‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा–वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
विभाग – १०
- पुन्हां ज्ञानदेवांकडे :
पुन्हां ज्ञानदेवांकडे वळतांना, या अनॅलिसिसचा (विश्लेषणाचा) आपल्याला उपयोग होईल.
कांहीं निरीक्षणें :
- सुजाण, शिक्षित श्रोतृवंदासाठी टीकात्मक, दार्शनिक रचना करणें वेगळें ; आणि अर्धशिक्षित व अशिक्षित जनसाधारणांना गाण्यासाठी, ऐकण्यासाठी रचना करणें वेगळें, याची पूर्ण जाण ज्ञानदेवांसारख्या ज्ञानवंताला असणारच, यांत तिळमात्र शंका नाहीं.
- यावरून स्पष्ट उमगतें की, ज्ञानदेवांनी विविध पद्धतीच्या रचनांमध्ये भाषिक वैविध्य वापरलें, हा खरें तर त्यांचा स्ट्राँग-पॉइंट् आहे, व तो त्यांचें श्रेष्ठत्व सिद्ध करतो. त्यांचें ज्ञान, त्यांचें संतपण हे तर वादातीतपणें श्रेष्ठ आहेतच, पण साहित्यिक म्हणूनही ते श्रेष्ठच होते.
- साधारणजनांना कळेल अशा भाषेत, सरल, सोप्या शब्दांत, ते जन मग्न होतील अशा गायनसुलभ पद्धतीनें , भक्तिमार्गातून, उत्थानाचा पथ त्यांना दाखवून द्यायचा हें सोपें काम नव्हतेंच ; पण ज्ञानदेवांनी तें सहजपणें साध्य केलें. हें, भाषेचें, विचारांचें, प्रेझेंटेशनचें, वैविध्य ज्ञानेश्वरांचे मोठेंपण अधिकच वाढवतें.
निष्कर्ष :
- नंतरच्या काळात भक्तिपंथात बरेच असे संत झाले ज्यांनी भक्तिरसपूर्ण सरल, सोप्या रचना केल्या, जसें की एकनाथ, तुकाराम, सूरदास, मीराबाई, नरसी मेहता, चैतन्य महाप्रभू इ. मात्र, कालानुक्रमें पाहतां, ज्ञानदेव आणि त्यांची संत-मांदियाळी (नामदेव इत्यादी) हे आधुनिक भारतीय भाषांमध्ये, बहुधा याबातीत आद्य ठरतात .
- त्याचबरोबर, एकीकडे, जाणकारांसाठी टीकेसारखें गंभीर व प्रगल्भ लेखन, आणि दुसरीकडे, अर्धशिक्षित-अशिक्षितांना सहज समजेल अशा भाषेत, सहज गातां येईल अशा शब्दांत, अध्यात्मिक-पारमार्थिक विषय विशद करून सांगणार्या रचना करणें, याबाबतीत नंतरच्या काळात एकनाथांसारखे संत झाले खरे ; पण कालक्रमानें पाहतां मराठीत तरी, किंबहुना सर्व भारताच्या पटलावरील प्राकृत (व आधुनिक) भाषांच्या संदर्भातही, बहुधा ज्ञानेश्वरच कालक्रमानें आद्य असावेत. असा नवीन पायंडा पाडणारी व्यक्ती साधीसुधी नव्हेच !
- ज्ञानेश्वरांची सखोल , तसेंच ‘वाइड्’ (wide) , विस्तृत दृष्टी , तिच्यामुळे आलेले रचनात्मक वैविध्य, आणि त्यांचे कालातीत विचार , हें सर्व, ज्ञानेश्वरांचें वाङ्मयीन श्रेष्ठत्व अधोरेखित करते.
– इति लेखनसीमा .
– सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M – 9869002126 .
eMail : vistainfin@yahoo.co.in
– – –
LATTERATEUR DNYANESHWAR AND LINGUAL-VARIETY-Part – 10 / (10)