बाबूराव रामजी बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी नाशिक येथे झाला.
बाबूराव बागुल मूळचे नाशिकचे.‘वेदाआधी तू होतास…वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास…तुझ्यामुळेच सजीवसुंदर झाली ही मही…’ यासारखी मानवाचा नव्याने वेध घेणारी विद्रोही कविता लिहिणारे बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक. शोषितांच्या आणि पददलितांच्या जीवनावर त्यांनी भेदक लिखाण केलं आहे. ‘धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि परिवर्तनवादी असणाऱ्या बागुल यांनी अण्णा भाऊ साठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून योगदान दिलं. त्यांच्या १९६२ सालच्या ‘जेव्हा मी जात चोरली’ या स्वानुभवावर आधारित पुस्तकानं त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. पाठोपाठ त्यांचा ‘आकार’ हा कवितासंग्रहही गाजला. ‘मरण स्वस्त होत आहे’, ‘सूड’, ‘अघोरी’, ‘दलित साहित्य आजचे मानवी विज्ञान’, ‘वेदांआधी तू होतास’, ‘कोंडी’ही त्यांची गाजलेली पुस्तकं. त्यांच्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या पुस्तकाला ‘हरी नारायण आपटे पुरस्कार’ मिळाला असून, ते पुस्तक दलित साहित्यातला मैलाचा दगड समजलं जातं. नामदेव ढसाळ त्यांना ‘मराठीतला दोस्तोव्हस्की’ म्हणत असत.
बागुल यांना २००७ सालचा ‘जनस्थान’ पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या स्मरणार्थ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे नवीन लेखकांना पुरस्कार देण्यात येतो.
बाबूराव बागुल यांचे २६ मार्च २००८ रोजी निधन झाले.
Leave a Reply