‘आय लिव्ह फॉर यू’ या यशस्वी पुस्तकानंतर मराठमोळी धनश्री कदम आता ‘सुझाना जोन्स’ हे नवं पुस्तक घेऊन येतेय. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी तिचं दुसरं पुस्तक प्रकाशित झालंय. पेशाने फ्रेंच शिक्षिका असलेली धनश्री लेखन क्षेत्राकडे कशी वळली याबाबत तिने मारलेल्या या गप्पा. गेल्या काही वर्षात अनेक तरुण लेखक वाचकांसमोर आले. विविध विषय हाताळून ही तरुणाई बिनधास्तपणे व्यक्त होतेय.
सुदीप नगरकर या तरुण लेखकाला तर प्रत्येक तरुणाने डोक्यावर घेतलंय. याचप्रमाणे तरुणाई ब्लॉग्स, सोशल मीडिया अशा माध्यमातून व्यक्त होऊ पाहतेय. व्यक्त होण्याचं माध्यम मिळाल्यामुळे अनेक लेखकही तयार झाले आहेत. अशीच एक तरुण लेखिका म्हणजे धनश्री कदम.
२५ वर्षाच्या या तरुणीचं एक नवं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. ‘सुझाना जोन्स’ असं त्या पुस्तकाचं नाव असून पुस्तक प्रकाशना वेळी ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, जयवंत वाडकर, नाटय़ समीक्षक संभाजी सावंत आदी प्रमुख पाहुणे आले होते.
माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यानंतर विलेपार्लेच्या डहाणूकर महाविद्यालयातून तिने बी.कॉम.ची पदवी संपादन केली. लिखानाची आवड कशी निर्माण झाली असं विचारलं असता ती म्हणाली की, ‘मला लहानपणापासूनच लिखाणाची आवड होती. इयत्ता सातवी-आठवीत असताना मी कविता लिहायचे. गोष्टी स्वरूपातलं लिखाण त्यावेळी कमी होतं, मात्र कविता लिहायला मला प्रचंड आवडतं. त्यानंतर एकदा शॉर्ट स्टोरी लिहिण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वीही झाला. ती शॉर्ट स्टोरी माझ्या सगळ्या मित्र-मैत्रणींना आवडली आणि तेव्हापासून मी लिहायला लागले. आपल्या लोकांनी मार्गदर्शन केल्याने लिहिणे सुकर झाले. त्या दरम्यान अनेक स्पर्धामध्येही भाग घेतला होता. तेव्हा बक्षिसेही मिळाली.’
आजकाल प्रत्येक तरुणाई प्रत्येक विषयावर बोलू पाहते. त्यासाठी सोशल माध्यमं त्यांच्याजवळ आहेतच. शिवाय अनेक तरुणांचे ब्लॉग्जही प्रसिद्ध आहेत. पण पुस्तक काढण्याचं काम त्यापेक्षा फार अवघड असतं. असं असतानाही धनश्रीने आपलं स्वत:चं पुस्तक लिहिलं. २०११ साली तिने पहिलं पुस्तक लिहिण्यासाठी सुरुवात केली. जवळपास आठ महिन्यांनंतर तिचं हे पुस्तक लिहून तयार झालं आणि २०१२ साली तिचं हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. तिच्या पहिल्या पुस्तकाचं नाव होतं ‘आय लिव्ह फॉर यू’. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी तिने तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं.
या पुस्तकाच्या जवळपास ३ हजार ५००पेक्षा जास्त प्रती खपल्या. श्रिया आणि आदित्य या तरुण व्यक्तिरेखेभोवती फिरणारी ही कथा होती. या कादंबरीच्या ३५००हून अधिक प्रती प्रकाशनापूर्वीच विकल्या गेल्या होत्या. पदार्पणाच्या पहिल्या कादंबरीने इतकी विक्री केल्यानंतर धनश्रीचा उत्साह दुणावला.
पहिल्या पुस्तकाने मिळालेल्या यशानं हुरळून न जाता दुस-या पुस्तकासाठी ती आत्मविश्वासाने लिहू लागली. पहिल्या पुस्तकाच्या वेळी झालेल्या चुका सुधारण्यासाठी तिला आता नव्या पुस्तकाची आस लागली होती. त्याचप्रमाणे तिचे वाचकही दुसरं पुस्तक कधी निघणार असं विचारत होते.
लिखाणात आणखी प्रगती व्हावी, मॅच्युरिटी यावी याकरता तिने जवळपास ४ र्वष अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान तिच्या लिखाणात बरीच सुधारणा झाली. त्यामुळे नवं पुस्तक लिहायला तिने सुरुवात केली. ती म्हणाली की, ‘दरवर्षी माझं नवं पुस्तक यावं असं मला अजिबात वाटत नाही. मात्र जेव्हा केव्हा मी पुस्तक लिहीण त्यात मात्र पूर्वीपेक्षा बऱ्याच सुधारणा असणं मला गरजेचं वाटतं. त्यामुळे पहिल्या पुस्तकानंतर मी थोडा अभ्यास केला आणि नंतरच दुसरं पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.’
या नव्या पुस्तकाबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘२३ वर्षीय ख्रिश्चन कॅथलिक सुझाना, एका धनाढय़ हिंदू राजकारण्याचा तरुण मुलगा अभिषेक आणि तिचा बालपणीचा मित्र माल्कम रिचर्ड डेव्हिस या तिघांच्या मनातील भावनिक घालमेल आपल्याला सुझाना जोन्स या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.’
धनश्री पेशाने फ्रेंच शिक्षिका आहे. मुंबई युनिव्र्हसिटीमधून ती फ्रेंचचा पदव्युत्तर अभ्यासही करतेय आणि अनेक विद्यार्थ्यांना शिकवतेही. फ्रान्समध्ये भारतीय संस्कृतीची गोडी रुजावी याकरता गेल्या वर्षी भारतातर्फे काही मोजक्या तरुणांना पाठवण्यात आलं होतं, त्यावेळी धनश्रीसुद्धा तिथे गेली होती. तिला इंग्रजी साहित्य विश्वासोबतच फ्रेंच साहित्यातही नाव कमवायचं आहे.
मराठी भाषिक वाचकांना मराठीत तुझ्याकडून काही वाचायला मिळाले की नाही, असं विचारल्यावर ती म्हणाली की, ‘साहजिकच. मला आपल्या मातृभाषेचा प्रचंड आदर आहे. कुसूमाग्रजांच्या वाढदिवसादिवशी मला माझं नवं मराठी पुस्तक प्रकाशित करायचं आहे. त्यासाठी खूप कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होईल की नाही, याबाबत शंका आहे. मात्र मी लवकरच मराठी पुस्तकही घेऊन मराठी वाचकांसमोर येणार आहे. शिवाय हे पुस्तक इंग्रजी भाषेतही असेल.’
धनश्रीला लेखिका म्हणूनच नावारूपाला यायचं आहे. त्यासाठी तिची ही सारी धडपड सुरू आहे. तिच्या लिखानाबाबत अनेकांनी कौतुक केलंय. त्यामध्ये सगळ्यांचे लाडके कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदमही आहेत. ‘आय लिव्ह फॉर यू’ या तिच्या पहिल्या पुस्तकाबाबत बोलताना ते धनश्रीला म्हणाले की ‘तू खूप वेगळ्या प्रकारचं लिखाण करतेस. तुझी लिखाणाची शैली नक्कीच वाचकांना आवडत असणार.’ अनेक वाचकांचेही तिला खूप फोन, मॅसेज येत असतात. या कौतुकातूनच तिला प्रेरणा मिळतेय आणि लिहिण्यासाठी उत्साह वाढतोय, असं ती म्हणते.
तरुण वयात धनश्रीने मारलेली ही मोठी उडी खरंच कौतुकास्पद आहे. पहिल्या पुस्तकातून झालेल्या कौतुकात समाधान न मानता आपली लेखनशैली अजून प्रगल्भ करत तिने मारलेली ही दुसरी उडी अभिनंदनीय आहे. तिला तिच्या दुस-या पुस्तकासाठी आपण खरंच शुभेच्छा द्यायला हव्यात.
स्नेहा कोलते
Sneha Kolte
snehagkolte.sk@gmail.com
Leave a Reply