निसर्गावर हिरव्या मखमली गवताची चादर पसरवणारा आणि वातावरणात शीतलता घेऊन येणारा पावसाळा तर सर्वांनाच आवडतो. काळ्याकुट्ट ढगांमधून पडणारी पावसाची मनमोहक थेंब, डोक्यावरून वाहणारा गार वारा, झाडांच्या पानांमधून वाहणारे पावसाचे पाणी आणि आकाशात चमकणा-या विजा, कधी हृदयाला शातंता प्रदान करतात, तर कधी सुंदर आठवणींचे झुले झुलवतात.
सकाळपासून पाऊस पडत होता आणि समिधा घरातील कामांचा कंटाळा करत घराच्या व्हरांड्यात चहाच्या घोटांसह या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत होती. मुळातच गाण्याची मनापासुन आवड असलेल्या समिधाने ओठातल्या ओठात गाणे गुणगुणायला सुरवात केली. “लगी आज सावन की फिर वो झडी है” आणि त्याचवेळी तिला त्यांचे जुने दिवस आठवायला लागले.
मनोजशी साखरपुडा झाल्यानंतर त्या दिवशी ती पहिल्यांदा त्याला भेटणार होती. ती बस स्टॅंन्डवर त्याची आतुरतेने वाट पाहत होती, पण मनोजचा काही दुर दुर पर्यंत पत्ता दिसत नव्हता. त्या दिवशीही असाच पाऊस पडत होता. संततधार पावसामुळे रस्त्यावर भलं मोठं तळं साचलं होतं. त्या दिवसात मोबाईल फक्त काही लोकांकडे असायचा, नाहीतर तिने त्याला फोन करून ‘तू कुठे आहेस’ असे विचारले असते. ठरलेल्या वेळेपेक्षा जवळ जवळ एक तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला होता. शेवटी समिधाचा धीर संपला आणि तिने घरी परतण्याचा निर्णय घेतला. तिने ऑटो थांबवताच अचानक मनोज त्याच्या बाईकवर तिथे पोहोचला. संतापलेली समिधा त्याच्यावर बरसणा-या ढगांपेक्षा जास्त बरसली. बिच्चारा मनोज काही बोलू शकला नाही, त्याने हेल्मेट काढले आणि शांतपणे समिधाचे बोलणे ऐकु लागला.
गोरा गोमटा मनोज, त्याच्या केसांमधून टपकणारे पाणी आणि त्याच्या चेहऱ्यावर ठेवलेला फ्रेंच कट प्रत्येक येणा-या जाणा-यांचे लक्ष वेधुन घेत होता. समिधा ही आतापर्यंत पावसामुळे ओेली झाली होती. काचेच्या भरतकाम असलेला लाल सूट त्यावर गुलाबांची नक्षीकाम असलेल्या सुटावरची ओढणी आणि लाल आणि पिवळ्या दगडांनी जडलेले, कानातले, तिच्या शब्दांच्या लाटांसह डोलत होते, पिवळ्या दुपट्टयाने तिचे डोके झाकून ती एका श्वासात बोलली होती, आणि मनोज तिच्याकडे फक्त एक टक पाहत राहीला.
मनोजने पुन्हा हेल्मेट घातले आणि समिधाचा हात धरून बाईकवर बसण्यास सांगितले. समिधा मनोजला घट्ट धरुन बाईकवर बसली. पावसाचे थेंब आता समिधाच्या चेहऱ्याशी खेळू लागले होते. तिला मनातुन वाटत असुनही, ती काहीही बोलू शकत नव्हती. मनोजने तिला सांगितले की पावसामुळे ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळे त्याला यायला बराच वेळ लागला.
काही वेळातच ते नवसाला पावणा-या गणपतिच्या मंदिरात पोहोचले. ते प्रथमच बाहेर भेटत असल्याने, त्यांनी प्रथम मंदिरात बाप्पाचा आर्शिवाद घेणे योग्य समजले. मंदिराच्या बाहेर एक छोटा ढाबा होता, दोघेही बाकावर बसून चहा पिऊ लागले.
थोडा वेळ दोघेही काहीच बोलले नाहीत, फक्त एकमेकांकडे बघून डोळे झुकवुन घेत होते. मग मनोजने सुरवात केली “समिधा मला माफ कर, मला उशीर झाला, खूप जोरात पाऊस पडत होता” मनोजला मध्येच थांबवत समिधा म्हणाली. आज सकाळपासून पाऊस आहे. “तेथे ट्रॅफिक जाम आहे, अशा परिस्थितीत तुला हळू हळू गाडी चालवावी लागेल, हे माहित असूनही, मी तुला नाही नाही ते बालेले. तूच मला माफ कर.”
“तुला एक गोष्ट सांगू, आज तू माझ्यावर जो हक्क दाखवलास तो आवडला मला, नाहीतर माझ्याशी इतक्या मोठ्या आवाजात कोणी बोलू शकत नाही” मनोज म्हणाला.
“ठीक आहे, तू होतास म्हणुन, नाहीतर मीही अशी कुणाची वाट बघत बसले नसते.” आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसले.
त्यानंतर मनोज समिधाला एक मोठे ग्रिटींग कार्ड देत म्हणाला, ” फुलांचा गुच्छ आणू शकलो नाही, ते काय आहे ना? आज मौसम बडा बेईमान है.”
समिधा ने लाजून कार्ड उघडले तेव्हा मनोजच्या सुवाच्य हस्ताक्षरांत लिहिलेले एक पत्रही होते ज्यात मनोजने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमकविता लिहून आपले प्रेम व्यक्त केले होते.
“ऐक, खरं सांगु का तुला मला ना या प्रेम वैगेरे गोष्टी नाही कळतं.” मनोज आपल्या केसांतुन हात फिरवत तिला म्हणाला. “बरं, मला हे तुझ्या कविता वाचल्यावरच कळलं” समिधा दबलेल्या स्मितहास्याने मनोजला चिडवत म्हणाली.
पावसात लिंबू आणि लाल तिखट लावलेल्या गरमागरम मक्याचा कणसांचा आस्वाद घेत घेत, दोघेही आपापल्या घरी परतले, पण कार्डमध्ये लपवलेले पत्र आणि पत्रातल्या प्रेम कविता लग्न होईपर्यंत थांबल्या नाही.
प्रत्येक कार्डमध्ये एक नवीन पत्र आणि प्रत्येक नवीन पत्रात एक नवीन प्रेम संदेश.
ढगांच्या गडगडाटाने समिधा तिच्या गोड आठवणीतून बाहेर आली. तिने कपाटाच्या वरच्या कोपऱ्यात लपवलेली. मनोजने तिला आणि तिने मनोजला लिहिलेली प्रेमपत्रे काढली, मुसळधार पावसात व्हरांड्यात बसून तीने प्रेमपत्रे वाचायला सुरुवात केली. प्रत्येक पत्रावर लिहिलेला एक गोंडस शेर, प्रेम कविता तिला रोमांचित करत होती. ती स्वतःशीच बोलू लागली, “अरे, जेव्हा मी त्याच्यावर नाराज झाले होते. तेव्हा त्याने हे पत्र दिले, जेव्हा आमचे लग्न ठरले तेव्हा हे पत्र”. प्रत्येक पत्रात लिहिलेले शब्द वेगवेगळे होते, पण भावना मात्र एकच होती. ती होती प्रेमाची भावना.
तेवढ्यात मनोजचा फोन आला.
“काय करत आहेस समिधा ?
“काही नाही, मी वाचत बसले आहे”
“बरं आहे, आजचा पेपर वाचत आहेत, मॅडम”
“मनोज नाही मी पेपर नाही वाचत आहे.”
“मग काय वाचत आहेस ?”
“आपल्या अलवार प्रेमाचा वारसा माझं तुझ्यावर तुझं माझ्यावर असलेल्या असीम प्रेमाचे मूक साक्षीदार, आपली प्रेमपत्रे.” समिधा एका क्षणात २० वर्षे मागे गेली, आणि पुन्हा आनंदाने गुणगुणु लागली. “लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में, हजारों रंग के नजारे बन गये. सवेरा जब हुआ, फुल बन गये। जो रात आई तो सितारे बन गये।”
मित्रांनो, खरे प्रेम आपल्या हृदयापासून कधीच वेगळे होत नाही, आपल्या प्रेमाचा, आपल्या जीवन साथीदाराचा आदर करा कारण ते तुमच्या आयुष्यातील पहिले प्रेम आहे. आणि कसं आहे नां जीवनात जबाबदाऱ्या, काम, आणि अडचणी आयुष्यभर येतच राहतील, पण या दरम्यान तुमचे प्रेम नेहमी तरुण ठेवले पाहिजे.
प्रेमात चिंब भिजलेली ही कथा तुम्हाला कशी वाटली, कॉमेंट मध्ये नक्की सांगा, माझ्या इतर कथा ब्लॉग वाचण्यासाठी तुम्ही मला, माझ्या ब्लॉगला फॉलो करु शकता, sharadkusareblogspot.com
दि.१५.०८.२०२१ © शरद कुसारे
Leave a Reply