“एकटी ” मधल्या सुलोचना दीदी कायम “आई “दिसल्या – मुलामध्ये आणि संकटांमध्ये ठाम उभ्या असलेल्या आईसारख्या ! गीतातील भाव चेहेऱ्यावर साकार करणाऱ्या ! सकाळी सकाळी सुमन कल्याणपुरांच्या साय भरल्या आवाजात हे गाणं ऐकलं. आवाजातील भाव त्यांच्या सत्शील चेहेऱ्यावर कायम उमटतात. अनेक “एकमेव” गोष्टी जाग्या झाल्या. गदिमांचे संस्कृतला जवळ जाणारे पण मराठीपण अभिमानाने मिरवणारे शब्द ! बाबूजींची आर्त चाल – प्रतीक्षा करणाऱ्या आईची कथा निवेदन करणारी. सुमनताईंबद्दल काय बोलणार?
सध्या रोज सकाळी मी व माझी पत्नी त्यांची गाणी ऐकत असतो. दिवसाचा साज बदलतो त्याने.
असंच एकमेवपण दिसलं होतं – खन्नाच्या चेहेऱ्यावर ! लताचा “रैना बिती जाय ” स्वर चेहेऱ्यावर गोंदवून घेताना !
असंच एकमेवपण दिसलं होतं अशोक सराफच्या चेहेऱ्यावर ! फैयाज चं “हुरहुर असते तीच उरी ” हे “एक उनाड दिवस ” मधील सगळं गमावलेलं गीत भक्तिभावाने ऐकताना !
असंच एकमेवपण दिसलं होतं “कुंवारा बाप ” मधल्या हरलेल्या मेहमूदच्या नजरेत – ” आ री आजा , निंदिया तू ले चल कहीं ” !
असंच एकमेवपण असतं अम्मांच्या (माता अमृतानंदमयी ) समाधिशांत चेहेऱ्यावर – जेव्हा त्या डोळे मिटून घेतात, विश्वाचे आर्त स्वतःमध्ये साठवून घेताना !
या सगळ्यांना एकच विनंती – ” इथून दृष्ट काढितो,निमिष एक थांबा तुम्ही ! ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply