(रामायणातील कथाभागावर आधारित गोष्ट)
रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता. त्याने आपला धाकटा भाऊ ‘सुग्रीव’ याच्यावर फार अन्याय केला होता. रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरिता वालीला ठार मारले आणि सुग्रीवाला राज्यावर बसविले. या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचे कबूल केले. त्याने आपले आणि इतर वानर राजांचे सारे सैन्य गोळा केले. लाखो वानर वीर गोळा झाले.
सुग्रीवाने वानरांच्या टोळ्या करून सीतेच्या शोधासाठी निरनिराळ्या दिशांना पाठविले. आपला मित्र मारुती याला त्याने दक्षिण दिशेकडे पाठविले. दक्षिणेत शोध घेत घेत मारुती समुद्रापर्यंत आला. सीता लंकेत असल्याची बातमी वानर सैन्याला मिळाली होतीच. परंतु समोर शंभर योजने लांब असा समुद्र पसरला होता. आता कसे करावे, असा वानर सैन्यापुढे पेच पडला. परंतु एवढ्यात मारुतीने समुद्रावरून उड्डाण केले व तो थोड्याच वेळांत लंकेत येऊन पोहोचला. लंकेत शोधता शोधता मारुतीला अशोक वनात सीता आढळली. तिच्या भोवती अक्राळविक्राळ राक्षसिणींचा पहारा होता. सीता फार दु:खी दिसत होती.
संधी साधून मारुतीने रामाची अंगठी सीतेला दिली. तिलाही ओळख पटली. तिचा आनंद गगनात मावेना. तिने रामाला “आपली लवकर सुटका करा” असा निरोप मारुतीबरोबर पाठविला.
मारुतीच्या आगमनाची बातमी एवढ्या वेळांत सर्व लंकेत पोहोचली. राक्षसांनी पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर मारुती त्यांच्या हाती सापडला. या माकडाला चांगलीच अद्दल घडविली पाहिजे, असा राक्षसांनी विचार केला. त्याच्या शेपटीला चिंध्या बांधून ती पेटवून दिली म्हणजे हे माकड आपोआप जळून मरेल असे त्यांनी ठरविले. त्यांनी मारुतीच्या शेपटीला चिंध्या गुंडाळण्यास सुरुवात केली. राक्षसांची फजिती करण्यासाठी मारुतीने आपली शेपटी लांबविण्यास प्रारंभ केला. कितीही चिंध्या गुंडाळल्या तरी पुरेनात. शेपटी आपली वाढतेच आहे! अखेर कंटाळून राक्षसांनी मारुतीची शेपटी पेटवून दिली.
मारुतीनेही त्या दुष्ट राक्षसांची खोड मोडण्याचे ठरविले. पेटलेल्या शेपटीने तो लंकेतील एका वाड्यावरून दुसऱ्या वाड्यावर धडाधड उड्या मारू लागला. एकामागून एक वाडे पेट घेऊ लागले. थोड्याच वेळांत सारी लंका पेटली. राक्षसांची एकच धावपळ सुरू झाली. फजिती झालेल्या राक्षसांची गंमत बघत बघत मारुती समुद्राकांठी आला. त्याने समुद्राच्या पाण्यात आपली शेपटी विझवली आणि पुन्हा उड्डाण करीत तो रामाकडे परत आला. सीतेचा शोध लागला हे ऐकून रामाला अतिशय आनंद झाला.
[“बालसुधा’, पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. १०५-१०७]
Leave a Reply