“मानवी भाव भावनांचं रहाणीमानाचं आणि समाजाचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपटामधून उमटलेलं दिसतं. भारतीय सिनेमांमधून देखील ते घडलं. अगदी पारंपारिक, आध्यात्मिक विषय देखील आपल्या चित्रपटासाठी नवीन नाही. विशेष म्हणजे सणासुदींची परंपरा, व्रत वैकल्ये यांसारखे विषय हिंदी व प्रादेशिक चित्रपटांना अपवाद नव्हते; मग दिवाळी सारखा “राजेशाही सण” तरी कसा चित्रपटांपासून लांब असेल. खरंतर हिंदी पेक्षा आजही आपल्याला मराठी चित्रपट लक्षात रहातात, ज्यामध्ये दिवाळी सणाचा महिमा, व सणाच्या अनुषंगाने असलेली सुरेल गाणी व सुश्राव्य संगीताच्या माध्यमातून गुंफण झालेली दिसून येते.”
मराठी रुपेरी पडद्यावर सतत प्रयोग आणि नविन विषय असं काही स्वरुप हे गेल्या शतकात पहायला मिळालं आणि इथून पुढेही हे पाहायला मिळेल अशी आशा नक्कीच आहे. कारण कथेची अनोखी रचना करणं हे आपल्याकडे बर्यापैकी जुळलेलं गणित आणि मग त्यातून गाण्यांची सुरेल जोडणी देखील होत जाते. आता बघा ना कौटुंबिक चित्रपटांचा आणि दैनंदिन घटनांशी त्याचा संबंध येतो, हे चित्र उभं करणं रास्तंच होतं, पण ती इतकी प्रेमळ व हळव्या शब्दांत लिहिली जातात की रसिक सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले आहेत, आणि सणांची गाणी, संगीत याचा जेव्हा विचार होतो तेव्हा प्रेमळ व भावनिक पद्धतीने केलं गेलेलं वर्णन दिसून येतं. यासाठी आपल्याला अगदी ४० च्या दशकांपासून रुपेरी पडद्यावर नजर टाकावयास हवी. तेव्हा लक्षात येईल की “लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया” गाण्यामध्ये पूर्णत: मशालीचा वापर झालेला दिसून येतो. त्यानंतर म्हणजे चित्रपटाच्या सुवर्णकाळात अनेकदा दिवाळीचा लखलखता चेहरा गाण्यांच्या माध्यमातून दिसतो. “शिकलेली बायको” या चित्रपटातलं “वर्षाचा हर्षाचा दिवाळा सण आला” हे पी. सावळाराम यांचं गीत हर्षोल्लासित करणारं आहे. “भाऊबीज” ह्या चित्रपटात देखील बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचं भाष्य करणारी कथा रेखाटण्यात आलेली आहे. याला जोड होती सुलोचना दिदी आणि सूर्यकांत यांच्या अभिनयाची. या चित्रपटातील “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती” या दिवसाची माहिती पटवून सांगत; उषा मंगेशकर आणि सहकार्यांच्या स्वरातलं गीत “आली दिवाळी….आली दिवाळी”, कोर्टाची पायरी या चित्रपटातलं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं बालगीत या प्रकारात मोडणारं होतं. दिव्याचं महत्व पटवून सांगणारं, “ते माझं घर” या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातलं, रविंद्र भट यांचं गीत “दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नि माझी प्रिती” अवीट गीताने सुश्राव्य केलं ते बाबुजींनी.
रंगीत पडदा देखील, दिवाळीच्या प्रकाशानं उजळला. यामध्ये आवर्जुन गीताचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे अष्टविनायक या चित्रपटातील “आली माझ्या घरी ही दिवाळी” या गाण्याचा. “दिवाळी येणार अंगण सजणार…” हे अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं गाणं होतं “माझा मुलगा” या चित्रपटातील. तसंच अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं आणखीन एक गाणं “लक्षदीप हे उसळल्या” आपल्याला ऐकायला मिळालं. “आई पाहिजे” चित्रपटातून, आशा काळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाच्या या गीताचे शब्द होते शांताराम नांदगांवकर यांचे. या गाण्यांच्या प्रसंगांत आशाजी संसारातील जुन्या आठवणींमध्ये रममाण झालेल्या दिसल्या आणि त्यानिमित्ताने त्यांच्या डोळ्यासमोर दिवाळीचा प्रसंग उभा राहतो, आणि गाणं सुमधुर वाटत राहतं.
अशा प्रकारे “प्रभात काला” पासून दिवाळी सणांनी रजतपटाला अक्षरश: लख्ख केलं आणि प्रेक्षकांच्या तोंडावर ही गाणी रुंजी घालत आहेत ते आजतागायत. असो पण एकूणच सणांच्या निमित्ताने तरी ही गाणी ऐकली जातात आणि त्या प्रकारची वातावरण निर्मिती करण्यासाठी, याचं एक कडवं देखील पुरेसं ठरतं.
Leave a Reply