नवीन लेखन...

चित्रपटांवर बोलू काही

खादा चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षकवर्गांच्या मनामध्ये एकच काहूर माजलेला असतो ते म्हणजे बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली.

चित्रपट दुनियेचे निर्माते डॉ. दादासाहेब फाळके म्हणजे धुंडिराज गोविंद फाळके यांच्या योगदानामुळे हे आज शक्य झाले आहे. त्यांनी ३ मे १९१३ रोजी ‘राजा हरीश्चंद्र’या चित्रपटाची निर्मिती करून मराठी आणि भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिला सिनेमा बनवला. नवनवीन गोष्ट पाहण्यामध्ये आणि ती शिकण्याची तीव्र इच्छा मनामध्ये बाळगणारे दादासाहेब यांनी ‘द लाईफ ऑफ ख्रिस्त’ हा पहिला मुकपट पाहिला आणि ‘राजा हरिश्चंद्र’साठी त्यांना प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून जन्मलेला ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपट अवघे २३ दिवस(त्या काळात) मुंबईच्या ‘कोरोनेशन’ चित्रपटगृहात चालला.

त्यानंतर एका पाठोमाग एक असे अनेक चांगले चित्रपट दादासाहेबांनी सिनेसृष्टीला दिले आणि यातूनच ‘सावित्री-सत्यवान’, ‘लंका दहन’, ‘श्रीकृष्ण जन्म’, ‘सेतू बंधन’ सारखे भारतीय पुराण-कथांवर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली.

नंतर पुढील काळात मानव केंद्रित सिनेमांची निर्मिती होत गेली. जस जसे प्रेक्षकांची आवड बदलत गेली तसे चित्रपट निर्मितीची प्रक्रिया आणि त्याचे सादरीकरण बदलत गेले. सिनेमे प्रेक्षक केंद्रित असल्यामुळे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना प्रेक्षकांच्या आवडीनुसार सिनेमे बनवावे लागतात.

जेव्हा आपण महाराष्ट्र चित्रपट सृष्टीचा विचार करतो तेव्हा इथे हिंदी, मराठी, तेलगू आणि कानडी सिनेमे खास करून  प्रदर्शित होतात आणि याच सिनेमांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. अलीकडे एकच चित्रपट एकाच वेळेस वेग-वेगळे भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचे ‘ट्रेंड’ खूपच वाढलेले आहे. खर सांगायचं झालं तर या नवीन ‘ट्रेंड’च्या नव्या प्रयोगाला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले असेल तर ते एस.एस. राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या तेलगू चित्रपटापासूनच. हे चित्रपट देशाच्या कानाकोपऱ्यात यशस्वीरीत्या चालले आणि देशातील सर्वाधिक गल्ला करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये अग्रस्थान पटकावले.

एकीकडे हिंदी सिनेमे त्यांचे वैभव हरवून बसत असताना तेलगू आणि कानडी चित्रपट सृष्टी प्रेक्षकांच्या मनावर अधिक जोमाने राज्य गाजवीत आहेत. अश्लीलतेने ग्रासलेले आणि मूळ कथेपासून भरकटत जाणारे हिंदी सिनेमे आजकाल सिनेगृहात जास्त दिवस टिकेनासे झाले आहेत. याउलट कानडी, तेलगू आणि मराठी चित्रपटे ‘बॉक्स ऑफिस’वर करोडोंची कमाई करत आपले रुबाब दाखवीत आहेत. खास करून बोलायच झालं तर तेलगू चित्रपटांचे वेगळेच वैशिष्ट्ये आहेत. जवळपास सगळे तेलगू चित्रपट सारखेच असले तरी प्रत्येक सिनेमाची अदाकारी ‘युनिक’ असते.

१९३३ साली ‘इस्ट इंडिया फिल्म कंपनी’ निर्मित, ‘तेलगू थिएटर मूव्हमेंट’चे जनक म्हणून ओळखले जाणारे श्री चित्तजल्लू पुलैय्या दिग्दर्शित ‘सावित्री’ नावाच्या पहिल्या तेलगू चित्रपटाची निर्मिती झाली. त्यावेळेस १० लाख रुपयांचा बजेट खर्च करुन बनवलेल्या ह्या चित्रपटाला ‘दुसरे व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’चे अवॉर्ड प्राप्त झाले होते. पुढील काळात टॉलिवूडने एकापेक्षा एक असे मनोरंजनात्मक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले. त्यामध्ये पाताळ भैरवी (१९५१), देवदासु (१९५३), मायाबाझार (१९५७), सागर संगमम (१९८३)पासून आजच्या काळात प्रदर्शित झालेले बाहुबली, गीता-गोविंदम, नेनु लोकल असे सुपरहिट सिनेमे पाहावयास मिळतात. तेलगू चित्रपट म्हणजे ‘छोटा पॅक, बढा धमाका’ प्रमाणे असतात. यामध्ये कौटुंबिक जीवन, लव्ह स्टोरी, कॉमेडी आणि फायटिंग (यासाठी तर तेलगू सिनेसृष्टी जनप्रिय आहे) या सगळ्या गोष्टींचा संगम असतो. प्रामुख्याने तेलगू आणि कानडी सिनेमे सहकुटुंब पाहण्यासारखे असतात. कारण त्यांमध्ये नात्यांमधील ओलावा सहजतेने मांडलेला असतो. तसेच खेडेगाव आणि त्याच्याशी निगडित असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत महात्मा गांधीजींनी दिलेल्या ‘खेडेगावाकडे चला’ हा संदेश प्रेक्षकांमध्ये रुजविण्याचे प्रयत्न हे चित्रपट करत असतात.

तेलगू ‘हॉरर’ चित्रपटसुद्धा एकदम हटके असतात. ते प्रेक्षकांच्या मानामध्ये भीती तर निर्माण करतातच आणि पोटधरून हसायलाही लावतात. याचे उत्तम उदाहरणे म्हणजे ‘राजू गारी गाधी’, ‘नायकी’, ‘प्रेम कथा चित्रम’, ‘गीतांजली’ इत्यादी सिनेमे.

सोलापुरातील प्रामुख्याने पूर्व विभागात राहणाऱ्या आणि आठवडाभर राबून थकलेल्या तेलगू भाषिक माणसासाठी हे तेलगू चित्रपट ‘मनोरंजनाचे संजीवनी’ ठरतात.

सध्याच्या तेलगू सिनेमात लव्ह स्टोरी जास्त दिसून येतात आणि अलीकडची पिढी हे पाहून बिघडत. पण हे दाखवीत असताना नकळतपणे एक चांगला संदेश देऊन जातात. कारण या चित्रपटांमध्ये प्रेमात पडणाऱ्या नायकाला चित्रपट एक टप्प्याला पोहचल्यावर त्याच्या प्रेयसीला मिळविण्यासाठी ‘पेहले नोकरी, फिर छोकरी’ या म्हणीप्रमाणे स्वतःला सिद्ध करून दाखवावेच लागते. पण प्रेक्षकवर्गाला मात्र फक्त नायक आणि नायिका प्रेमात पडतात आणि शेवटी ते एक होतात इतुकेच लक्षात राहते. परंतु या प्रवासात नायकाला करावा लागणाऱ्या संघर्षाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. हे सिनेमे कौटुंबिक जीवनाचे (एकत्रित कुटुंब) सादरीकरण सुद्धा तितकेच उत्कटतेने करीत भारतीय संस्कृती जपण्याचा संदेश देतात. तेलगू आणि कानडी चित्रपटांतील शिस्तबद्ध मांडणीमुळे प्रेक्षकाचे मनोरंजन तर होतेच आणि त्याला मेंटल स्ट्रेस मधून ‘रिलीफ’सुद्धा मिळते. खूप ठिकाणी अतिशयोक्ती आढळून येते. तेही अत्यंत गरजेचे आहे कारण जसे कवितेमध्ये अलंकारिक शब्दांचा वापर करून कवी त्याच्या वाचकांचे लक्ष वेधून घेतो त्याप्रमाणेच या सिनेमांमधील अतिशयोक्तीने मांडलेले प्रसंग प्रेक्षकाला स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचे प्रयत्न करतात. टॉलिवूड आणि सॅण्डलवूड चित्रपट पाहताना प्रामुख्याने भाषेचा अडथळा क्वचितच येतो. एखाद्याला तेलुगू किंवा कानडी भाषा येत नसली तरीही त्या चित्रपटांचे आस्वाद तो प्रेक्षक बेशक घेऊ शकतो.

जसे प्रत्येक नाण्याचे दोन बाजू असतात त्याप्रमाणे बॉलिवूडचेही चांगली बाजू आहे. ते म्हणजे बायोपिक्स. व्यक्तीचारित्रात्मक हिंदी सिनेमांनी प्रेक्षकांवर भुरळ घातलेली आहे. यामध्ये ‘भाग मिल्खा भाग’, ‘पान सिंग तोमर’, ‘गुरु’, ‘मैरी कॉम’, ‘एम.एस.धोनी’, ‘दंगल’, असे सिनेमे आहेतच. हिंदी चित्रपटातील विदूषकाचे पात्र लक्षात घेतले तर जॉनी लिव्हर नंतर म्हणावं तितुका सक्षम विदूषक हिंदी सिनेसृस्टीला लाभलेला नाही. पण तेलगूमध्ये मात्र सगळेच विदूषक अगदी पोट धरून हसायला भाग पडतातच.

अर्थहीन संहिता, चुकीची मांडणी पद्धत अशा गोष्टींमुळे काही चित्रपट एक आठवडा सुद्धा सिनेगृहात चालत नाहीत. भारतीय संस्कृती, परंपरा, भाषा आणि कलेचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट मूळ तत्वांना विसरून विनाशाकडे वाटचाल करीत आहेत.चित्रपट पाहताना काय घ्यावे आणि काय नाही याबद्दल सजग राहणे आमची आणि तुमची जबाबदारी आहे.

— कमलाकर रुगे

Avatar
About कमलाकर रुगे 6 Articles
मी सध्या इंग्रजी प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. आतापर्यंत माझे लेख दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेले आहेत. मी ब्लॉग वर माझे लेख प्रकाशित करीत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..