आता बालसाहित्याचे आयाम बदलले आहेत! कारण आता मुलांच्या भोवतालचं विश्वच झपाट्याने बदलत आहे. त्यांची ‘जगण्याची भाषा’ ही आता वेगळी आहे!
— जागतिकीकरणाचा पहिला परिणाम म्हणजे ‘मूल’ हे मार्केटिंगचा विषय झालं! मुलाला काय पाहिजे ह्याचा सारासार विचार न करता, कुठला माल खपला पाहिजे ह्याचाच विचार करुन त्याचा आकर्षक धबधबा मिडीयाच्या मदतीने ग्रामीण तसेच नागरी भागातून वाहू लागला. वर्तमानपत्रात रविवारच्या पुरवणीत असणारं मुलाचं पान त्यांनी बंद केलं आणि दर महिन्याला ‘मूल ह्या ग्राहकराजासाठी’ खास प्रायोजित पुरवणी सुरू झाली!! पॉकेमॉन ची कार्डस्, चिटोस,चॉकोस, बेबलेड ही त्याची उदाहरणं आहेत.
— दूरदर्शनवर सतत वाढत असणाऱ्या वेगवेगळ्या चॅनल्समुळे मुलांमधे नकळत एक प्रकारचा ‘सामाजिक चतुरपणा’ आला. स्त्री पुरुष संबंधातला मोकळेपणा ही घरच्यांबरोबर जेवताना पाहण्याची गोष्ट झाली. आणि मालिकांमधे होणारे घटस्फोट, अनैतिक संबंध, खोटारडेपणा, फसवेगिरी ह्याबाबत घराघरातून चालणारी रसभरीत चर्चा मुलांच्या कानावर सहजी येऊ लागली. पर्यायाने मुलांचे खेळ व मुलांची भाषा बदलली! ‘चिटींग,लफडा,लोचा, पंगा,घटिया,सही’ हे आणि असे शब्द मुलांच्या बोली भाषेत जमा झाले; जे त्यांनी मालिकांतून व घरातल्या मोठ्या माणसांच्या संवादातून उचललेले आहेत.
— शहरातून टॉवर्स उभे राहू लागले तसे जिल्ह्याच्या ठिकाणी अपार्टमेंटस व ब्लॉक संस्कृती येऊ लागली. मैदानी खेळ कमी होऊ लागले व सायबर कॅफे मधली गर्दी वाढू लागली. क्लास सुटल्यावर सायबर मधे जाऊन तासभर खेळून,मस्त फ्रेश होऊन मुले घरी येऊ लागली.
— घराघरात संगणकाचा शिरकाव झाला. मग घराततच मिनी सायबर कॅफे सुरू झाले. संगणक कशासाठी घेतला होता ह्याचा विसरच पडला,आणि सिनेमा,गाणी,खेळ व शक्य असेल तिथे इंटरनेट चॅटींग साठीच त्याचा अधिक उपयोग व्हायला लागला.
— संगणक आवाक्यात येतो आहे,त्याच सुमारास पालकांना इंग्रजी माध्यमाचे आकर्षण वाटू लागले. आणि मग बालवाडी पासूनच मुले क्लास,ट्युशन,वर्कशीटस ह्या चा*ात भरडली जाऊ लागली.
ह्या आणि अशा गोष्टिंचा एकत्रित परिणाम असा झाला की जीवनाची गती वाढली व त्यातूनच सुरू झाली स्पर्धा. जे काही करायचं ते स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व इतरांवर मात करण्यासाठी. चांगलं आहे म्हणून वाचायचं नाही तर स्पर्घेत राहण्यासाठी वाचायचं.
मुलांच्या अभ्यासात, खेळात,वाचनात,सहलीत किंबहुना त्यांच्या एकंदर जगण्याचा स्पर्धा हाच अविभाज्य घटक झाला!!
मुलांच्या मानसिकतेचा विचार करताना त्याच्या पाठीमागचा कॅनव्हास हा सध्यातरी असा आहे, असा विचार करुनच पुढे जावे लागेल.
सुमारे वीस वर्षापूर्वीची ही घटना आहे.
पुण्याला “बालसाहित्त्यकारांचं आंतरभारती साहित्य संमेलन’ भरलं होतं. मी त्यावेळी मुलांसाठी नव्यानेच लिहायला सुरुवात केली होती. काही बंगाली लेखकांना भेटलो. गप्पा मारताना त्यांना विचारल की ‘मुलांसाठी ते काय नवीन लिहीत आहेत? लेखन संदर्भात काय नवीन प्रयोग करत आहेत?”
त्या बंगाली लेखकाने अत्यंत सहजतेने आणि मिश्कीलपणे मला उत्तर दिलं.
त्याच्या त्या सहजतेने मला नवीनच गोष्ट समजली! आपण मुलांसाठी कशाप्रकारचे लेखन केले पाहिजे ह्याची स्पष्टता आली. आणि त्याने बोलताना मिश्कीलपणेच, पण आम्हा सर्व मराठी बालसाहित्यिकांना एक सणसणीत थप्पड पण लगावली!
तो बंगाली लेखक म्हणाला,“अजी,उस रवींद्रनाथ ठाकूर ने तो हमारी गोची ही कर दी है! हम कुछ भी लिखना चाहे,कुछ भी नया प्रयोग करना चाहे तो भी हम कर नही पातें! क्योंकी हमारे पहले ही ठाकूरजीं ने वो किया ही है! और हम से शतगुना बेहतरीन किया है!! हम उनसे अच्छा क्या कर सकते है? मानो,ठाकूरजींने बालसाहित्य के बारें में एक मापदंड सा बनाया है। नही हम उस हद तक जा सकते, नही उसे पार कर के आगे जा सकते! यही तो गोची है। लेकीन बेटे,क्या तुम्हारे मराठी भाषा में,ऐसा कोई ठाकूरजी जैसा लेखक है,जो तुम्हारी गोची कर सकता है?” त्यावेळी मी त्यांना उत्तर देऊ शकलो नाही. त्याचं एक कारण म्हणजे, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहितच होतं! आणि म्हणूनच त्यांनी तो गुगली बॉल माझ्याकडे टाकला होता! दुसरं कारण म्हणजे, त्याक्षणी मी अंतर्मूख झालो होतो! कमीत कमी वेळात किती प्रचंड काम करावं लागणार आहे ह्याचा अंदाज येऊ लागला होता.
ह्या घटनेनंतर रवींद्रनाथांचे बालसाहित्य जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागलो. त्यांचे बालसाहित्य आणि आजचे आपले बालसाहित्य (काही सन्मानीय अपवाद वगळून) ह्याच्या मूळ संकल्पनेतच प्रचंड फरक आहे ह्याची जाणीव झाली. आपल्या बालसाहित्यात उपदेश,शिकवण,संस्कार,तात्पर्य हे सारं ठासून भरलेलं. इतकंच नव्हे तर, समोरचा मुलगा हा ‘अडाणी किंवा मातीचा गोळा’ आहे असं समजूनच जबरदस्तीने त्याच्यावर शिकण्याचा बोजा टाकलेला. शरीर गोष्टीचं किंवा कवितेचं पण त्याचा आत्मा मात्र ‘मुलांना काहीतरी शिकवणं!’ बिचारी मुले ‘त्या शरीराला’ फसून गोष्ट किंवा कविता वाचायला जातात आणि मग त्यातील ‘आत्मा’ मुलांवर शिकवणीचा मारा करत!! त्यामुळे अवांतर वाचनाविषयी एक नफरत मुलांच्या मनात नकळत निर्माण होते. रवींद्रनाथांचं सर्वात मोठं योगदान हे की,त्यांनी शिक्षणातच बालसाहित्याचा समावेश केला. बालसाहित्य आणि मुलांचं शिकणं ह्याचा अतिशय गंभीरपणे विचार करुन,त्याबाबत प्रयोग करुन त्याचा अनोखा समन्वय साधला! त्यामुळे शरीर शिक्षणाचे पण त्याचा आत्मा म्हणजे गोष्टी,गाणी,कविता,संगीत आणि गमती जमती!!
‘मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं,शरीराशी नाही’ ह्याची रवींद्रनाथांना जाणीव होती.
मुले गोष्टी वाचत, कविता- गाणी म्हणत,गमती जमती करत नकळत कधी शिकली हे त्या मुलांना कळतच नसे. (संदर्भ : सहज पाठ.)
रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या ‘सहज पाठ’ ह्या तीन पुस्तिका लिहिल्या (आधी तिसरा भाग लिहिला,मग दुसरा व पहिला) त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून!!
‘करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे’ असा रवींद्रनाथांचा दृष्टीकोन होता.
आम्ही बालसाहित्यिक ह्या पासून काही धडा घेणार का?
साहित्य ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातील एक आहे,’जे हितकारी आहे ते.’ दुसरा अर्थ आहे,’सोबत करणारा किंवा सोबत चालणारा.’
आजपर्यंत अनेक बालसाहित्यिक हे एकतर मुलांना आशीर्वाद देण्याच्या किंवा त्यांना शिकविण्याच्या भूमिकेतून तरी लिहित होते किंवा आत्ममग्न असल्याने आपल्याच मस्तीत लिहित होते! पर्यायाने ते सारे मुलांच्या भावविश्वापासून अनेक योजने दूर गेले होते!! मी देणारा आणि आणि मुले घेणारी,ह्या असल्या लेखकाच्या भूमिकेतून कधी चांगले बालसाहित्य निर्माण होत नाही व माझीच ‘लेखन मस्ती सही!’ ह्या भूमिकेतून तर नाहीच नाही! कुठल्याही प्रकारची भूमिका घेऊन लिहिणं हे चांगल्या बालसाहित्याचं लक्षण असूच शकत नाही.
चांगल्या बालसाहित्याची जर लक्षणंच ठरवायची असतील तर असं म्हणता येईल की :
— लेखक आणि त्याचं साहित्य मुलांच्या भावविश्वाशी एकरुप झाले आहे का? म्हणजेच ते मुलांसोबत चालते का?
— त्या लेखकाची भाषा,मुलांना ‘आपली भाषा’ वाटते का?
— मुलांच्या परिसरात-भावविश्वात घडणाऱ्या घटना, मुलांचे आपापसातील मानवी संबंध-नाती हे सारं, तो लेखक मुलांच्या नजरेतूनच समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे का? आणि त्याच तळमळीने त्यावर काही भाष्य करतो आहे का?
— आणि सर्वान महत्वाचं म्हणजे, त्या लेखकाच्या ह्रदयातील मूल जागे आहे का? आणि तो लेखक ‘त्या मुलासाठी’ स्वत: मूल होऊन लिहितो आहे का?
जर ह्या सर्वच प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील तर ते खचितच चांगले बालसाहित्य असेल!!
मराठीतल्या प्रस्थापित साहित्यिकांनी मुलांसाठी ही लिहिले आहे. (पण काही सन्मानिय अपवाद वगळून) त्यांनी काही जाणीवपूर्वक प्रयोग केले आहेत, लेखनाचे वेगवेगळे फॉर्मस् हाताळले आहेत, विविध माध्यमांसाठी लेखन केलं आहे, आपल्या सोबत मुलांना घेऊन ते पुढे जात आहेत असे काही जाणवत नाही. वानगी दाखल निव्वळ कथा हा प्रकार जरी निवडला तरी मुलांसाठी संवाद कथा, रहस्य कथा, गूढ कथा, प्रवास कथा, विज्ञान कथा, परी कथा, फँटसी कथा, अक्षर कथा, चित्र कथा, विनोदी कथा, जंगल कथा, प्राणी कथा, साहस कथा, रुपक कथा, लोककथा, आठवणीतल्या कथा, व्यक्ती कथा….ही यादी खूप वाढविता येईल ही, प्रश्न असा आहे की, ‘आपल्या मुलांना मराठी साहित्यातील विविध प्रकार वाचायला मिळावेत ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे साहित्यिक, एका हाताच्या बोटंावर मोजता येतील इतके तरी आहेत का? आणि नसतील तर का नाहीत?’ मराठीत मुलांसाठी संख्यात्मक लेखन करणारे चिक्कार साहित्यिक आहेत. प्रश्न आहे गुणात्मक साहित्याचा!! विंदांची कविता आहे,’माकडाचे दुकान.’ त्यानंतर ह्या कवितेची नक्कल करत मग अनेक (महा) कवींनी पोपटाचे दुकान,कोल्हयाचे दुकान,गाढवाचे दुकान अशी आपापली दुकाने थाटली. हॅरी पॉटरला प्रसीध्दी मिळताच एका (महा संख्यात्मक) लेखकाने हरी पाटकर असे पुस्तक लिहिले. नकला केल्याने ह्या साहित्यिकांचं हसं तर होतंच पण वाईट ह्याचं वाटतं की, आपल्या मुलांना हिणकस दर्जाचं साहित्य मिळतं!! बालनाट्य,बालचित्रपट,एकांकीका,एकपात्रीका,द्विपात्रीका,नाट्यछटा,पपेट शो,निबंध हे तर आपल्या मुलांसाठी उपेक्षित साहित्य प्रकार! ह्याचा तर वेगळाच ताळेबंद मांडावा लागेल.
जेव्हा हॅरी पॉटरच्या पहिल्या पुस्तकाची तडाखेबंद विक्री होऊ लागली,एकाच पुस्तकाच्या दोन कोटी प्रती संपल्या तेव्हा सारेच हादरले! सगळ्यांचे सारेच आडाखे चुकले होते!! काहींना असं वाटत होतं की,’ही पुन्हा पुन्हा घडणारी घटना नसून केवळ मिडियाने घडवलेला हा एक चमत्कारच आहे.’ ‘एका बैठकीत मुले सातशे पानं वाचतात,ही लोणकढी थाप आहे!’
आपल्याच डबक्यात रमणाऱ्या आणि त्यालाच विश्व समजणाऱ्या काही बालसाहित्यिकांना असं वाटत होतं की,’ज्या अर्थी आपल्या साहित्याला मुलांकडून मागणी नाही त्याअर्थी संपूर्ण जगात अशीच परिस्थिती आहे.’
‘चोवीस तास काळा चष्मा लावून जग ओळखता येत नाही’ अशी एक चिनी म्हण आहे! हॅरी पॉटर हा काही निव्वळ चमत्कार नाही,हे जेव्हा सर्वांना समजू लागलं,त्याची ताकद जाणवू लागली तेव्हा ह्या मातीतली मुलेच विचारू लागली,’आपल्या भाषेत का नाही असा हॅरी पॉटर? केव्हा येणार?’ त्यावेळी सगळेच हडबडले!! आणि त्यावेळी दोन पंथ तयार झाले.
एक,जे हॅरी पॉटरची बालप्रियता आणि लोकप्रियतेचे रहस्य,त्याची शक्तीस्थाने ह्याचा कसोशिने शोध घेऊ लागले. दोन,ज्यांनी काळा चष्मा घातला होता ते विसरुनच गेले की तो आपला चष्मा आहे. त्यांना वाटू लागलं तेच आहेत आापले डोळे!! (ह्या दुसऱ्यंा विषयी लिहून मी माझा आणि तुमचा वेळ बरबाद करत नाही.)
हॅरी पॉटरची इमारत ‘टॉम अॅण्ड जेरी’ व ‘पॉकेमॉन’ च्या मजबूत पायावर भक्कम पणे उभी आहे. लहान मुले टॉम अॅण्ड जेरी अत्यंत आवडीने,तन्मयतेने पाहतात ह्याची चार प्रमुख कारणं असू शकतात. एक,टॉम अॅण्ड जेरी हे त्या मुलांसारखेच छोटे आहेत. त्या मुलांसारखेच ते खोडकर,व्रात्य व उपद्व्यापी आहेत.काही-काही वेळा ते हरतात पण बहुतेक वेळा त्यांचा विजयच होतो. टॉम अॅण्ड जेरी पाहणाऱ्या मुलांच्या बाबतीत सुध्दा काहीसं असंच होत असतं. फक्त फरक इतकाच की, काहीवेळा मुलांचा विजय हा मोठ्या माणसांच्या नजरेतून ‘पराजय’ असतो. दुसरं कारण म्हणजे टॉम अॅण्ड जेरी हे त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या प्राण्यांना कधीही त्रास देत नाहीत,सतावत नाहीत किंवा त्यांच्याशी झगडत नाहीत.
टॉम अॅण्ड जेरी हे नेहमीच त्यांच्यापेक्षा शक्तीवान,ताकदवान प्राण्यांशीच भांडतात झगडतात आणि ते ही खुलेआम त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याशी पंगा घेतात.
ह्यातली सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे टॉम अॅण्ड जेरी हे,त्या मोठ्या प्राण्यांच्या मागे-मागे कधीही धावत नाहीत,त्यांची कधी समजूत काढत नाहीत किंवा त्यांना कुठल्या ही विनवण्या करत नाहीत. पण टॉम अॅण्ड जेरी असे काही उद्योग करतात किंवा त्या मोठ्या प्राण्यांच्या अशा काही खोड्या काढतात की त्या मोठ्या अवाढव्य प्राण्यांना,नाईलाजाने त्या छोट्यांच्या मागे धावावं लागतं! आणि हे छोटे हाती न आल्याने त्यांच्या हुशारीला,त्यांना दाद पण द्यावी लागते. प्रत्येक मुलाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यात ‘अगदी असंच व्हावं’ असं वाटत असतं!! आपलीच स्वप्नं तो पडद्यावर पाहात असतो. तीसरं कारण अगदी साधं व सरळ आहे. पुढचा प्राणी कितीही मोठा असला,ताकदवान असला तरीही त्याच्यावर मात करण्यासाठी हे टॉम अॅण्ड जेरी आपल्या अक्कल हुशारीचाच उपयोग करतात. त्यांच्या समोरचा प्रसंग कितीही कठीण असो,प्रचंड मोठे संकट समोर असो अशावेळी टॉम अॅण्ड जेरी कधीही वाइट मार्गांचा उपयोग करत नाहीत. लबाडि करत नाहीत. ते त्या संकटातून सहीसलामत सुटतात ते आपल्या हूशारीनेच!! ह्यामुळे मुलांना सहजच जाणवतंतं की ‘कुठलीही समस्या जरी असली तरी त्यातून आपण हुशारीने नक्कीच मार्ग काढू शकू!!’ चवथं कारण हे सापेक्ष आहे. खूप मुले कार्टून पाहताना अतिशय तन्मय होतात, आजूबाजूच्या जगाचे त्यांना भानच राहात नाही. घरातल्या,शाळेतल्या ताण तणावापासून थोडावेळ तरी मुक्ती मिळावी म्हणून मुलांनी शोधलेला हा उपाय असू शकतो.
टॉम अॅण्ड जेरी पाहणाऱ्यांचा गट जिथे संपतो बहुधा तिथूनच पॉकेमॉन पाहणाऱ्यांचा गट सुरू होतो.
ह्या दोन प्रकारात एक महत्वपूर्ण फरक आहे. टॉम अॅण्ड जेरी कुठलेही काम करू शकतात! आणि ते कशाला ही घाबरत नाहीत. उदा. आग,पाणी,वादळ,वीज इ.
पण प्रत्येक पॉकेमॉनची जशी बलस्थानं वेगवेगळी आहेत तशी त्यांची काही कमकुवत स्थानं पण आहेत. उदा. एका पॉकेमॉनचं आग हे बलस्थान असेल तर तो वादळाला घाबरत असतो. दुसरा वादळांचा बादशहा असतो पण आग पाहताच त्या लोळागोळा होतो. पॉकेमॉनची आणखी एक खासियत म्हणजे,ते मुलांप्रमाणे विकसित होत जातात.
ह्यामधे जादू आहे,रहस्य आहे! खरं तर ही एक अनोखी फँटसी आहे. आणि ह्या फँटसीतला हा पॉकेमॉन बिलकूल मुलांसारखाच आहे!! ‘तुम्ही कार्टून पाहता का?ठ असा प्रश्न जर मोठ्या माणसांना विचारला तर फारच कमी जणं त्याचं उत्तर ‘हो’ असं देतील. बाकीचे फक्त नाकं मुरडतील. ह्याचं मुख्य कारण म्हणजे, कार्टून फिल्ममधे घडणाऱ्या घटनांचा वेग इतका भन्नाट असतो की, ‘पुढच्या क्षणी काय होईल ह्याचा तर्क करणे,मोठ्या माणसांसाठी केवळ अशक्य असते!’ पण हीच गोष्ट लहान मुलांसाठी सहज शक्य असते!!
ह्याची पण दोन कारणं आहेत.
एक,एखाद्या घटनेचाचा वेध घेत आणि त्यासोबत विविध अंगांनी पण सुसंगतपणे त्याबाबत विचार करण्याची गती ही मोठ्यांपेक्षा लहान मुलांची अधिक असते. किंबहुना वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीशी चटकन समायोजन साधण्याची कला मुलानाच चांगली अवगत असते. दोन,अपेक्षित शेवटाची अपेक्षा करणारी माणसं,कार्टून पाहू शकत नाहीत. अशा माणसांना ‘क’ पासून सुरू होणाऱ्या मालिका अधिक आवडतात. मोठ्यांच्या मानाने मुलांच्या मनात विशिष्ट घटनांबाबत पूर्वग्रह फारच कमी असतात त्यामुळे साहजीकच त्यंाच्या अपेक्षा ही कमी असतात. मुले गोष्टींना म्हणजेच घटनांना साक्षी राहतात, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय ती घटना समजून घेण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत असतात. खरं सांगायचं तर हीच मुलांची सहजता असते! हॅरी पॉटरमधे हे तर सारं आहेच पण त्याशिवाय आणखी ही अशा काही खुबी आहेत ज्यामुळे सारे चक्रावून जातात. कुठल्याही कथेचा किंवा कादंबरीचा प्लॉट म्हणजे त्याचं शरीर आणि कथाबीज म्हणजे त्याचा आत्मा. हॅरी पॉटरची खासियत म्हणजे,त्याचा प्लॉट हा वास्तवाशी,मुलांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे पण त्याचं कथाबीज ही एक अफलातून फँटसी आहे!! हे अनोखं रसायनंच मुलांना पागल करुन टाकतं.
कारण,फँटसी आणि वास्तव ह्यातील सीमारेषा ओळखण्याची व इथून तिथे जाण्याची संधी कथालेखीका मुलांना कथेतच देत आहे. हे ह्या लेखीकेचे सर्वात मोठे बलस्थान आहे!
जगातल्या कुठल्याही मुलाच्या शाळेचे प्रतिबिंब आपल्याला हॅगवॉर्डच्या जादू शाळेत पडलेले दिसते. किंबहुना ही हॅगवॉर्डची शाळा प्रत्येक मुलाच्या शाळेचं प्रतिनिधीत्व करते! तरीही ही शाळा जादू शिकविणारी आणि फँटसी मधली आहे हे विशेष!! गंमत म्हणजे अशा शाळेत घडणाऱ्या घटना,शाळेतील मुलांचे आपापसातील नाते संबंध हे मुलांच्या भावविश्वाशी निगडीत आहेत,मग तो मुलगा जगात कुठेही राहात असो. हॅरी पॉटर हे केवळ स्वप्नरंजन नाही किंवा पलायनवाद पण नाही तर ही एक वैश्विक सदाबहार साहित्यकृती आहे!!
एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,’मुलांसाठी सहज सोपं लिहिणं, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता स्वच्छं सकारात्मक दृष्टीकोनातून लिहिणं आणि हे लेखन मुलांच्या भावविश्वाशी त्यांच्या रोजच्या जगण्याशी नुसतं संबंधित नाही तर त्यात मिसळून जाणारं असणं…हे सर्वार्थाने कठीण काम आहे!! कठीण आहे कारण,एखादी घटना आपण समजून घेणं आणि त्या घटनेचा मुलाने त्याच्या नजरेतून अन्वयार्थ लावणं ह्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मुलांच्या नजरेतून एखादी गोष्ट पाहणं,त्यांच्या मानसिकतेचा विचार करुन ती समजून घेणं किंबहुना पूर्णत: बालकेंद्री विचार करण्याची ताकद सर्वांजवळ नसते, कठोर परिश्रम करुन ती कमवावी लागते. पण, ही शक्ती प्राप्त झाल्यानंतर त्याविषयी मनात जरा जरी इगो निर्माण झाला,त्याबाबत इवलासा जरी गर्व झाला तरी,प्रचंड परिश्रमाने कमावलेली ही शक्ती क्षणात विरघळून जाते…. …….आणि त्याक्षणी तो लेखक मुलांपासून खूप लांब निघून जातो!! पण जो बालसाहित्यिक आपण कमावलेल्या शक्तीची पुन्हा पुन्हा ‘लिटमस टेस्ट’ करण्याची हिंमत दाखवतो व रिझल्ट नकारात्मक येईल अशी पुसटशी शंका जरी आली तरी तो स्वत:त सकारात्मक बदल घडवून आणतो; तोच खरा बालसाहित्यक.
ही ‘लिटमस टेस्ट’ अगदी सोपी आहे.
मुलांसाठी काम करणारी, त्यांच्यासाठी लेखन करणारी मोठी माणसं कधीच एकटी एकलकोंडी नसतात. त्यांच्या ह्रदयातलं मूल सदैव जागं असतं, सजग असतं, नवनवीन गोष्टी शिकून घ्यायला उत्सुक असतं. आणि ती मोठी माणसं ‘त्या आतल्या मुलाला’ साक्षी ठेवून समोरच्या मुलांसाठी काम करत असतात, लिहित असतात. जेव्हा कुणी अनोळखी मुलगा ह्या मोठ्या माणसांना भेटतो तेव्हा तो ‘त्या आतल्या मुलाला’ ओळखतो, ‘त्याला’ साद घालतो व ‘त्याची ओळख पटली की’ तो अनोळखी मुलगा ‘त्याच्याशी’ बोलू लागतो,मैत्री करतो……त्या मोठ्या माणसाच्या माध्यमातून !!
तुम्ही अशी “लिटमस टेस्ट” कधी अनुभवली आहे का?
तुमची लिटमस टेस्ट एखादवेळेस वेगळी असेल किंवा त्याचे रिझल्ट ही वेगळे असतील. पण लिटमस टेस्ट करण्याची हिंमत दाखविणार्या मित्रांशी मैत्री करायला मला आवडेल.
— राजीव तांबे
Leave a Reply