नवीन लेखन...

लेकीच्या अल्प मुक्कामाचा आनंद

पाच दिवस माहेरपणाला राहून, आजच आमची लेक सासरी रवाना झाली, आणि लेकीच्या वास्तव्याने गजबजलेलं आमचं घर शांत झालं. तसे आम्ही घरात तिघं असतो. आणि उभयतां पती पत्नी, आणि आमचा लेक. पण तो असतो पाऊण दिवस त्याच्य कामात आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये अथवा वाचनात, ही स्वयंपाक, इतर कामं निपटून, तिच्या असंख्य मैत्रिणींच्या व्हॉट्सॲप समूहात आणि मी माझ्या लेखन वाचनात. आपापल्या कक्षेतून बाहेर येऊन थोड्याफार गप्पा होतात. या महिनाअखेराला आमची लेक आणि जावई ऑफिस प्रोजेक्ट साठी परदेशी निघाल्याची बातमी कळताच, माहेरपणाला “येते येते” ! असं फक्त तोंडाने म्हणत, प्रत्यक्षात या बाबतीत कृती शून्य असणाऱ्या लेकीला, तिच्या भावानेच,
“चार दिवस यायचंच राहायला” असं ठणकावून सांगितलं, आणि finally ती येणार हे पक्क झालं. तसंही परदेशी जाणं, व्हिडिओ कॉल वर बोलणं, बराच काळ भेट नं होणं या गोष्टी आज विशेष सांगण्यासारख्या, त्याचं वाईट वाटून घेण्यासारख्या राहिलेल्या नाहीत म्हणा, पण का कोण जाणे, आम्हाला मात्र अजूनही प्रॅक्टिकल होणं जमत नाही हेच खरं.
लग्न होऊन सासरी गेलेली लाडकी लेक, माहेराला येणं हा आनंद काय असतो, हे तिचं लग्न झाल्याशिवाय नाही कळू शकत. ध्यानीमनी नसताना, मनाची तयारी झालेली नसताना, अचानक ती सहचराचा हात पकडून सासुरवाशीण होते आणि…….असो,

त्यातून आमच्या लेकाचं, त्याच्या ताईवर नुसतं प्रेमच नाही, तर आदर, जिव्हाळा, माया, ममता, कौतुक हे सगळं नुसतं आहे असं नाही तर भरभरून आहे. त्यामुळे ती राहायला येतेय हा आनंद आमच्यापेक्षाही त्याला वेडं करणारा. आल्या दिवसापासून ते आज ती जाईपर्यंत, आपलं काम लवकर आटोपून तो, फक्त तिच्या जवळ बसून होता. तिच्याकडे टक लावून पहात, फक्त तिचा सहवास ! याचाच मनसोक्त आनंद घेत होता. ताई सोबत असताना, पंचविशी पार केलेला आमचा लेक अगदी लहान होऊन जातो. काय गंमत असते पहा, आम्ही तिघंही आपापल्या कक्षेतून बाहेर येऊन फक्त तिच्या सहवासाचा, तिच्याशी संवाद साधण्याचा, तिच्यासोबत धमाल मज्जा करण्याचा आनंद मनमुराद घेत होतो. ही तर तिला, काय काय करून खाऊ घालू याच विचारात आणि ते करून खीलवण्यात मग्न होती. हिच्या मनात असलेली पदार्थांची यादी आणि लेकीच्या मुक्कामाचे दिवस यांचा मेळ जुळत नव्हता , कारण पदार्थांची यादी फारच मोठी होती. मुलगी माहेराला येण्याचा हा आनंद मात्र आपल्या सहधर्मचारीणीच्या बाबतीत, आपण नाही विचारात घेत. ती सुध्दा कुणाची लेकच असते की.

तर सांगत काय होतो, आमची लेक चार दिवसांनी परतणार होती सासरी, पण माझ्या लेकाने अगदी हट्टाने तिला अजून एक दिवस राहायला भाग पाडलच, आणि इतकंच नव्हे, तर ती राहायला कबूल झाल्यावर,आनंदाश्रू भरून आले त्याच्या डोळ्यांत.

आजच सायंकाळी ती सासरी गेली, आणि आम्ही पुन्हा एकदा, आपापल्या कक्षेमध्ये रुजू झालो. घराला घरपण देणाऱ्या, आपल्या असण्यातून, वावरण्यातून, जीव लावण्यातून या लेकी आम्हा आईबापांचं आयुष्य काही वर्षानी तरी वाढवून जातात.

रोज सकाळी उठल्यावर, अजून तीन दिवस, अजून दोन दिवस, अजून….. एकच…… दिवस असे मोजत होतो. अहो, हे चार पाच दिवस सकाळच्या ब्रेकफास्ट पासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्ट लेकीच्या सोबतच होत होती.
आज मात्र दुपारपासून घशात आवंढा येऊ लागला. मनाची होणारी चलबिचल फार त्रासदायक वाटत होती. आम्ही दोघं तिला खाली निरोप द्यायला गेलो, बंधुराज मात्र उतरले नाहीत.

तोंड भरून हसत लेकीला निरोप दिला आणि एकमेकांची नजर चुकवत घरी परतलो. तसंही पुढची दोन वर्ष तिला व्हिडिओ कॉल वरंच भेटण्यात आनंद मानायचाय म्हणा.

– प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..