आज दिवाळसणाचा चवथा दिवस. दिवाळीची चवथा दिवस म्हणजे सरत्या विक्रमसंवताचा शेवटचा दिवस.. अश्विन वद्य अमावास्येचा हा दिवस ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस..
शेतकऱ्याची दौलत, संपत्ती म्हणजे त्याचं गोधन.. कृषीसंस्कृतीतील सर्वात मोठ्या सणाच्या या चवथ्या दिवशी गांवाकडील शेतकरी गोठ्यातील गो-धनाची, शेळ्या-मेंढ्यांचीपुजा केली जाते…तर शहरात पैसा-सोनं-नाणं म्हणजे लक्ष्मी असं आपण मानत असल्याने त्यांची पूजा करतात..व्यापारीजनांचं नववर्ष उद्यापासून सुरू होणार म्हणून पुढील वर्षीच्या हिशोबाच्यी नव्या चोपड्यांचं पूजन ह्या दिवशी करतात.. व्यापारीलोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतरच्या दिलशी येणाऱ्या पाडव्यापासून सुरू होतं.
या दिवशी वामनाकडून बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करतात अशी पुराण कथा आहे..हा दिवस मुंबईसारख्या लक्ष्मीचा वरदहस्त असलेल्या शहरातील बाजारपेठामध्ये मोठा धामधुमीचा असतो.नयनरम्य रोषणाई, मिठायांचं वाटप, नटून-थटून आलेल्या सर्व वयाच्या आणि आकाराच्या शेठाणी, त्यांच्या आलिशान गाड्या साक्षात लक्ष्मीचा वावर डोळ्यांसमोर उभा करत असतात..डेसीबलची आणि कोर्टाच्या नियमांची पत्रास न ठेवता केलेली फटाक्यांची धडाडधूम डोळ्यांचं पारणं फेडणारी असते..आपण हिन्दू संस्कृतीचा भाग आहेत हा अभिमान या क्षणी निदान मला तरी होतो..
या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. लक्ष्मीपूजन जरी घराघरात साजरं होत असलं तरी हा दिवस खरा लक्ष्मीपुत्र व्यापाऱ्यांचाच.. व्यापारीजन हा दिवस फार उत्साहात साजरा करतात. आणखी एक प्रथा गांवाकडे आणि शहरातही मराठी लोकांत आवर्जून पाळली जाते ती म्हणजे या दिवशी घरी-दारी-गोठ्यात स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी झाडू विकत घेतात..झाडूला साक्षात लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी शिंपडून, तीला सवाष्ण लक्ष्मी मानून तीची हळद-कुंकू वाहून मनोभावे पुजा करतात व नंतरच घरात वापरण्याससुरूवात करतात..स्वच्छतेच्या ठिकाणीच लक्ष्मीचा वास असतो ही श्रद्धा या प्रथेमागे असावी..किंवा घरातलं अमंगल झाडून काढून घरात मंगलाचा वास झाडू निर्माण करते म्हणून तसं केलं जात असावं..
आजच्या लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना शुभेच्छा..आपल्या घरादारात लक्ष्मी व सोबत सरस्वतीचाही वावर राहावा ही शुभेच्छा..! सरस्वती सोबत असली की लक्ष्मी डोक्यावर बसत नाही..
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply