सोव्हिएटच्या अलौकीक धाडसी लष्करी महिला वैमानिक
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनांच्या आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी सोव्हिएट युनियनच्या राज्यकर्त्यांनी तेथील स्त्रियांना लष्करातील विमानदलात मदतीस येण्यास आवाहन केले होते. लष्करी मालवाहतुकीसारखे तुलनात्मक दृष्टीने ‘सोपे’ वाटणारे काम स्त्री वैमानिकांनी करावे, अशी गुरुवातीस अपेक्षा होती. परंतु देशाच्या हवाई लष्करी कारवाईच्या इतिहासात सोव्हिएट युनियनमधील स्त्री वैमानिकांची कामगिरी अत्यंत कुशल लढाऊ तळपत्या नायिकांप्रमाणे झालेली होती!
अशा नायिकांमध्ये लिली लिटवाक या स्क्वॉर्डन पायलटचे नाव सोव्हिएट युनियनच्या विमानदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनीच कोरावे असे ठरले. तिची कार्यपद्धती ही दंतकथा वाटावी अशी आहे. अतिशय अल्पावधीत लिली लिटवाकने बारा जर्मन लढाऊ विमानांना जमीनदोस्त केले होते.
लिली लिटवाकच्या विमानावर पांढऱ्या गुलाबाचे चित्र ठळकपणे रेखाटलेले होते. त्यामुळे आकाशात तिची ओळख सहजपणे होत असे. आकाशात स्वतःभोवती सहज गिरक्या घेण्याची करामत हे लिली लिटवाकचे खास वैशिष्ट्य होते. जेव्हा तिच्या विमानाचा पाठलाग शतूपक्षाची विमाने करीत तेव्हा तिच्या विमान चालविण्यातील करामती व कसरती नेत्रदीपक असत. तिचे सारे कौशल्य पणाला लागल्यासारखे जाणवत असे. ती सरळ रेषेत वर वा खाली आपले विमान नेत असे. ती विमान असे घुमवत असे, की हवाई लढाईत तिच्या विमानास शतूवर हल्ला करण्याच्या दृष्टीने प्रभुत्व मिळविणारी ‘जागा’ मिळविता येई.
लिली लिटवाकची कीर्ती जसजशी पसरू लागली तसतशी शतूपक्षातील प्रत्येक जर्मन पायलटमध्ये पांढऱ्या गुलाबाच्या सुप्रसिद्ध ‘गर्ल पायलट’ला ठार मारण्याची इच्छा प्रबळ होत गेली.
अखेर शेवटी अतिशय क्रूर पद्धतीने लिली लिटवाक हिचे विमान जमीनदोस्त करण्यात शत्रूच्या विमानांना यश आले होते. परंतु अखेरची ती आकाशातील जीवघेणी लढाई लिली लिटवाक ज्या पद्धतीने लढली, ती पद्धतही विलक्षण नेत्रदीपक होती. ज्यांनी ज्यांनी ही लढाई पाहिली, त्यांनी त्या लढाईचे अविस्मरणीय असे वर्णन करताना जर्मनांच्या आठ विमानांनी लिली लिटवाकच्या एकाकी विमानावर कसे चारही बाजूंनी हल्ले करून तिचे विमान पाडले होते हे सांगितले होते. हे वर्णन ऐकले वा वाचले, की आपल्या डोळ्यांसमोर एकाकीपणे शौर्याने लढणारा अभिमन्यूच उभा राहतो!
सोव्हिएटच्या इतिहासात लढाऊ विमानांच्या महिला वैमानिकांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दाखविलेले शौर्य आणि कौशल्य हे कोणत्याही देशाच्या विमानदलास श्रेष्ठ दर्जाचे वाटावे असेच होते. दंतकथेतील नायिका वाटाव्यात अशा या सोव्हिएट महिला वैमानिक होत्या. कोणत्याही कसलेल्या पुरुष वैमानिकाच्या तोडीचे नेत्रदीपक धाडसी कार्य या महिला वैमानिकांनी आपल्या कर्तृत्वाने युद्धांच्या इतिहासात नोंदविलेले आहे.
जेव्हा सोव्हिएटच्या विमानदलात लढाऊ विमानांच्या वैमानिक म्हणून
महिलांचा प्रवेश झाला, तेव्हा प्रथम जर्मन लष्करी अधिकाऱ्यांनी ती गोष्ट थट्टेवारी आणि हसण्यावारीच नेली होती. परंतु महिला वैमानिकांचे सोव्हिएट देशाच्या आकाशातील कर्तृत्व पाहून जर्मनांना महिला वैमानिकांविषयीचा पूर्वग्रह बदलावा लागला. इतकेच नव्हे, तर त्या महिला वैमानिकांनी जर्मन लष्करी अधिकाऱ्यांनी धास्तीच घेतली होती. किंबहुना या महिला वैमानिकांना जर्मनांनी (दि नाइट विचेस ऑफ दि स्काईज) ‘आकाशस्थ रात्रीच्या चेटकिणी’ असे टोपणनाव दिलेले होते. या टोपणनावातच जर्मनांना त्या महिला वैमानिकांविषयी वाटणारी भीती दिसून येते.
सोव्हिएट महिला वैमानिकांच्या संदर्भात अनेक कथा प्रसिद्ध आहेत. काही महिला वैमानिकांची नावेही सर्वसामान्य माणसांना ठाऊक नसली तरी त्यांच्या शौर्याच्या विलक्षण कथा सगळ्या जगभर गेलेल्या आहेत. अशाच दोन महिला वैमानिकांची कथा ऐकण्यासारखी किंवा सांगण्यासारखी आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एक दिवस या दोन महिला नेहमीप्रमाणे त्यांची विमाने घेऊन जाताना त्यांना खालच्या भागातील जर्मन विमान दिसली. बॉम्बवर्षाव करणाऱ्या त्या जर्मन विमानांचा हल्ला कोणतीही किंमत देऊन थांबविण्याची आवश्यकता होती. आत्मघातकी पथकाप्रमाणे त्या दोघी शतूच्या विमानावर तुटून पडल्या. त्या दोघींची जर्मन वैज्ञानिकांची ती विमाने पाडली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उरलेल्या जर्मनीच्या विमानांना आपला हल्ला थोपवून ‘मिशन’ सोडून पळून जाणे भाग पडले. आश्चर्य म्हणजे चित्रपटात दाखवितात त्याप्रमाणे त्या सोव्हिएट शूर वैमानिक महिला नाट्यमय पद्धतीने सुखरूप जमिनीवर आल्या होत्या. एकीच्या विमानाने पेट घेतला असता ती परेशूटच्या साहाय्याने परतली होती, तर दुसरीने आपले विमान जमिनीवर आदळत स्वतःला व विमानाला सुखरूपपणे संकटातून बाहेर काढले होते. विशेष म्हणजे विमानाबाहेर सुखरूप आलेल्या त्या धाडसी वैमानिक या महिला आहेत हे पाहून त्यांना जमिनीवर भेटलेल्या रशियन शेतकऱ्यांना आश्चर्यच वाटले होते.
जर्मनांच्या ‘फॉर्टी टू’ जातीच्या विमानांना पाडणाऱ्या आणि पळवून लावणाऱ्या त्या महिलांची आणि एकूणच रशियन लष्करातील त्या काळची विमाने ही जर्मन विमानदलाकडे असणाऱ्या विमानांपेक्षा कमी प्रतीची होती, हे लक्षात घ्यायला हवे.
रशियन महिला वैमानिकांना आकाशातील मार्गक्रमणा करण्यासाठी त्या काळी स्टॉपवॉचेस आणि नकाशे यांचा वापर करावा लागत असे. आजच्यासारखी संगणकाने सर्व नियंत्रित असलेली विमाने त्या काळी नव्हती. त्या काळातील विमानांची आजच्या अत्याधुनिक विमानांशी तुलना केल्यावर दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या रशियन महिला वैमानिकांच्या धाडसाचे, शौर्याचे आणि त्यागाचे महत्त्व अधिकच जाणवते.
मात्र सोव्हिएट देशाची विमानदलातील एकही महिला वैमानिक युद्धकाळातील आपले अनुभव हे मोठे ‘ग्लॅमरस’ आठवणींचे होते असे म्हणणार नाही; कारण युद्धातील बहुतेक सर्व मोहिमांचा शेवट हा त्यांच्यापैकी कितीजणांचा * मृत्यू झाला याची मोजदाद करण्यानेच होत असे आणि भीतीने पोटात गोळा आणणाऱ्या अनुभवांशी त्यांच्या कर्तव्याचाच भाग असलेली लढाई त्यांना अखंडपणे लढत राहावी लागत असे.
इरा काशेरिना या सोव्हिएट महिला वैमानिकेचा युद्धकाळातील एक अनुभव चित्तथरारक व हृदयस्पर्शी स्वरूपाचा होता. शत्रूपक्षाने निर्माण केलेल्या आगीच्या डोंबातून मोडकळीस आलेले विमान इराला न्यायचे होते. तिची सहवैमानिक कॉकपीटमध्येच मारली गेलेली होती. इरा विमानाच्या त्या कॉकपीटमधील पर्यायी नियंत्रण करणाऱ्या यंत्राचे संचलन करू पाहत होती. परंतु इराच्या ध्यानात असे आले की, तिची जिवलग मैत्रीण असलेल्या सहवैमानिक बाईचा मृतदेह नियंत्रण यंत्रावर पडल्यामुळे आपले विमान हव्या त्या दिशेला नेण्यासाठी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे इराला आपल्या जागेवर उभे राहून हात लांब करून मैत्रिणीचे प्रेत दूर धरून ठेवावे लागले आणि तशा स्थितीत शत्रूच्या आगडोंबातून इराने आपले विमान इष्ट जागी सुखरूप आणले होते. अत्यंत कठीण अवस्थेत धैर्याने व शौर्याने इरा सुखरूपपणे लष्करी तळावर परतल्यावर काही अधिकाऱ्यांनी तिला विचारले होते की, ‘अडचणी सौम्य करण्यासाठी तिने तिच्या सहवैमानिकेचे प्रेत विमानातून खाली फेकून का दिले नव्हते? इराने उत्तर दिले होते, “तसे करणे हे मैत्रिणीच्या दृष्टीने कल्पनेपलीकडील आणि अविचारी घटना ठरली असती!”
इराने मैत्री हे मूल्य स्वतःच्या जीवापलीकडे जपलेले होते. माणुसकीचे इतके हृदयस्पर्शी दर्शन क्वचितच घडताना आजच्या स्वार्थी जगात दिसते. जिवंत माणसांसाठी आपला प्राण देण्यास अनेकजण तयार असतात; परंतु आपल्या मैत्रिणीच्या मृतदेहाचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा प्राण धोक्यात घालणारी इरासारखी एखादीच व्यक्ती असते!
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply