मी पाचवीत गेल्यानंतरच हिंदी चित्रपट पाहू लागलो. ‘कटी पतंग’ चित्रपट तेव्हा वसंत टाॅकीजला लागलेला होता. मी एकटाच चित्रपट पहायला गेलो. तो पहाण्याआधीच मित्रांकडून थोडीफार कथा ऐकली होती. गाणी ऐकून माहीत झालेली होती. ऐकलेल्या कथेशी संदर्भ जुळवत मी चित्रपट पाहिला. आता हे गाणं झालं, आता हे व्हायचं राहिलंय असा विचार करत करत, चित्रपट पाहून मी बाहेर पडलो. माझं वय, तो चित्रपट कळण्यासारखं नव्हतं तरीदेखील मला चित्रपटाची कथा आवडली आणि त्या चित्रपटाच्या कथालेखकाचं नाव डोक्यात पक्कं बसलं.’गुलशन नंदा’!
त्यानंतर त्यांच्याच कथां-कादंबऱ्यावरील ‘अजनबी’, ‘नीलकमल’, ‘दाग’, ‘काजल’, ‘शर्मिली’, ‘नया जमाना’, ‘झील के उसपार’ हे चित्रपट पाहिले आणि या ‘सिनेमॅटिक’ लेखकाचा मी जबरदस्त फॅन झालो.त्यांच्या अनेक कादंबऱ्या मी वाचल्या. त्या वाचताना माझ्या नजरेसमोर जणू एखादा चित्रपटच चालू आहे, असा भास होत असे. हे यश होतं, त्यांच्या अप्रतिम लेखन शैलीचं!!!
गुलशन नंदा यांचा जन्म १९२९ साली आता पाकिस्तानात असलेल्या एका खेड्यात झाला. त्यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. लेखन करण्यासाठी शांतता असलेली स्मशानभूमीच त्यांना अधिक पसंत असे. सुरुवातीला त्यांनी उर्दू भाषेतून लेखन केले. फाळणीनंतर ते दिल्लीला आले. रोजीरोटीसाठी ऑप्टिशियनचे दुकान सुरु करुन त्यांनी लेखन चालू ठेवले.
दिल्लीमधील ‘अशोक पाॅकेट बुक्स’ने त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित केल्या. गुलशन नंदा सातत्याने लिहित राहिले व त्यांच्या कादंबऱ्या पुस्तकांच्या दुकानातून, बस स्टॅण्डवरील, रेल्वे प्लॅटफॉर्मवरील शोकेसमधून वाचकांना आकर्षित करु लागल्या. त्यावेळी प्रवासात वाचण्यासाठी प्रवासी आवर्जून या कादंबऱ्या विकत घेत असत. त्यांच्या किंमती देखील सर्व सामान्यांना परवडणाऱ्या असत. सत्तर व ऐंशीच्या दशकात त्यांच्या अनेक कादंबऱ्या लाखोंच्या संख्येने विकल्या गेल्या.
सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक गुरूदत्त यांनी गुलशन नंदा यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यांना गुलशन नंदा यांच्याकडून ‘पत्थर के होंठ’ या कादंबरीचे चित्रपट करण्यासाठी हक्क विकत घ्यायचे होते. मात्र त्या कादंबरीचे हक्क काही महिन्यांपूर्वीच एल. व्ही. प्रसाद यांना गुलशन नंदा यांनी दिलेले असल्यामुळे गुरूदत्त यांची घोर निराशा झाली. याच कादंबरीवरुन एल. व्ही. प्रसाद यांनी ‘खिलौना’ हा सुपरहिट चित्रपट तयार केला.
अमेरिकन लेखक विल्यम आयरिश यांच्या ‘मॅरिड ए डेड मॅन’ या कादंबरीवर आधारित ‘कटी पतंग’ची कथा होती. या चित्रपटातील माधवी व शेखर या पात्रांतून प्रेम, नाट्य, रहस्य, कौटुंबिक संबंधांचे प्रसंग घेऊन गुलशन नंदा यांनी कथा उत्तमरित्या फुलवली होती.
शक्ती सामंत यांनी गुलशन नंदा यांच्या ‘अजनबी’ कादंबरी मधील शेवट बदलून राजेश खन्ना व झीनत अमानचा हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर सुपरहिट केला. मूळ कादंबरीमध्ये नायक आपल्याकडे आलेल्या पाहुणीचा खून करण्याच्या विचाराने तिच्या जागी झोपलेल्या स्वतःच्या पत्नीचाच खून करतो असे लिहिले होते, चित्रपटात शेवट गोड केला आहे.
‘मैली चांदनी’ या कादंबरीवरुन यश चोप्रा यांनी ‘दाग’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट तयार केला. राजेश खन्ना, शर्मिला टागोर व राखी या त्या काळातील आघाडीच्या कलाकारांनी भावनिक नातेसंबंधांवरील या कथेला उत्कृष्ट न्याय दिला.
दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या बहिणींच्या कथेवर आधारित असलेला ‘शर्मिली’ चित्रपट राखी व शशी कपूरने बहारदार केला.
पुनर्जन्मावर आधारित असलेले ‘नीलकमल’ व ‘मेहबूबा’ हे चित्रपट गुलशन नंदा यांच्या सर्वोत्तम लेखनाचे मानदंड आहेत.
राजकुमार व मीना कुमारी यांचा ‘काजल’ हा भावना प्रधान चित्रपट सत्तरच्या दशकातील माईलस्टोन मानला जातो.
१९७१ साली गुलशन नंदा यांची ‘झील के उसपार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांच्या आजपर्यंतच्या लोकप्रियतेचे रेकाॅर्ड तोडले.. तिच्या तब्बल पाच लाख प्रतींचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा खप झाला!
याच कादंबरीच्याच नावाचा धर्मेंद्र व मुमताज यांचा चित्रपट खूपच गाजला. त्यातील नायिका ही अंध असते. डाॅक्टरची भूमिका करणारा शत्रुघ्न सिन्हा हा तिच्या डोळ्यांचे ऑपरेशन करतो व तिला दृष्टी येते.
१९६४ साली सुरु केलेल्या गुलशन नंदा यांच्या चित्रपट लेखनाची शाई १९८५ पर्यंत पुरली. या एकवीस वर्षात गुलशन नंदा यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट लेखनासाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ते चित्रपट होते. काजल, नीलकमल, खिलौना, कटी पतंग, नया जमाना आणि मेहबूबा.
या सरस्वती पुत्राचा शेवटचा चित्रपट होता ‘नजराना’. छपन्न वर्षांच्या जीवनप्रवासात त्यांनी अप्रतिम लेखन केलं. त्या कादंबऱ्या अविस्मरणीय अशाच आहेत. त्यांचे चित्रपट देखील रसिक कदापिही विसरणार नाहीत. २६ नोव्हेंबर १९८५ साली गुलशन नंदा आपल्यातून निघून गेले.
आताही कधी मी बसस्टँडवर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर जेव्हा जातो, तेव्हा माझी नजर बुकस्टाॅलवर गुलशन नंदाचे एखादं तरी पाॅकेट बुक दिसतंय का? हे शोधू लागते. परंतु माझी निराशा होते. कारण आता शोकेसमधून पाॅकेटबुक्स हद्दपार झालेली आहेत, हे मी विसरुनच गेलेलो असतो.
गुलशन नंदा यांना जाऊनही आता ३६ वर्षे झालेली आहेत. त्यांच्या राहुल आणि हिमांशु या दोन्ही मुलांनी हिंदी चित्रपटांच्या जाहिरातींच्या व्यवसायात नाव कमावलेले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी २०११ साली आलेल्या ‘पतियाला हाऊस’ ची कथाकल्पना अक्षय कुमारला दिली होती.
शेवटी आपल्याला कोणताही चित्रपट भावतो, तो त्याच्या कथेमुळेच! आम्ही भाग्यवान, कारण आमच्या पिढीतील अनेक आवडत्या चित्रपटांचे लेखक होते.
रूपया बंदा, गुलशन नंदा!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
९-४-२१.
Leave a Reply