नवीन लेखन...

सुशिक्षित सभ्य सज्जन अभिनेता – देवेन वर्मा

Deven Verma

ते साल २००५ असेल. त्यादिवशी  मी पुण्याच्या बाहेर होतो. मला माझ्या  ड्रायव्हर चा फोन आला ” साहेब, कल्याणी नगर चौकात मी आपली पालिओ गाडी दुसर्या अक्सेंट गाडीला हलकी ठोकली आहे, समोरच्या गाडीचा दरवाजा थोडा चेपला आहे आणि त्या गाडीचा मालक मला सोडत न्हवता त्यामुळे मी त्याला तुमचा नंबर दिला आहे, तो तुम्हाला फोन करेल”

मी त्याचे बोलणे ऐकून वैतागलोच. अरे असा कसा निष्काळजीपणे गाडी चालवत होतास? किती नुकसान झाले त्याच्या गाडीचे आणि आपल्या गाडीचे?” त्यावर तो म्हणाला ” साहेब मी व्यवस्थित गाडी चालवत होतो, त्या चौकात त्या माणसाची गाडी अचानक समोर आली, मी ब्रेक मारला पण तोपर्यंत आपली गाडी त्याच्या गाडीला टेकली होती; आपल्या  गाडीचा फक्त पुढचा बम्पर चेपला आहे पण त्याच्या गाडीचा डावा दरवाजा चेपला आहे आणि तो आपले नाव देवेन वर्मा म्हणून सांगतो आहे”.

एवढे बोलून त्याने फोन ठेवला.त्यानंतर दोन मिनिटात माझा फोन वाजला.

“हॅलो, मी देवेन बोलतोय”

मी म्हटले “कोण देवेन?”

“अरे यार देवेन वर्मा, पूना से बोल रहा हू, आपके ड्रायव्हर ने मेरे कार को ठोक दिया है”

मी म्हटले मी दोन दिवस पुण्याच्या बाहेर आहे – आता लगेच येऊ शकत नाही.

त्यावर वैतागत ते म्हणाले ” अरे यार तब तक मैं क्या करू?” नंतर ते बडबडत होते की मी कमिशनर ला फोन लावतो, तक्रार करतो, तुमचा ड्रायव्हर बहुतेक पियालेला दिसतोय – त्याची रक्त चाचणी करायला लावतो वगैरे मराठीत पण बोलू लागला.

मी म्हटले ” गाडी चालू है ना? बंद नही हुई ना? तो दो दिन चला लो – मैं आता हू और आप को मिलता हू – मैं मेरा फोन और पता आपको मेसेज करता हू “; असे म्हणून मी माझा पत्ता आणि फोन नंबर त्यांना मेसेज करून दिला.

ह्या माझ्या म्हणण्या वर त्यांचे बहुधा समाधान झाले असावे आणि मला ठीक आहे म्हणून दोन दिवसांनी भेटून बोलायचे मान्य केले आणि आपला कल्याणी नगर चा पत्ता त्यांनी मला मेसेज करून पाठवून दिला.

दोन दिवसांनी मी पुण्या ला परतलो. मनात म्हटले हा कोण जो वर्मा आहे त्याला आपण आश्वासन दिल्याप्रमाणे भेटायला जायला हवे., वर्मा म्हणजे बहुतेक पंजाबी किंवा दिल्ली वाला असावा. ड्रायव्हर मायकेल कडे चौकशी केली. मायकल पालियो गाडी माझ्या मुलाला शाळेत न्यायला वापरायचा. त्या दिवशी पण तो तसाच त्याला शाळेत घेऊन चालला होता (मी मुंबई ला होतो). कल्याणी नगर मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र जवळच्या चौकात पालियो आणि वर्माची गाड्यांची टक्कर झाली होती. तो म्हणाला साधारणपणे पासष्ट वर्षांचा गृहस्थ होता. जेव्हा टक्कर झाली तेव्हा जमलेले लोकं म्हणत होते ह्या बाबाला बहुतेक चष्मा न लावता गाडी चालवल्यामुळे व्यवस्थित दिसत नसावे, त्यामुळे तो पुढे आला आणि आपल्या गाडीला धडकला असावा. मी मनात म्हटले ” वाह रे वर्मा, स्वतः चष्मा न लावता गाडी चालवली आणि माझा ड्रायव्हर पिऊन गाडी चालवत असावा असा आरोप करतो” – ठीक आहे निदान भेटीमध्ये बोलताना हा पॉईंट लक्षात ठेवायला हवा.

दुसऱ्या दिवशी सकाळी वेळ काढून त्यांच्या कल्याणी नगर च्या घरी गेलो. जायच्या आधी त्यांना फोन केला. सकाळी साडे दहा च्या सुमारास त्यांच्या घरी पोचलो. छोटासा बंगला होता तो. मी बेल वाजवली. सफेद झब्बा कुडता घातलेल्या वर्मानी हसत हसत दरवाजा उघडला आणि म्हणाले “सावंत क्या ? आओ अंदर आओ”. मी त्यांना पहाताच चकित झालो. कारण माझी अपेक्षा होती की कोणी पंजाबी माणूस दरवाजा उघडेल पण समोर होता माझा आवडीचा चित्रपट कलाकार आणि हास्य अभिनेता देवेन वर्मा!

मी त्यांना म्हटले आत नको इथेच बाहेर व्हरांड्यात बसू. तेथे चार खुर्च्या आणि टीपॉय मांडलेलेच होते. तेथेच आम्ही बसलो.

त्याक्षणीच मी ठरवून टाकले आपल्या आवडत्या अभिनेत्याला ह्या अशा रीतीने का होईना भेटायचा योग्य आला आहे , मगआता जास्त काही बोलायचे नाही, जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई करून द्यायची.

त्यांनी मला माझी माहिती विचारून घेतली आणि मग सरळ मराठीत बोलणे चालू केले. मी त्यांना त्यांची कार दाखवायला सांगितली. हुंदाई ची ऐसेंट गाडी होती. डावीकडचा दरवाजा थोडा चेपला होता आणि एक दोन ओरखडे आले होते. वर्मा म्हणाले “माझी इन्शुरन्स पॉलिसी आहे पण मला पॉलिसी वापरून हे काम करायचे नाही आहे – त्यामुळे “नो क्लेम” बोनस जाईल. तर माझी अशी अपेक्षा आहे की हे काम तुम्ही करून द्यावे. त्यावेळी माझ्याकडे पालिओ व्यतिरिक्त हुंदाई ची एलेन्ट्रा गाडी होती. ज्या सर्व्हिस स्टेशन ला  मी गाडी द्यायचो त्याच सर्व्हिस स्टेशन ला देवेन वर्मा पण गाडी द्यायचे. हुंदाई च्या माणसाला बोलावून घेतले, त्याने सर्व्हे केला आणि कामाचे एस्टीमेट दिले – जे जास्त न्हवते; म्हणजे माझ्या बजेट मध्ये होते त्यामुळे त्याला मी लगेच ती गाडी कामासाठी घेऊन जायला सांगितले.

तो हुंदाई चा माणूस गाडी न्यायला येईपर्यंत जो पाऊण तासांचा वेळ होता त्यामध्ये मला देवेन वर्माशी संवाद साधता आला आणि त्यांच्याशी बोलता आले. दरम्यान त्यांनी हाक मारून रूपा ला चहा बिस्किटे आणायला सांगितली. रूपा वर्मा – गांगुली स्वतः चहा बिस्किटे, केक भरलेला ट्रे घेऊन आल्या. रूपा गांगुली ह्या अशोक कुमार ह्यांच्या कन्या. त्यापण आमच्या सोबत बसल्या. चहा घ्यायचा आग्रह करत गप्पांमध्ये सामील झाल्या. ठरलेल्या कामाव्यतिरिक्त चर्चा अर्थात नंतर सिनेमा वर गेली. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांची चर्चा झाली – अगदी “अनुपमा” पासून ते “रंगबिरंगी” पर्यंत आणि अलीकडच्या “दिल” पासून ते “मेरे यार कि शादी है” पर्यंत.

त्यांनी जवळ जवळ १५० चित्रपटातून काम केले. वडील चांदीचे व्यापारी होते जे नंतर वितरक म्हणून फिल्म लाईन मध्ये आले. मोठी बहीण पुण्याला असल्याने पुण्याला आले. वाडिया मध्ये शिक्षण झाले. पुण्यात वास्तव्य केल्याने थोडेफार मराठी येऊ लागले. ग्रॅज्युएट झाल्यावर पुढे वकिली शिकायला मुंबई ला जाणे झाले – वकिली चे शिक्षण पूर्ण झाले नाही पण हिंदी फिल्म लाईन मध्ये प्रवेश झाला. सुरवातीचा “धर्मपुत्र” चित्रपट फ्लॉप झाला. पण त्यानंतर “देवर”, “अनुपमा”, “अंगूर”, “रंगबिरंगी” असे अनेक चित्रपट केले. “चोरी मेरा काम” मध्ये त्यांची भूमिका लक्षणीय झाली. त्यांच्या काही चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय होत्या जशा “मेरे अपने”, “गोलमाल”, “खट्टा मीठा”, “नौकरी”, “दुसरा आदमी”, “आप के दिवाने” वगैरे. देवेन वर्मा ह्यांनी काही चित्रपटांची निर्मिती पण केली होती – “यकीन”, “बडा कबुतर”, “बेशरम”, दाना पानी”  वगैरे. सहकलाकार आणि साथीदारांचा विषय झाला. डेव्हिड, शशी कपूर, किशोर कुमार ते जितेंद्र आणि राकेश रोशन पर्यंत आठवणी काढायला त्यांनी. अमिताभ बद्दल पण त्यांनी उल्लेख केला – त्याच्या “तूळ” राशीबद्दल – त्याच्या सभ्यपणाबद्दल , त्याच्या वक्तशीरपणा आणि त्याच्या प्रोफेशनॅलिसम  बद्दल.

मुंबई सोडून पुणेकर कधीपासून झाले विचारले असता १९९३ पासून म्हणून सांगितले (मुंबई पेक्षा पुणे आवडते अशी खास पुणेरी टिप्पणी पण केली). आता फिल्म का करत नाही तर ” वो दिन और वैसे लोग अब फिल्म इंडस्ट्री मी नही रहे भैया” – असे उदगार त्यांनी काढले. पूर्वी सलग शूटिंग होत असे आणि ते बहुधा स्टुडिओ मधेच होत असे. आउट डोर लोकेशन खूप कमी असायचे. त्यावेळी लोकं “परफॉर्मन्स” वर बोलायचे आता लोकं “आयटेम नंबर आणि डान्स” वर जास्त बोलतात. नव्या लोकांना “अटीट्युड” खूप आहे.  नव्या लोकांना आमच्यासारख्या जुन्या मंडळींची (विशेष करून आमच्या सारखे जे लाईम लाईट मध्ये नाहीत त्यांच्यासारख्याची) कदर आणि आदर राहिलेली नाही.  आतापर्यंत जेवढे केले काम ते बस झाले – ” जो है वो काफी है – जिंदगी फिर भी यहा खूबसूरत है” असे म्हणून हसू लागले.

त्यांच्या कार ला झालेल्या अपघाता निमित्ताने त्यांना भेटता आले, त्यांच्याशी बोलता आले. ह्या माणसाने आपल्या “अभिनेता” असल्याच्या स्टेटस चा बाऊ केला नाही. त्याने मला सुरवातीला फोन केला तेव्हा मी फिल्म अभिनेता “देवेन वर्मा” असे सांगितले नाही. माझ्यासाठी दोन दिवस थांबला.त्याच्या घरी गेल्यावर आक्रस्ताळेपणा नाही, आपण गाडीचे काम करून द्या ही आपली अपेक्षा मोकळेपणाने सांगितली. त्याशिवाय व्यवस्थित पाहुणचार आणि गप्पा. निरोप घेताना, निघताना ” फिर वापस कभी भी आना भाई” म्हणून निरोप दिला. परत त्यांच्या कडे जाणे झाले नाही. कामच पडले नाही. हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर विनोदाला सभ्यपणा आणि शालीनता देणारा सुशिक्षित, सभ्य आणि सज्जन अभिनेता २ डिसेंबर २०१४ रोजी काळाच्या पडद्याआड निघून गेला.

२३ ऑक्टोबर (१९३७) हा त्यांचा जन्मदिवस, त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला दिलेला हा उजाळा.

— प्रकाश दिगंबर सावंत 

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..