नवीन लेखन...

आयुष्य ज्यांना फितूर आहे…

एक काळ होता,  ‘अवघे वय पाऊणशे’ याचा अर्थ व्यवहारात त्या व्यक्तीचा काहीच उपयोग नाही असं समजलं जायचं.  त्यात पुन्हा नाटककार देवल यांनी शारदा नाटकात ‘अवघे पाऊणशे वयमान हे गाणं लिहिलं आणि ते लोकप्रिय ठरलं. त्यामुळे वय झालेल्याची थट्टा अजरामर झाली. त्यात सरकारी नियमाने कर्मचारी 58 व्या वर्षी निवृत्त होतो त्यामुळे निवृत्त म्हणजे फक्त त्याच्या सरकारी कामकाजातून निवृत्त झाला, याऐवजी एकूणच व्यवहारातून बाद झाला हा समज घट्ट होऊन बसला.  त्यालाच जोड मिळाली ज्येष्ठ या शब्दामुळे. ज्येष्ठ हा खरं  तर आदरार्थी भावना व्यक्त करण्याचा शब्द व विशेषण.  परंतु तो चुकीचा रूढ झाला आणि ज्येष्ठ म्हणजे म्हातारा असं रूढ झालं. ज्येष्ठपर्व म्हणजे म्हातारपणाचा काळ असं मानलं जाऊ लागलं. शब्दाचे अर्थही कसे बदलले जातात त्याचंच हे उदाहरण.  पण काळ बदलला आहे त्याप्रमाणे आकलनही बदलायला हवं कसं ते पहा!

उदाहरण सांगतो. अमिताभ बच्चनचं ताजं आणि ठसठशीत उदाहरण पहा. अमिताभला ‘ज्येष्ठ’ हे विशेषण कधी लागलेलं तुम्ही वाचलं, ऐकलं आहे का? उलट 11 ऑक्टोबर 2022 रोजी वयाची 80 वर्षे पूर्ण झाली तरी सुरुवातीच्या काळात त्याला जे विशेषण ‘अँग्री यंग मॅन’ मिळालं, ते आजही त्याला लागू पडावं इतक्या उत्साहाने वावरत असतो आणि इतरांनाही तशा प्रकारची ऊर्जा देण्याचा प्रयत्न असतो. त्यावेळी अमिताभचं  वय 80 आहे हे आपल्या मनात तरी येतं का? अशावेळी वय हा एक निव्वळ आकडा असतो.

अमिताभच्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात अनेक ‘पडाव’ पार करून काहीजण करोडपती होतात, तसे रिक्त हस्ताने जाणारे आहेतच की.  पण त्या सगळ्यांशी अमिताभ ज्या पद्धतीने बोलतो, वागतो आणि उमेद देतो. हे सगळं पाहिलं की लक्षात येतं ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात ‘केबीसी’ खेळातून कोणीच रिक्त हस्ताने जात नाही. हीच भावना प्रेक्षकांची देखील असते हे विशेष आहे. त्यामुळेच अमिताभ बच्चन एक चित्रपट कलावंत म्हणून मोठा आहेच. पण हा जणू त्याचा एकपात्री प्रयोग आहे, जो कोणालाच विसरता येणार नाही. त्याला ‘वन मॅन इंडस्ट्री’ म्हटलं गेलं ते उगाच नाही.  बदलत्या काळाबरोबर अमिताभ कायम स्वतःला बदलत गेला, पण आपलं ‘जंटलमन’पण मात्र कायम ठेवलं. इंटरनेट व तत्सम नव्या युगाच्या तंत्रज्ञानाशी त्यांनी उत्तम जुळवून घेतलं. ‘आपल्याला ते इंटरनेट फिंटरनेट कळत नाही’ ही भाषा त्याच्या तोंडातून कधीच आली नाही आणि येणार नाही एवढा सार्थ विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे.

आयुष्यात कडेलोट व्हावा अशा परिस्थितीला तो सामोरा केला आणि यशाचे उत्तुंग शिखर पण पाहिलं. पण दोन्ही वेळा अमिताभ कोसळून पडला असं कधी झालं नाही. ज्यांचा आदर्श त्याने कायम समोर ठेवला ते त्याचे वडील हरिवंशराय बच्चन. त्यांनी कधी काळी लिहिलं होतं –

तू ना थकेगा कभी,
तू ना रुकेगा कभी,
तू ना मुड़ेगा कभी,
कर शपथ कर, कर शपथ, कर शपथ

हाच अमृतानुभव त्यांनी कायम डोळ्यासमोर ठेवला.

असं असून सुद्धा त्याचे विवेकीपण कायम जागं असतं. त्याने म्हटले आहे, चित्रपट आणि दूरचित्रवाणी ही दोन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत. ‘सिनेमात मी जे नाही तेच मी इथे दाखवत आलो आहे. ‘केबीसी’मध्ये मी जो आहे तोच दिसतो. हा फरक आहे. मी जसा बोलतो, व्यवहार करतो तसाच येथे दिसतो. यातून दोन-तीन गोष्टी साध्य झाल्या. लोकांना मी नक्की कसा आहे हे समजू शकले. अन्यथा लोकांना पडद्यावर मी असा आहे तसाच वैयक्तिक आयुष्यात देखील आहे असे वाटत असतं. अमिताभ वय वर्ष 80 असून देखील तुम्हाला आम्हाला आपला वाटतो ना! ज्येष्ठ शब्द खऱ्या अर्थाने सार्थ करणारा. ज्येष्ठ म्हणजे आदर्श वाटावा असा हा महानायक.

लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांनी चित्रपट मीमांसा केली आहे. ते म्हणतात, ‘मला हिंदी सिनेमा आवडतो. कुठलाही.  का? तर ऐका.

‘ते सजलेले महाल, प्रचंड दिवाणखाने, फर्निचर, पडद्याची कापडं, नायक-नायिकांचे ड्रेसेस त्यांचं सौंदर्य हे सगळं पाहताना काय यातना होतात? एखाद्या हिरोला गोडेतेल मिळत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसलेला पाहिलात का? आज तेल नाही, डालडा नाही, साखर नाही याची हिरोईनला काही चिंता लागली? असं सगळं वर्णन करून व.पु. पुढे म्हणतात, ‘म्हणूनच मला सर्व चित्रपट आवडतात. नायिका तर आवडतेच आवडते.

हे कोडं ते पुढे सोडवताना सांगतात, ‘डोक्याला अमृतांजन न चोपडणारी एखादी बाई दिसावी अशी माझी इच्छा त्यामुळे पुरी होते. अरेबियन नाईट वगैरे जेवढे खोटं तेवढेच हे चित्रपटही. आपण आपलं बालमन सांभाळावं. भाबडेपणा जतन करावा आणि सिनेमाला जाऊन तीन तास सगळं विसरायला होतं मित्रांनो.  दुःख टंचाईमुळे निर्माण होत नाही, चिकित्सक वृत्ती पायी निर्माण होते’ असे म्हणणारे व. पु. हे कधीतरी कुरकुरे, म्हातारे होणे शक्य होतं का? शेवटपर्यंत उमेदीने जगणारा आणि उमेद देणारा हा लेखक. भले आज आपल्यात नाहीत. पण वाचताना असं कधीतरी मनात येईल का?

पण असाच एक ज्येष्ठ माणूस आहे, ज्याने आज केवळ भारताचे नव्हे तर साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.  ते नाव सांगायला हवे?

एकमेव नरेंद्र मोदी.

आज हा माणूस दिवस नाही, रात्र नाही ज्या तडफेने  काम करतो आहे हे पाहून थक्क व्हायला होतं. आजही वय वर्षे 72.  हा माणूस 18 तास अथकपणे काम करतो.  एका देशाचा पंतप्रधान काम करतो हे अविश्वसनीय वाटावं  इतकं खरं आहे. लहानपणी चहा विकणारे, गरीब घरात जन्मलेले, ज्यांच्या घराण्यात यापूर्वी कोणी राजकारणात नव्हतं,  याची ओळख फारशी नव्हती अशा माणसाने चमत्कार वाटावा असा चढत्या श्रेणीने प्रवास केला आहे.

वयाची आडकाठी न येणारा हा माणूस काय करू शकतो हे आता आपण पाहतोच आहोत.  पण खरी घोडदौड पुढेच आहे.  निरंतर लक्ष ठेवावे असा हा माणूस.  त्याला तरुण, ज्येष्ठ अशी  लेबल लावता येतील?  आकलन बदलावं लागेल असं मी म्हणतो ते याच अर्थाने.  तर असो.  एक युग निर्माण करणारी ही व्यक्ती आहे हे मात्र खरे.

काव्यवाचन म्हटलं की हमखास आठवण होणार  ती तीन कवींची. वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर. कुठलाही मुहूर्त न पाहता हे तीन भिन्न प्रकृतीचे कवी एकत्र आले. आणि साऱ्या महाराष्ट्राला त्यांच्या कवितांनी वेड लावलं. त्यात बापटांचा उत्साह काय वर्णावा. खुद्द मंगेश पाडगावकरांनी त्यांचे एकदा वर्णन केलं आहे, विंदा करंदीकर यांचा मला फोन आला की, ‘बापट सध्या कुठे आहे?’ ‘मला निश्चित ठाऊक नाही असं,’ मी म्हटले तर, करंदीकर मला म्हणतात,  ‘अरे मी तुला सांगतो वसंता कुठे असेल ते.  नुकताच त्याने बुद्रुक खेमटे गावात एक काव्यवाचनाचा कार्यक्रम घेतला आणि तिथून एसटी पकडून तो ढेंबरे या गावात काव्यवाचन करायला गेला. मध्यरात्री तिथून निघून तो पहाटे पुण्यात येणार. कारण संध्याकाळी पिंपरीला तिथल्या कन्याशाळेत ‘लावणीचे लावण्य’ या विषयावर त्याचे व्याख्यान आहे.’ या तिघा कविवर्यांची कामगिरी सर्व विदितच आहे पण त्यांच्यात एक निर्मळ स्नेहभावना होती. त्याला तोड नाही. असं म्हणणं म्हणजे घासून घासून वापरलेला शब्द वापरायचा असं होईल.

त्यांची प्रीत दर्शवणारी एक घटना आणि प्रत्यंतर दाखवणारी गोष्ट सांगायला हवी.

मंगेश पाडगावकर अमेरिकेत गेले होते. मग विदांनी त्यांना पत्र लिहिलं.

प्रिय मंगू,

‘तू तिकडे गेल्यापासून काव्य वाचनाच्या कार्यक्रमांनी अक्षरशः हैदोस मांडला आहेस.  असे अजित, श्रीपु व वसंत या तिघांनीही सांगितले. एकूण डॉलर किती मिळाले असतील याचे तिघांनीही वेगवेगळे अंदाज केले आहेत.  वस्तुस्थिती त्या अंदाजाच्या बेरजेएवढी असणार असा माझा अंदाज!  असह्य पोटदुखीवर एखादे चांगले औषध असले तर माझ्यासाठी घेऊन ये.’

पत्रातील सुरुवातीचा हा कनवळा.  त्यावरून पुढच्या हालचालींचा रंग कसा असेल हे समजून यावे.  शेवटी ते लिहितात, ‘तू जानेवारीत परत येत आहेस हे वाचून आनंद वाटला.  वस्तूतः तू मुंबईत असलास तरीही दोन दोन महिन्यात प्रत्यक्ष भेटत नाहीस.  पण आता या वयात जवळची माणसे दूर गेली की विनाकारणच एकाकी व रीते वाटू लागते.  तू परत आलास की न भेटताही घर भरल्यासारखे होईल.’

एकूणच वसंत बापटांची जीवनासक्ती ही सर्व बाजूंनी भरभरून असल्यामुळे मंगेश पाडगावकरांनी म्हटलं, ‘कवितेचा हा वसंतोत्सव आता अमृत महोत्सवात प्रवेश करीत आहे. माझा मित्र अजूनही कविता लिहितो आहे. कविता गातो आहे. जगभर मनमुराद भटकतो आहे. प्रतिभेची वाणीची कृपा त्याच्यावर कायम आहे.  त्याने फार कष्ट करू नये.  प्रकृतीची काळजी घ्यावी म्हणून मी, आपले करंदीकर अधून मधून त्याला त्याच्या वयाची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो.  पण आमचा हा प्रयत्न व्यर्थ ठरतो.  चांगलाच खोकला झालेला असूनही हा गडी एसटी पकडून कुठेतरी बुद्रुक ढेंबरे येथे काव्यवाचनाच्या कार्यक्रमासाठी निघतो.  तो तरी काय करणार? कॅलेंडरच्या तारखांनी वय मोजणे त्याला ठाऊकच नाही आणि अनेकांना वाकवणारे हे आयुष्य त्याला फितूर आहे.’

हे आयुष्य…

शरदा मधली पहाट आली तरणीताठी
हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती

असे रूप घेऊन रोज त्याच्या भेटीला येते आणि तेही पहाटे!  सतत तरुण राहण्याखेरीज माझ्या या मित्राला गत्यंतरच उरत नाही.

सतत तरुण राहणं अशा वृत्तचित्ताच्या वसंत बापटांनी म्हणूनच लिहिले…

वसंत वा शरद तुला व ती क्षिती
नभात सूर्य वा असो निशापती
विदीर्ण वस्त्र ही विदीर्ण पावते
तरीही न पावते कधी विसावते
न लोचना तुवा कधी मिटायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे!

डॉ. राजा काळे यांनी एका कलंदर वृत्तीच्या भीमसेन जोशींबद्दल वर्णन करताना म्हटले आहे.

एका कलंदर कलाकाराचे व्यक्तिचित्रण कविवर्य राजा बढे यांनी फार चांगले केले आहे.

ते म्हणतात,

वेडात काय गोडी कोणा कशी कळावी
ती प्रेम मूढतेची सुटतील गुढ कोडी
सोडून नाव गावा शोधावया विसावा
तुडवीत कंटकाची ही वाट नागमोडी
लहरी फिरावे जणू घेत हेलकावे
जाणोनी लोटली मी या वादळात होडी

ही सचोटी भीमसेन यांच्या गाण्यात जशी होती तशीच गाडी चालवण्याबाबत.  गाणं असेल तेव्हा किंवा डोक्यात राग असला की भीमसेन निघालेच ड्रायव्हिंग करत. वाट कुठे फुटेल तिकडे. ते कोठे हे त्यांना देखील माहीत नसायचं. त्यामुळे इतरजण शोधत बसत कुठे कुठे…

तर त्यांच्या ड्रायव्हिंगबद्दल सुधीर गाडगीळ यांनी फर्स्ट हॅन्ड म्हणतात तसा अनुभव सांगताना म्हटलं आहे. ‘गाडी स्वतः चालवण्याचा शौक. सुपरफास्ट. नवी मर्सिडीज घेतली होती.  नगरात प्रयोग होता. मला म्हणाले, चला आमच्याबरोबर. स्वतः ड्रायव्हिंग करता करता म्हणाले, स्पीड किती आहे? कळतोय? 100 चा स्पीड आहे. मी लाईट बंद करतो म्हणजे स्पीडचा काटा दिसत नाही. भीती वाटत नाही.’ इतक्यात समोरून एक ट्रक आला तो अगदी सुता इतका अंतर ठेवून शेजारून सरकता क्षणी मी त्या मर्सिडीजमध्ये अंग चोरून शहारलो. ते पाहून पंडितजी म्हणाले, ‘घाबरू नका. आमचा याचा रियाज उत्तम आहे. (स्टेरिंग दाखवत). ट्रकला धडकणार नाही. गाडीला धक्का लागेल पण मांडीला टच होणार नाही. तरी ही गाडी नवी आहे. या गाडीचे तंबोरे अद्याप जुळायचेत. नाहीतर आणखी स्पीडने गेलो असतो.’ अशा भीमसेन यांच्या आजूबाजूला वय नावाची गोष्ट कशी फिरकेल?  शेवटपर्यंत त्यांचा हा स्वर तसा सुरेल लागला ते काय उगीच.

तर अशा ज्येष्ठांच्या आणि त्यांच्या पर्वाच्या कहाण्या. कथा सांगाव्या तेवढ्या कमीच.  पण  एक आठवण सांगितल्याखेरीज या लेखाची सांगता होऊ शकत नाही.

सेतू माधवराव पगडी. वय वर्षे 80 – 85 च्या वर. सदैव कार्यरत. पण कधी कधी कंटाळायचे. स्वतःचाच त्रागा करत म्हणायचे, ‘बस खूप झालं, आता शांत बसतो.’ पण मग त्यांनाच आठवायचं आणि ते म्हणायचे, ‘तिकडे गिरगावात भटवाडीत माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे ते अजूनही उमेद घेऊन खाली मान घालून कागदावर गांधी चरित्र लिहिण्याचा संकल्प सोडत आहेत. त्यांना कंटाळा नाही. मग मला कंटाळा येऊन कसे चालेल?’ गिरगावातले हे वयोवृद्ध ज्येष्ठ लेखक म्हणजे न. र. फाटक. तर माणसांनी उमेद ठेवायची असेल तर अशांची आठवण ठेवायला हवी. काय बिशाद आहे मग तुम्ही हरायची भाषा कराल.

हे लिहीत असतानाच आठवण आठवली.

पु. ल. देशपांडे यांनी भीमसेन यांच्या गाण्याचं वेगळेपण सांगताना म्हटलं, ‘जुनेपण टिकवून किराणा घराण्याच्या गायकीत नाविन्य आणलं.’ त्याला अनुसरून भीमसेन म्हणाले, ‘अर्थात प्रत्येक गायक हेच करतो.  माझ्या भाषेत म्हणायचं म्हणजे प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्यांच्यात कोणी लहान असतो. कोणी मोठा असतो. तशी चोरी केल्याशिवाय स्वतंत्र गायकी येत नाही.’

यावर पु. ल. म्हणाले, ‘चोरीमध्ये तसं बरं का भीमसेन काहीच वाईट नसतं. तुम्ही काय चोरता यावर ते सगळं अवलंबून असतं. मन चोरलं तर काय वाईट आहे? सूर चोरायला काहीच हरकत नसते? चोरी नाहीच ही. सूर कोणाच्याही मालकीचे नाहीत.’

तेव्हा ज्येष्ठत्वाचं गुणगान करताना हेच म्हणायचं… कामात रंगून जा. मग आजूबाजूला वयाच्या बेड्या पडायच्या नाहीत.

आकलन बदलायला हवं! ते असं! अशी किती उदाहरणं सांगू. आजूबाजूला पहा! फक्त मनावरचे आणि डोळ्याखालचे अभ्रे तेवढे काढून टाकायला हवेत.

– रविप्रकाश कुलकर्णी

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..