊलखुणांचा मागोवा’ या सदरातील हा लेख महालक्ष्मी आणि तिच्या दोन बहिणीं इथे कशा प्रकट झाल्या त्याची कहाणी सांगणारा आहे.

मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा चंग बांधला होता. व्यापारी असलेल्या इस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीचा हा पवित्रा बिलकुल मंजूर नव्हता. तरी हा पठ्ठ्या हिम्मत हरला नाही. मुंबई बेटाचं दक्षिण टोक, म्हणजे सध्या आपल्या महालक्ष्मीचे देऊळ आहे ते आणि समोरचे वरळी गाव, म्हणजे सध्या मुंबई महानगरपालिकेचे ‘लव्ह-ग्रोव्ह उदंचन केंद्र’ किंवा ‘अत्रीया मॉल’ आहे ते, तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. भरतीच्या वेळेस हे समुद्राचे पाणी पार भायखळ्या पर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबई बेटातून वरळीकडे जायचे तर होडीशिवाय पर्याय नसायचा. समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचे त्या भागाला ब्रिटिशानी ‘द ग्रेट ब्रीच’ असे नाव दिले होते. ब्रीच म्हणजे खिंडार. ही यातायात बंद करण्याचे हॉर्नबीने ठरवले आणि त्याने ही खाडी भरून काढायचा आणि मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा गाडी रस्ता बांधण्याचे काम इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता चालू केले. ‘वरळीचा बांध’ (सध्याचा लाल लजपतराय मार्ग, पूर्वीचा हॉर्नबी वेलॉर्ड. कृतज्ञता म्हणून लॉर्ड हॉर्नबीचे नाव मुंबईकर जनतेने या रस्त्याला दिले.) बांधण्याचे काम असे या कामाला त्यावेळी म्हटले गेले होते.

या बांधाच्या बांधकामाचे कंत्राट रामजी शिवजी नावाच्या पाठारे प्रभू या तरुण इंजिनिअर कडे सोपवण्यात आले होते. बांध घालण्याचे काम सुरु झाले. दगडाच्या राशीच्या राशी भरून तारवं इथे येऊ लागली. दगडाच्या राशी खाडीत टाकून भरणी करण्याचे काम सुरु झाले. पण होई काय की, बांधकामात थोडी प्रगती झाली की समुद्राच्या पाण्याच्या रेट्याने बांधलेला बांध कोसळून जाई आणि पुन्हा सुरुवात करावी लागे. असे बरेच महिने चाललं. त्याकाळचे तंत्रज्ञान लक्षात घेता हे तसे कठीणच काम होते. पण रामजी शिवजी आणि हॉर्नबी या दोघांनीही हिम्मत हारली नाही..ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले परंतु परत परत तेच व्हायचे..!

अशा वेळी एका रात्री रामजी शिवजीला महालक्ष्मीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले, ‘मी माझ्या बहिणींसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल..!”. त्याकाळात सर्वच जनता भाविक आणि श्रद्धाळू असायची आणि त्याला रामजी शिवजीही अपवाद नव्हता. साहजिकच रामजी शिवजीने दृष्टान्तावर विश्वास ठेवला आणि ही घटना हॉर्नबीच्या कानावर घालायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी रामजी शिवजीने त्याचे स्वप्न आणि त्यातील देवीच्या दृष्टांताची गोष्ट हॉर्नबीच्या कानावर घातली आणि समुद्रात देवीच्या मूर्तींचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. होर्नबी पक्का ब्रिटीश. या असल्या कथांवर त्याचा विश्वास असणेच शक्य नव्हते परंतु हाती घेतलेले काम पूर्ण होत नव्हते. बांध पुन्हा पुन्हा कोसळत जोता. खर्च वाढत चालला होता. हॉर्नबीच्या डोक्यावर इंग्लंडची परवानगी नसताना कामाला सुरुवात केली म्हणून सस्पेन्शनची तलवार लटकत होती आणि म्हणून वरळीचा बंध बांध्याला आणखी उशीर होऊन चालणार नव्हते. त्याला काहीही करून हा बांध पूर्ण करायचा होता आणि म्हणून त्याने काहीही न बोलता हा ही प्रयत्न करून बघू म्हणून रामजी शिवजीला देवीच्या मूर्तींचा शोध घेण्याची परवानगी दिली.

झाले रामजी शिवजी कामाला लागला. लहान बोटी मागवण्यात आल्या. स्थानिक मच्छिमार बंधूंची मदत घेण्यात आली. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि एके दिवशी जाळी वर काढताना हाताला जड लागली. जाळी बाहेर काढल्यावर रामजी शिवजीच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीन महादेविंच्या मूर्ती सापडल्या. रामजी शिवजीने हॉर्नबीला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचे सांगितले आणि या देवींच्या स्थापनेसाठी जागा देण्याची विनंती केली. हॉर्नबीनेही सध्याच्या महालक्ष्मी देवळाची जागा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दिली असे सांगून त्या जागी मूर्ती ठेवण्यास सांगितले. हॉर्नबीने दिलेल्या आदेशानुसार त्या जागी मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात ठेवल्या आणि नंतर मात्र वरळीचा बांध कोणताही अडथळा न येता पूर्ण झाला. पुढे बांध पूर्ण होऊन हॉर्नबीच्या स्वाधीन केल्यानंतर रामजी शिवजीने त्याकाळात ८० हजार रुपये खर्चून महालक्ष्मीचे देऊळ बांधून त्यात महालक्ष्मी आणि महाकाली व महासरस्वती या तिच्या दोन बहिणींची मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली. हे देऊळ सुमारे सन १७८४-८५ च्या सुमारास बांधले गेले आहे. महालक्ष्मीच्या जन्माची ही आख्यायिका आहे. आणि इतर काही पुरावे उपलब्ध नसल्याने अख्यायीकेवर विश्वास ठेवावाच लागतो. देऊळ आणि वरळीचा बांध नेमका कोणत्या साली बांधला गेला यावरही दुमत आहे कारण वरळीच्या बांधाचे काम हॉर्नबीने विना-परवानगी केल्याने त्याचे कागदपत्र नाहीत. परंतु ही दोन्ही बांधकामे सन १७८० – ते १७८५ च्या दरम्यान पूर्ण करण्यात आली असे म्हणता येईल.

वरळीच्या बांधाच्या बांधकामाने मुंबईच्या ‘महालक्ष्मी’ला जन्म दिला हे शब्दशः खरे ठरले. मुंबईवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली ती या दिवसापासूनच. या बांधामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणावर जमीन उपलब्ध झाली. देशभरातील अनेक ठिकाणाहून हुशार व्यापारी, तंत्रज्ञ, कलाकार, कारागीर मुंबईत येऊ लागले. व्यापार उदीम वाढला आणि मुंबई बघता बघत देशाची आर्थिक राजधानी बनली. मुंबईचे आर्थिक जगतातील हे स्थान आजवर देशातील इतर कोणतेही शहर हिसकावून घेऊ शकलेले नाही.

मुंबईवर महा’लक्ष्मी’चा वरदहस्त आहे, नव्हे मुंबई हे ‘महालक्ष्मी’चे जिवंत प्रतिक आहे. वरळीच्या बांधकामामुळे मुंबईला ‘महालक्ष्मी’चे देऊळ आणि दगडी मूर्ती तर मिळाल्याच परंतु खरी महा’लक्ष्मी’ म्हणून अक्खी मुंबई तिची ‘मूर्ती’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महालक्ष्मीचा समुद्रातून झालेला जन्म ही जरी आख्यायिका असली तरी ‘मुंबई’ने मात्र त्या आख्यायिकेला मूर्त स्वरूप दिल आहे यात शंका नाही. ‘मुंबई’ हीच समुद्रातून निघालेली ‘महालक्ष्मी’आहे..!!

— गणेश साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com

— मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणांचा मागोवा – लेखमाला
लेख २२ वा –

संदर्भ- मुंबईचे वर्णन -ले. गोविंद मडगावकर

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..