आशाजी,
आपण खरंच नशीबवान, कारण आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्ण काळाच्या साक्षीदार आहात.. १९५९ साली ‘दिल देखे देखो’ या चित्रपटातील नायिकेच्या पदार्पणानंतर पुढील सलग पंधरा वर्षे आपण सिनेरसिकांच्या ‘दिला’वर राज्य केलंत…
इंग्रजांविरुद्धच्या १९४२ लढ्यातील ‘चले जाव’ चळवळी दरम्यान आपला मुंबईत जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासून आपण बालकलाकार म्हणून कॅमेऱ्याला सामोऱ्या गेलात.. ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटाच्या निर्मात्याने आपणाकडे नायिका होण्याचे गुण नाहीत म्हणून आपणास नाकारले.. त्याच वर्षी ‘दिल देखे देखो’ चित्रपटात शम्मी कपूरच्या नायिकेची भूमिका करुन पुढे अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटाद्वारे “ज्युबिली स्टार’ ही स्वतःची ओळख निर्माण केलीत.
‘जब प्यार किसी से होता है’ या देव आनंद सोबतच्या चित्रपटाने अफाट यश मिळविले. नंतर राजेंद्र कुमारचा ‘घराना’ चित्रपट प्रदर्शित झाला. १९६३ सालातील ‘फिर वही दिल लाया हू’ हा जॉय मुखर्जी बरोबरचा चित्रपट मी कितीही वेळा पाहिला तरीदेखील तो पुन्हा पहावासा वाटतो. याला कारण सुमधुर गाणी व त्यातील आपला धमाल कमाल वावर..
नंतर आला ‘जिद्दी’. त्यातही जॉय मुखर्जीच हिरो होता.. ‘मेरे सनम’ मध्ये विश्वजितने आपल्याला साथ दिली. ओ. पी. नय्यरची श्रवणीय गाणी ऐकण्यासाठी मी या चित्रपटाची ‘पारायणं’ केलीत..
सदाशिव पेठेतील आमच्या घरासमोरील हॉटेलवाला, दर बुधवारी ‘बिनाका गीतमाला’ मोठ्या आवाजात लावायचा. त्या कार्यक्रमातून ‘तिसरी मंझील’, ‘लव्ह इन टोकियो’ व ‘आये दिन बहार के’ चित्रपटांची अप्रतिम गाणी ऐकतच मी मोठा झालो..
मला जेव्हा चित्रपटाबद्दल आठव्या वर्षांपासून कळायला लागलं, तेव्हा ‘उपकार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.. चित्रपट उशीरा पाहिला मात्र त्यातील गाणी ऐकून देशप्रेमाचं स्फुरण यायचं..
राजेश खन्नाच्या ‘बहारों के सपने’ या कृष्णधवल चित्रपटातील ‘चुनरी संभाल गोरी..’ हे गाणं, दूरदर्शनच्या ‘छायागीत’ कार्यक्रमात पहाण्यासाठी मी मंडईतील गणपती शेजारी लावलेल्या टीव्ही समोर हातात भाजीची पिशवी घेऊन, उभा राहिलेलो आहे…
‘कन्यादान’ चित्रपटातील सर्व गाणी मला फार आवडलेली आहेत.. ‘लिखें जो खत तुझे..’, ‘पराई हू पराई..’, ‘मिल गए मिल गए, आज मेरे सनम..’, ‘मेरी जिंदगी में आते, तो कुछ और बात होती..’ या ‘नीरज’च्या गाण्यांनी त्याकाळी तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं..
पाचवीला शाळेत जाताना, मला भावे हायस्कूलच्या समोरील एका हॉटेलवर ‘आन मिलो सजना’ चित्रपटाचं बॅनर दिसायचं. त्यावर तुम्ही हातात गलोल घेऊन नेम धरलेलं चित्र रंगवलेलं होतं.
वसंत टॉकीजला ‘कटी पतंग’ पाहिला.. त्यावेळी चित्रपट कळण्याचं माझं वयही नव्हतं.. तरीदेखील त्यातील गाणी खूप आवडली..
‘विजय’ला ‘मेरा गाव मेरा देश’ पाहिला.. त्यामध्ये आपण खरोखर राजस्थानी स्त्री वाटलात.. राज खोसलांचा तो एक सर्वोत्तम चित्रपट आहे..
शम्मी कपूरचा ‘जवॉं मोहब्बत’ व जितेंद्र बरोबरचा ‘कारवॉं’ चित्रपट मी मॅटिनीला पाहिले..
दहावीच्या परीक्षेनंतर मी सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘प्यार का मौसम’ चित्रपट मॅटिनीला पाहिला. तो मला खूप आवडला.
राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जखमी’ या चित्रपटात आपण सुनील दत्त बरोबर काम केलं होतं. या चित्रपटानंतर आपण क्वचितच दिसू लागलात.. १९९९ पर्यंत आपण काही चित्रपटांतून चरित्र भूमिकाही केल्या..
एकूण कारकिर्दीत आपणास ‘कटी पतंग’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. १९९२ साली ‘पद्मश्री’ किताबाने आपणास गौरविण्यात आले. २००२ साली ‘फिल्मफेअर’च्या जीवनगौरव पुरस्काराने आपणास सन्मानीत करण्यात आले..
एक अभिनेत्री असूनही समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण सांताक्रूझला डोळ्यांवर उपचार करण्यासाठी ‘आय हॉस्पिटल’ उभारलं..
७९व्या वर्षांत पदार्पण करताना आपल्या सोबत काम केलेले अभिनेतेही मोजकेच राहिलेले आहेत.. धर्मेंद्र, जितेंद्र व मनोजकुमार यांनीदेखील वयाची ऐंशी पार केलेली आहे..
आपल्या गाजलेल्या पंधरा वर्षांतील चित्रपटांतील गाणी ऐकली की, मन प्रसन्न होतं.. मन भूतकाळात जातं.. ते रमणीय दिवस आठवतात.. मरगळलेल्या मनाला पुन्हा उमेद मिळते… ही फक्त आपल्या अभिनयाची ‘जादू’ आहे…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-१०-२१.
Leave a Reply