नवीन लेखन...

लेट व्हॅलेंटाईन

परवा माझा मोबाईल बंद पडला होता, त्यामुळे दोन दिवस मी त्याला हातही लावला नाही. आज दुरुस्त केल्यानंतर पाहिलं तर व्हाॅटसअपवर धाड धाड मेसेजेस पडत राहिले. त्यातील मी मुंबईला नोकरीला असणाऱ्या माझ्या एकुलत्या एक मुलाचा व्हाॅटसअप उघडला, तर त्याने लांबलचक पाठवलेला मेसेज दिसला. मी माझा चष्मा नाकावर चढवला व वाचू लागलो…
‘प्रिय बाबा,
आज आम्ही दोघेही बाहेर जेवणार आहोत. त्यासाठी या हाॅटेलात मी, आम्हा दोघांसाठी टेबल बुक करुन ठेवलं आहे. मला इथं येऊन अर्धा तास झाला आहे तरी अजूनही सुनीता आलेली नाही. बहुतेक तिला आॅफिसमध्ये अचानक जादाचं काम लागलं असेल. मला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला मेसेज लिहित बसलोय…
बाबा, दरवर्षी आम्हाला या दिवशी वेगळं काहीतरी करावंच लागतं. पत्नीवर आपलं ‘प्रेम’ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. व्यक्त व्हावं लागतं. तुम्हाला हे नाही कळणार, कारण तुम्हाला खात्री होती की, आई तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही. कधीतरी ती थकलेली दिसली की, तुम्ही कोपऱ्यावर जाऊन चटकदार ओली भेळ सर्वांसाठी घेऊन यायचा. तेवढ्यानेच ती खुश होऊन जायची. तुम्ही कधी तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं का? की तुमच्या भावना न बोलताच तिच्यापर्यंत पोहचत होत्या?
तुम्ही दरवर्षी गौरी गणपतीला, गौरीला नेसवायला दोन भारी साड्या घेऊन यायचे. आई त्याच साड्या पुढे वर्षभर वापरत असे. त्या साड्या आणल्यावर आई त्यावरुन हात फिरवत म्हणायची, ‘साडीचा पोत किती छान आहे, रंग किती खुलून दिसतोय.’ हीच तिची ‘थॅन्क्यू’ची भाषा होती का? की यातून ती तुम्हाला ‘आय लव्ह यू’ सुचीत करीत होती? जे तुमच्यापर्यंत सहज पोहचत होते..
तुम्ही कधी आईसाठी ‘गिफ्ट’ आणल्याचं मला आठवत नाही. मात्र दरवर्षी अक्षय्य तृतीयेला जमेल तशी सोन्याची वेढणी, न चुकता आणत होतात. खरंच ती मुहूर्ताची खरेदी होती की एक प्रकारची गुंतवणूक, की आईवरील तुमचं ‘प्रेम’? ते मला कधीच कळलं नाही…
बाबा, मला सांगा..तुमच्या भावना न बोलताच आईला कशा कळायच्या? आज सुनीता, मला एक छानसा शर्ट भेट देणार आहे. तुम्हाला कधी आईनं भेट दिल्याचं मला आठवत नाही. मात्र गरम गरम पुरणपोळ्या खाऊन झाल्यावर तुम्हाला आलेली तृप्तीची ढेकर, हीच तिच्याकडून छान भेट मिळाल्याची पोचपावती असायची का?
काहीच न बोलता, ‘स्पेशल’ काहीच न करता तुम्ही एकमेकांना कसे समजून घेत होतात? की काही अपेक्षाच नव्हत्या, कधी तुम्हाला एकमेकांकडून. की फक्त बघूनच सारं कळत होतं? बरोबर राहूनच न बोलता सर्व उमजत होतं?
बाबा, मला इथं येऊन एक तास होऊन गेला. अजूनही सुनीता आली नाही. तिची वाट पाहून मी देखील कंटाळून गेलो आहे. आॅफिसच्या कामातून तिला बाहेर पडायला जमत नसावं, असं दिसतंय.
आज आमच्याकडे प्रेम आहे, पैसा आहे मात्र वेळच नाहीये, ते प्रेम व्यक्त करायला…त्यामानानं तुम्ही खरंच भाग्यवान होतात… आयुष्यभर आईवर अव्यक्त प्रेम करीत राहिलात आणि ती देखील तुम्हाला सावलीसारखी साथ देत राहिली…
बाबा, मी आता आटोपतं घेतो. मेसेज खूपच मोठा झालाय. वेळ आहे ना, तुम्हाला वाचायला?
तुमचाच,
अजय
मी मोबाईल बाजूला ठेवला व भाजी आणायला गेलेल्या अंजूची वाट पहात बसलो. खरंच आम्ही आमच्या सहजीवनात कोणतेही ‘डे’ साजरे केले नाहीत, नव्हे तसे करण्याची कधी गरजही वाटली नाही…
आमचा येणारा रोजचा दिवसच हा ‘व्हॅलेंटाइन’ आहे….

– सुरेश नावडकर
१७-२-२१

मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..