खचाखच भरलेल्या लोकल मधे..
घुसमटलेल्या श्वासात व घामेजल्या अंगानी उभे,
प्रवास नामक नरकवास सहन करत असतो आम्ही
तेंव्हा अनाहुतपणे वाजतो कोणा अगांतुकाचा फोन
अन त्या गर्दीला चिरत आमच्यापर्यंत येतो तुझा स्वर
“ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे..
तुमरे बिन हमरा कौनो नाही..”
चेह-यावर त्या स्थितीतही एक अस्फुट स्मित येते..
शेजारचा दाढीवालाही ओळख नसताना हसतो..
पुढचा प्रवास सुखकर होतो..
स्वर रेंगाळत राहतो..
साथ करतो..घरा पर्यंत..
पुलावर ते दोघे स्तब्ध उभे असतात
खालून वाहणा-या नदीला अंदाज नसतो,
त्या दोहोंच्या अंतर-मनातील कल्लोळाचा..
रात्रीच्या शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या
व शेजारी सहज येउन थांबलेल्या
त्या वृद्ध जोडप्याच्या हातातल्या फोनवर
सुरु असतं तुझंच एक अविट गाणं
“रस्मे उलफत को निभायें तो निभायें कैसे….”
वृद्ध जोडपे तिथेच घुटमळते..
उमजून काहीतरी..
गाणे संपते..
‘ते दोघे’ एकमेकांकडे पाहतात
दोघांच्याही डोळ्यात पाणी असते..
मग ती त्याला अलगद बिलगते..
वृद्ध जोडपे पुढे निघते..समजून घेत
तुझा आवाज एक ‘पूल’ बनून जातो..
जुन्नरच्या प्राथमिक शाळेच्या त्या शिक्षीका
घट्ट मैत्रीणी व तेवढ्याच चेष्टेखोर
आज मात्र सा-या भावनीक असतात
त्यांची एक मैत्रीण बदलीवर जाणार असते
नवीन लग्न होउन.. नव-याच्या गावी..
तिचा सेंड-आॕफ असतो आज..
तिच्या गाणा-या मैत्रिणीला ती विनंती करते
‘गा ना ग एक गाणं माझ्यासाठी शेवटचं..
काय जाणो पुन्हा कधी योग येईल तुला ऐकायचा’
नेहमी उडती व नवीन गाणी गाणारी मैत्रीण
सुरु करते तुझंच गाणं गायला..
एक कडवं कशिबशी गाते,पण पुढं नाही गाउ शकत..
मैत्रीणीच्या गळ्यात पडून रडू लागते.
दुसरी मैत्रीण प्रसंगावधान दाखवत,
तिच्या फोनवर तुझे तेच गाणे लावते
‘अजीब दास्तां है ये..कहां शुरु कहां खतम’
आणि मग त्या सगळ्याच जणींचा बांध फुटतो
तू शांत स्वरात त्या नवविवाहितेला सांगत राहतेस
‘किसीका साथ लेके तुम, नया जहां बसाओगे..
ये शाम जबभी आयेगी, तुम हमको याद आओगे..’
तुझा आवाज त्यांच्या आसवांमधे मिसळून वाहू लागतो
ठाण्याच्या त्या मराठी शाळेत
जेंव्हा ती दोन जर्मन मुले
दोन आठवडे शिकायला येतात..
तेंव्हा वर्गातली बाकीची मुले त्यांच्याकडे,
पाहतात एखाद्या परग्रहवासी पाहू तसे..
पण जेंव्हा हेड-सर येतात त्यांचा परिचय करुन द्यायला
अन विचारतात काय येते मराठीत तुम्हाला
तेंव्हा ती दोघे हात जोडून
सर्वांसमोर उभे राहून
म्हणतात ‘पसायदान’..अगदी तुझ्यासारखं..
तेंव्हा मिटून जातं मुलांमधील सारं अंतर
खंड, देश, धर्म आणि भाषेचे..
अन ज्ञानेश्वरांच्या ओळींमधून साकारते
‘मैत्र जीवांचे’..!
कारण त्या दोघांच्या हृदयातून येणारा आवाज
असतो तुझाच..
सकल भूमंडळ सामावून घेणारा..
न्यू जर्सीच्या महाराष्ट्र मंडळाचा
वार्षिक स्नेहसंमेलन संपता संपता
एक पासष्ट वर्षीय आजी ऐनवेळी,
बॕक स्टेजला येउन म्हणतात..
‘मला एक नृत्य करायचे आहे..’
‘फक्त दोन मिनीट मिळतील आजी’
या अटीवर आयोजक त्यांची सी.डी. लावतात
आजींवर स्पाॕटलाइट येण्याआधीच
येतो तुझा आॕडिटोरीअम भरुन टाकणारा आवाज
“रात भी है कुछ भिगी भिगी..
दर्द भी है कुछ मद्धम मद्धम”
आणि सगळा माहोलच बदलून जातो
साक्षात वहिदा रेहमान साकारते आजींच्या नृत्यातून
दोन मिनीटांची अट आयोजकही विसरुन जातात
आजी पूर्ण गाणे नृत्यातून साकारतात.
अबाल-वृद्ध उभे राहून आजींना दाद देतात.
आजी लाजत मनातल्या मनात ‘तुला’ दाद देतात..
ती रात्र अनेकांसाठी ‘भिगी’ होउन जाते..
आणि त्या आजींसाठी ‘अविस्मरणीय’..
लता..
तू एकच..
पण तुझ्या गाण्याशी निगडीत आठवण,
एक प्रत्येकाची..खास..
नउ दशकांच्या तुझ्या प्रवासाला
व साडे सात दशकांच्या गान कारकिर्दीस समर्पित..
आमच्या ‘त्या’ कोटी कोटी आठवणी..
ता.क.- लतादिदींच्या नव्वदीतल्या पदार्पणाला लिहीलेला हा लेख. तेंव्हा या गृपचा भाग नसल्याने थोडा उशीरा आपल्याला सादर करत आहे. आपल्याला आवडेल ही आशा.
— सुनील गोबुरे.
सांगली.
Leave a Reply