एक बाप आपल्या सोळा वर्षाच्या मुलासह एका कारखान्याच्या दरवाजात उभा होता. त्याच्या मुलाचा नुकताच दहावीचा निकाल लागला होता. त्याला दहावीत त्रेसष्ट टक्के गुण मिळाले होते. त्याला त्यावेळी एवढया गुणांच्या जोरावर कोणत्याही महाविद्यालयात हव्या त्या शाखेत प्रवेश मिळाला असता पण त्यानं रात्रमहाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता आणि दिवसा कामाच्या शोधात तो आपल्या बापाबरोबर या कारखान्यात आला होता. त्या मुलाच्या हातात त्याच्या दहावीच्या गुणपत्रिकेची प्रतही होती. कारखान्याचे मालक येताच त्यांनी त्या मुलाला कामावर ठेवून घेतलं. त्याच्या शिक्षणाच्या आड काम कधीही येणार नाही अस आश्वासनही दिलं. मुलाला तिथेच कामाला ठेवून त्याचा बाप निघून गेल्यावर ‘‘चल कामाला सुरवात कर’’ म्हणत प्रथम त्याला कारखाना झाडून स्वच्छ करण्यास सांगितलं. त्या मुलानं काळजीपूर्वक कारखाना स्वच्छ केला. कारखान्यात काम करणारे इतर कामगार वयोवृद्ध होते. आणि त्यातील एकही फारसा शिकलेला नव्हता. त्यातल्या त्यात हा एकच मुलगा थोडा जास्त शिकलेला होता. पण सगळयात हलकं काम त्याच्या वाटयाला आलं होतं. आता कारखान्यातील त्याच काम ठरलं होतं. सकाळी कारखान्यात आल्याबरोबर कारखाना झाडून पुसून स्वच्छ करायचा. त्यानंतर पाणी भरायचं आणि ते झाल्यावर इतर कामगार आणि मालक ज्या आज्ञा देतील त्या निमूटपणे पाळायचा. त्यामुळे लवकरच तो मुलगा कामगारांसह मालकाचाही लाडका झाला. हळूहळू मालक त्याच्यावर जबाबदारीची कामं टाकू लागला. ती तो जराही चुका न करता करू लागला. संध्याकाळी कारखाना सुटल्यावर तो मुलगा सरळ महाविद्यालयात जायचा आणि तेथून रात्री अकराच्या सुमारास घरी गेल्यावर जेवून तो झोपी जायचा. अभ्यास करायला त्याला वेळ मिळायचा तो फक्त रविवारी. त्याचा रविवार मात्र स्वतःचा अभ्यास करण्यापेक्षा त्याच्या भावंडांना आणि इतरांना अभ्यासात मदत करण्यातच निघून जायचा. जो तो त्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेनं यायचा आणि तो कधीच कोणाला निराश करायचा नाही. त्याच्या तोंडात कधी ‘नाही’ हा शब्दच नसायचा. त्याचाच परीणाम त्याच्या अभ्यासावर होत होता. शाळेत असताना एक चांगला चित्र काढणारा आणि निबंध लिहीणारा म्हणून त्याची ख्याती होती, तीच त्याला जड जात होती. कागदावर चित्र रेखाटताना एक मोठा चित्रकार किंवा कागदावर निबंध लिहीताना एक मोठा लेखक होण्याचं स्वप्न पाहणारा तो मुलगा कारखान्यात झाडू मारत होता. झाडू मारता मारता एक दिवस त्याच्या हातात व्हर्निअर आणि मायक्रोमीटर सारखी मोजयंत्रे आली आणि त्यानं अंतर मोजण्यात तो पटाईत झाला आणि मग त्याच्या हातात आली लेथ, शेपिंग, सरफेस, ग्राईडिंग, इनग्रिविंगमशीन सारखी मोठमोठाली यंत्रे . त्या यंत्रावर तो स्वार झाला. प्रथम जेव्हा तो या कारखान्यात आला तेव्हा या यंत्राकडे पाहिल्यावर त्याला घाम फुटला होता. पण आता तिच यंत्र त्याच्या हातातील खेळणं होऊ पहात होती. अतिशय कमी वेळात त्यानं कारखान्यात बरचं काही आत्मसात केलं होतं. जे करणं एका सामान्य माणसाचं काम खचितच नव्हतं. कारखान्यात काम करता करता त्यानं आपलं बारावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षणाला राम राम ठोकला. कारण त्याला आता ज्ञान कमविण्यापेक्षा पैसा कमविण्याची आवश्यकता अधिक वाटत होती. कारण तो पैशानेच आपल्या भावंडांसाठी ज्ञान विकत घेऊ शकत होता. जे त्याला मिळाल नाही ते आपल्या भावंडांना देऊ शकत होता. आणि ते देण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत होता. देवाच्या कृपेनं त्याच्या प्रयत्नांना यश येत होतं. घरातील गरीबी त्याला सारखी नागिणीसारखी डिवचीत होती. विजेच बील न भरल्यामुळे जवळ – जवळ वर्शभर त्याच्या कुटूंबावर अंधारात राहण्याची वेळ आली होती. रात्री त्याचा बाप खाण्यासाठी काहीतरी घेऊन येईपर्यंत उपाशी रहावं लागत होतं. त्याच्या आणि त्याच्या भावांच्या अंगावर एकही कपडयाचा नवीन जोड नव्हता. घरात वीजच नाही तर पंखा, टी.व्ही. वगैरे वस्तूंचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आईच्या अंगावरचा एकुलता एक दागिनाही गहाण पडला होता. तो आणि त्याची भावंडं पाच-दहा रूपये मिळविण्यासाठी टिकल्या, बांगडया, कपडयांचे धागे कापणे वगैरे कामे करत होती. तो मुलगा स्वतः आठवीत असताना माडीच्या दुकानाबाहेर चणे आणि अंडी विकत असे. रात्री बारा- बारा वाजेपर्यंत बापाबरोबर कांद्याच्या बुर्जीपावाच्या गाडीवर फिरत असे आणि सकाळी अनवानी शाळेत जात असे. तेही खाजगी शाळेत ज्या शाळेची फी तो कधीच वेळेवर भरत नसे. त्यामुळे कित्येक वेळा त्याला शाळेतून माघारी घरी यावं लागत असे तेव्हा त्याला उपयोगी येत शेजारी पाजारी ! जे त्याच्या नात्याचे होते ना गोत्याचे. त्यामुळे त्याच्या मनात नात्या-गोत्याच्या माणसांबद्दल प्रचंड तिरस्कार होता आणि इतरांसाठी प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. तो स्वतः जळून आपल्या भावंडांना प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याची भावंडंही त्याच्यासारखीच इतरांना मदत आणि प्रेम देण्यात तत्पर असणारी, त्या मुलाच्या घरात पैसा नसला तरी त्या घराला नाव होतं, प्रतिष्ठा होती. त्याचा बाप दारूडया असला तरी निदान आपल्या मुलांना पोटभर अन्न मिळावं म्हणून तो प्रसंगी हमालीही करायला धजावत नव्हता. एकेकाळी त्याचा या बापाच्या नावापुढे शेट लावलं जायचं. तेव्हा तो होताही तसा; त्याच्या मुलांच्या तोंडून एखाद्या वस्तूची मागणी होण्यापूर्वीच ती वस्तू त्यांच्यांसाठी हजर व्हायची. धंद्यातील नुकसानीमुळे आणि दारूच्या व्यसनामुळे तो अधिक खचत गेला. कर्जबाजारी झाला. नाईलाजानं त्याला आपल्या सर्वात आवडत्या मुलाला वयाच्या सोळाव्या वर्षी एका कारखान्यात कामाला ठेवावं लागलं. त्या मुलाला त्याचे पूर्वीचे दिवस आठवले की त्याच्या डोळयात अश्रू यायचे. त्याच्या बापापुढे पैशासाठी हात पसरणारेच आता त्याच्या बापावर हसत होते. रागाच्या भरात तो मुलगाही आपल्या बापाला नको – नको ते बोलत असे, पण त्याच्या मनात आपल्या बापाबद्दल आदर आणि प्रेमही तितकंच होतं. बापान केलेला कर्जाचा डोंगर त्याला पार करायचा होता. अचानक एक दिवस एका महापुरुषांची त्याच्या बापावर कृपा झाली आणि त्यांनी दारू प्यायची सोडून दिली. हा त्या मुलाच्या आयुष्यात झालेला सर्वात मोठा चमत्कार होता. त्याच्या बापानं धंदा करण्याऐवजी नोकरी करण्याचा मार्ग पत्करला. त्या मुलाच्या मदतीला आता त्याचा बापही खंबीर उभा राहीला होता. ‘दया, क्षमा, षांती, जेथे तेथे देवाची वस्ती’ या म्हणीप्रमाणे आता त्यांच्या घरात देवाची वस्ती होऊ लागली. संकटं येत होती पण त्यांचचं निवारण होत होतं. त्या घरात यशामागून यश येत होतं. तो मुलगा सतत काम करत होता. आराम फक्त तेव्हाच घ्यायचा जेव्हा तो आजारी पडायचा. एवढं करूनही पुरेसा पैसा त्याच्या हाती येत नव्हता पण आता तो स्वतःला सुखी समजत होता आणि जे मिळत होत निदान त्यात तो तरी समाधानी होता. कारखान्यात त्या मुलाबरोबर काम करणारे बहुतेक कामगार दारूडे, बेवडे, जुगारी आणि व्यसनी होते. त्याच्या स्वभावाचा आणि दुर्गुणांचा त्याच्यावर अजिबात परीणाम होत नव्हता. स्वतःला व्यसनापासून दूर ठेवणारा माणूसच आयुष्यात यशस्वी होतो यावर त्याचा ठाम विश्वास होता. त्या कारखान्यात तो इतरांपेक्षा वेगळा असूनही सर्वांशी मिळून मिसळून रहात होता. तो त्यांच्या आनंदात सामील होत नव्हता पण दुखःत सामील होत होता. हेच त्याच मोठेपण होतं. त्या कारखान्यातील प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा त्याच्या आर्थिक परीस्थितीचा आणि कौटुंबिक परीस्थितीचा तो अभ्यास करत होता. शिक्षण सोडल्यानंतर मिळेल ते साहित्य वाचण्याचा त्याने सपाटा लावला. तो नियमित वर्तमानपत्र वाचू लागला. त्याच्या ज्ञानात प्रचंड भर पडली. अशातच त्याला अनेक स्वाध्यायी मित्र भेटले. ज्यांचा त्याच्या व्यक्तीमत्वावर प्रचंड प्रभाव पडला. ईश्वर नावाची एक अज्ञात शक्ती या विश्वात वावरते आणि ती मनुष्यास संकटसमयी मदत करते. या ठाम मतावर तो पोहचला. तारूण्य सुलभ भावनेतून त्या मुलाच्या मनातही एका मुलीबद्दल प्रेमभावना निर्माण झाल्या. ती मुलगी अतिशय हुशार होती. तिच्यात प्रचंड वक्तृत्व भरलेलं होत. दिसायलाही अतिश य सुंदर होती. त्याला तिच्या उज्वल भविष्याची चिंता होती म्हणून त्यानं आपलं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलं नाही. पण तिच्याबद्दल त्याच्या मनात असणा-या प्रेमभावना एका कवितेच्या रूपाने कागदावर साकार झाल्या आणि ती कविता एका नव्याने सुरू झालेल्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. त्या मुलाला आपल्या लेखणीबद्दल विश्वास वाटू लागला. त्यानं ज्या पेनानं ती कविता लिहिली ते पेन त्यानं जवळ – जवळ पाच वर्षे सांभाळून ठेवलं. त्या पेनानं त्यानं वर्तमानपत्रासाठी जेवढी पत्र लिहली ती सर्वच्या सर्व प्रकाशित झाली. लाखो लोक आता त्याचे विचार वाचत होते. त्याच्या विचारांचं वजन वाढत होतं त्या मुलीबद्दल त्याच्या हृदयात इसणार प्रेम हळूहळू कमी होत होत.कारण तो जितक्या वर चढत होता तितक्या पायऱ्या ती खाली उतरत होती. तिच्या ज्या उज्ज्वल भविष्याचं त्यानं स्वप्न पाहील होतं ते तिनं धुळीला मिळवलं होतं आणि तिच्या स्वभावात झालेला प्रचंड बदल त्या मुलाला मानवणारा नव्हता. आता तो मुलगा ‘मुलगा’ राहीला नव्हता. सत्तावीस वर्षाचा तरूण झाला होता. नऊ-दहा वर्षात बरचं काही बदललं होतं. तो मुलगा ज्या कारखान्यात काम करत होतात्या कारखान्यात तो एकटाच काम करत होता. त्याच्या घराचं अर्थात झोपडीचं रूपांतर एका टुमदार घरात झालं होतं. ज्या घरात आता रेडिओपासून कॉम्प्युटरपर्यंत सर्व वस्तू होत्या. त्याच्या भावंडांच शिक्षण पूर्ण होऊन ते नोकरीला लागले होते . एकुलत्या एक बहीणीचं लग्न होऊन ती सासरी गेलीय. त्याच्या घरातील कपाट कपडयांनी खचून भरलेयत. आईच्या अंगावर सोन्याचे दागिने पुन्हा डोलू लागलेत. शेणातील किडे शेणातच रहात नसतात. हे वाक्य त्या मुलाच्या बाबतीत खरं ठरलंय.
पण त्या मुलाला मात्र आजही ती पूर्वीची कुडाची झोपडी आठवते, जी जी त्याच्या बापाने तात्पुरती निवाऱ्याची सोय म्हणून विकत घेतली होती आणि त्यापुढे ती कायमस्वरूपी निवाऱ्याची सोय झाली होती. त्याला झोपडीच्या आजूबाजूला असणारी केळीची आणि फुलांची झाडं, झोपडीवर सोडलेल्या शिराली, घोसाळी आणि भोपळयाच्या वेली , शेणाने सारवलेली जमीन आणि त्या जमिनीवर त्यानं काढलेली रांगोळी, पावसात छपरातून टपटप गळणारं पाणी आणि त्यामुळे होणारी झोपमोड, रात्री चिमनीच्या प्रकाशात केलेला अभ्यास, मध्येच घरात घुसणारे साप, सरडा, चोपई आणि विंचवासारखे प्राणि, चमचम करणारे काजवे आणि डराव डराव करणारे बेडूक, जवळच असणा-या ओढयावरून पकडून आणलेले खेकडे, जवळच असणा-या जंगलातून तोडून आणलेली करवंदं खाताना पाहून आईने दिलेले रपाटे आणि जवळच असणा-या ओढयावर जाऊन केलेला अभ्यास, सारं सारं तसंच्यातसं आठवतं. पण, आता हे सारं सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही स्वप्नवत वाटतं. कारण आता ओढा आहे पण दिसत नाही. जंगलाच तर नामोनिशाण राहीलं नाही. साप-सरडे तर सोडा आता माशी दिसनही मुष्कील झालयं. आता फक्त त्या मुलाचं घर आणि आजुबाजूची परीस्थितीच बदलली नाही तर ! माणसंही बदललीत आणि सारं कसं आता यंत्रवत झालंय.
आता तो मुलगा – अर्थात मी – विजय जाधव एक नवोदित लेखक म्हणून उदयाला आलोय. समाजात एक घमेंडी, अकडू, आणि पाषाण हृदयी तरूण म्हणून वावरतोय. आज लोक माझ्याकडे काम घेऊन यायला धजावतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला शोभतही नाही. माझ्या हृदयात अखंड वाहणारा प्रेमाचा झरा आता आटलाय कारण माझ्याकडून भरभरून प्रेम घेणारे त्या झ-यात प्रेम ओतायला विसरलेत. कारण कोणतीही तरूणी आता माझ्या हृदयाला स्पर्श करत नाही ती फक्त एक पात्र म्हणून माझ्या कथेत वावरते. माझे आदर्शही आता आदर्श राहिले नाहीत. त्यांनीही स्वतःच्या हातानं स्वतःच्या तोंडाला डांबर फासून घेतले आहे. ज्यांच्यावर मी पूर्वी प्रेम करत होतो ते प्रेम करण्याच्या लायकीचे नव्हते याचीही मला जाणिव झालीय. पूर्वी माझ्यावर डोळे वटारणारे आता माझ्यासमोर नम्रपणे वागतात.कोणीतरी म्हटलंच आहे ना ‘‘झुकती है दुनीया झुकानेवाला चाहिये । ’’ आता मी कुणालाच अभ्यासात मदत करत नाही कारण माझ्या शब्दांची किंमत वाढलीय. आता मी माझे विचार कोणावरही लादत नाही. लोक ते लादवून घेण्यास तयार नसतात. कारण आता तो मुलगा मुलगा राहीला नाही. त्या मुलाचा गरीब बाप गरीब राहीला नाही. त्याचे शेजारी- पाजारीही आता श्रीमंत झाले आहेत. सर्वांच्याच डोळयावर आता पैशाची झापड आलीय, माझ्या डोळयावरही आलीय पण निदान ती दूर करण्याचा तरी मी स्वतःपुरता प्रयत्न करतोय आणि त्यात मला यशही येतंय. नाहीतर खिशातले पैसे खर्च करून इतरांसाठी लिहणं माझ्या लेखणीला परवडलंच नसतं.
— निलेश दत्ताराम बामणे
202, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए , गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
मो. 8692923310 / 8169282058
Leave a Reply