‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा–वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
विभाग – ३
आपण कांहीं व्यक्तींकडे नजर टाकूं या.
विभाग – ३ – अ
- एकनाथ : आपण एकनाथांच्या काव्यसंपदेकडे एक नजर टाकूं या.
- नाथांच्या ‘हिंदुतुर्कसंवादा’तील कांहीं भाग पाहूं –
‘बाबा आदम माया हवा (म्हणजे हौव्वा, ईव्ह) जाली । ती म्हणतां तुम्ही सैतानें नेली । …..
पांच वख्त खुदाचे जाले । बाकी वख्त काय चोरीं नेले ? …
तुरुक कहे वो बात सही । खुदाकु तो जात नहीं ।
बंदे खुदाकु नहीं जदाइ । वो कहे रसूलिल्ला हजरत परदे । …’
- यादवकालीन भाषेचे आणि मध्ययुगीन संतसाहित्याचे सुप्रसिद्ध अभ्यासक डॉ. शं. गो. तुळपुळे म्हणतात की, ‘सरकार-दरबारचे रीतिरिवाज नाथांना चांगले परिचित होते. … देहगांवचे किंवा शरीरगांवचे सुभेदार जिवाजीपंत आणि ब्रह्मपुरीचे सरकार आत्मारामपंत या दोघांतील अभयपत्रें, ताकीदपत्रें, अर्जदास्ती, जाबचिठ्ठ्या, कीलनामे इत्यादी नाथांनी लिहिली (आहेत) . ही रूपकें म्हणजे फारसीमिश्रित मराठी गद्याचा सुंदर नमुना आहे’.
त्यातील कांहीं भाग –
‘समस्त राज्यकर्ते धुरंधर, परगणे शरीराबाद सुभा, ताकीदपत्र दिधलें की कायापुरास जिवाजी नामें गृहस्थ. ……. त्यानें बंदोबस्त परगणा बुडविला आणि यमाजीपंत कमाविसदार यांचे घरीं एकांतस्थळ स्थापन केलें. त्यावरून हें ताकीदपत्र सादर केलें कीं नवीन मसुदे व कामगार आहेत ते त्यागावे. …. सरकार हुजुरांचे मुत्सद्दी कामगार आहेत, तर त्यांचें हातें काम घ्यावें. ….. बहुत काय लिहिणें ? हें ताकीदपत्र.’
- नाथांच्याच ‘भागवतटीके’चा कांहीं भाग पाहूं –
‘तैं अविद्येची जुनी पानें । गळूनि जाती तत्क्षणें ।
नवपल्लवीं विराजमानें । विरतृक्तपणें अनुरक्त ।। ……
सद्.भावाच्या आमोदधारा । सेवितां सुख जालें भ्रमरां ।
हृदयकमळीं केला थारा । मध्यमद्वारां चालिलें ।। ….
तेथें मोक्षसुखाचें धड । डोलतां दिसे अतिगोड ।
तेथें जीवाचें पुरत कोड । करिती घुमाड सोहं शब्दें ।। ….
मुमुक्षुमयूर अतिप्रीतीं । पिच्छें पसरूनि नाचती ।
येऊन वसंतवनाप्रती । टाहो फोडिती गुरुनामें ।। …’
*हें वाचून ज्ञानदेवांची आठवण येते. ( आणि तें स्वाभाविकही आहे, कारण एकनाथांच्या मनात ज्ञानेश्वरांबद्दल अपार श्रद्धा होती. ज्ञानेश्वरीची प्रत त्यांनीच, तिच्यातील क्षेपक काढून, शुद्ध केली ; आणि आज वारकरी पंथ त्याच प्रतीला मान्यता देतो. )
एकनाथी भागवतातील,
‘संस्कृतवाणी देवें केली । प्राकृत काय चोरापासौनि जाली ?
असोतु या अभिमानभुली । वृथा बोलीं काय काज ?’
हे तर ज्ञानदेवांच्या मराठी भाषेच्या अभिमानासारखेंच बोलणें आहे ; फक्त तत्कालीन परिस्थितीनुसार, अधिक स्ट्राँग .
*डॉ. तुळपुळे म्हणतात, ‘या दोन सत्पुरुषांत (ज्ञानदेव आणि एकनाथ) कालानें जरी तीनशे वर्षांचें अंतर असलें तरी दोघांची हृदयें मात्र एक आहेत.’
- रुक्मिणीस्वयंवर‘ या आख्यानाचा विषय असा आहे की, त्यामुळे त्यातील भाषाही वेगळें रूप घेतें. –
हें श्रीकृष्णाचें वर्णन पहा-
‘अतिसुरंग चरणतळें । उपमे कठिण रातोत्पळें ।
बालसूर्याचेनि उजाळें । तैसी कवळें टांचांची ।। …
सुनील नभाचिया कलिका । तया आंगोळिया देखा ।
वरि नखें त्या चंद्ररेखा । चरणपीयूषा लुब्धल्या ।। …’
याच ग्रंथात पुढे रुक्मी जेव्हां कृष्णाबद्दलच्या द्वेषानें बोलतो, तेव्हां भाषेचें वेगळें वळण पहा –
‘एक म्हणती नंदाचा । एक म्हणती वसुदेवाचा ।
ठाव नाहीं बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ।।
मुळीच नाहीं जन्मपत्र । कवण जाणें कुळगोत्र । … ’
( त्यातूनच, पुढे एकनाथांनी पारमार्थिक अर्थही आणलेला आहे ).
- हेच एकनाथ जेव्हां पदें, भारुडें, गौळणी, गोंधळ, जोहार, ‘डौर’ लिहितात, तेव्हां त्यांची भाषा वेगळें रूप घेते . ( त्यांतूनही, एकनाथांनी पारमार्थिक अर्थ आणलेला आहे ) . कांहीं उदाहरणें बघूं या –
- असा कसा देवाचा देव बाई ठकडा ग । देव एका पायानें लंगडा ग ।।
- वारियानें कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।
राधा पाहुनि भुलले हरि । बैल दुभे नंदाघरीं ।।
हरि पाहुनि भुलली चित्तां । राधा घुसळी डेरा रिता । …..
- कृष्णा माझा पदर धरूं नको, सोड ।
जाउनि सांगेन मी यशोदेला । मोडिन चांगली खोड ।।
- दार उघड बया दार उघड । ….
रणवाद्य भम् भम् भम् । दण् दण् दण् कड् कड् कड् ।
तोच गोंधळ अंबे तुजप्रती । बया दार उघड ।।
- उदो म्हणा उदो पांडुरंग माउलीचा वो ।
तुझियेनि नामें गोंधळ घालिन सत्वाचा वो ।।
- आलें धरा, ढवळा धरा, मासा धरा, बांदी धरा ।
जातें धरा, मेंढा धरा, बेटकुळी धरा । …
- मी आलों रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ।।
- जोहार मायबाप जोहार । मी विठू पाटलाचा महार ।
हिशेब देतो ताबेदार । लंकेचा कारभार कीं जी मायबाप ।।
- शंखिण बाबा डंखिण रे ।।
हाट करूनि घरासि आणली बसली वसरिच्या काठीं रे । …
*या प्रकारच्या रचना एकनाथांनी, सामान्य जनांनी गाव्यात अशा प्रकारेंच लिहिल्या आहेत , (आणि त्यांतून पारमार्थिक ज्ञानही दिलें आहे). आजच्या ‘आधुनिक’ काळातील किती माणसांना एकनाथांच्या, say, ‘रुक्मिणीस्वयंवर’ काव्यातील बारकावे माहीत असतील’ ? ; मात्र मराठी जनांना ‘बया दार उघड’ हें पद नक्कीच माहीत आहे.
*एकनाथांच्या कुठल्याही काव्याला कमी लेखायचा येथें हेतू नाहींच. जिजाबाई आणि शिवाजी राजे एकनाथांचें ‘भावार्थ रामायण‘ इत्यादी, पुराणिकांकडून वाचवून घेत होते (असें म्हणतात) ; व त्या काव्यांचा शिवबांच्या मनावर नक्कीच परिणाम झाला असला पाहिजे. यावरून त्या काव्यांचें श्रेष्ठत्व आणि त्यांची महती कळून येते.
* एक मुद्दा : पण, मुद्दा हा, की, कुठलेंही काव्य गाणें (सुरात म्हणणें) हें, अर्धशिक्षित-अशिक्षित जनसामान्यांसाठी नक्कीच सोपें आहे, व त्यामुळे तशा प्रकारच्या रचना एकनाथांनी (तसेंच ज्ञानदेवांनी व इतर संतांनीही) केल्या.
*अर्थातच, एकनाथांनी निरूपणातील भाषेपेक्षा, आणि ‘पंडिती’ पद्धतीचे वर्ण्यविषय असलेल्या व तशी मांडणी असणार्या पारंपरिक पद्धतीच्या आख्यानकाव्यातील भाषेपेक्षा, अभंग, भजनें, भारुडें, गोळणी इत्यादींमध्ये भाषेचें वेगळें ‘रूप’ (style), हेतुत: वापरलें. त्याचें कारण म्हणजे, त्या पद्धतीच्या रचनांचा audience सामान्य अर्धशिक्षित-अशिक्षित माणूस आहे व तें गायलें जाणार आहे (सुरात म्हटलें जाणार आहे) . मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांचें प्रबोधन करायचें आहे, हा नाथांचा हेतू होता. –
– सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M – 9869002126 .
eMail : vistainfin@yahoo.co.in
– – –
LATTERATEUR DNYANESHWAR AND LINGUAL-VARIETY – Part – 3-A