त्यादिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून जरा तावातावानेच आलो. दिवसभर प्रामाणिकपणे काम करून साला! साहेबाला त्याचं काहीच नाही म्हणजे काय? काल न सांगता रजा घेतली म्हणून टकल्याने अगदी रामादेखत माझी बिनपाण्याने केली. काल एका महत्वाच्या शोधमंडळात आमची नियुक्ती झाली होती हे त्याला सांगून काय उपयोग? घरी येऊन डबा स्टॅन्डवर आदळल्यावर जरा मोकळे मोकळे वाटले. इतक्यात ही म्हणाली‚ “काय झालं‚ बरं नाही का वाटत?”
“बरं न वाटायला काय रोग लागलाय मला?”
“अहो‚ काहीतरीच काय बोलताय अभद्रासारखं?”
आमच्या बिल्डींगमधल्या बर्व्याची कारटी काल कुणाबरोबर तरी पळून गेली होती आणि तिचा आम्ही शोध करत होतो हे त्या थेरडयाला काय माहित? पंधरा वर्षात शेकडो रजा मी कंपनीला कर्णासारखा उदार होऊन दान केल्या आहेत आणि म्हणतो कसा “तुम्ही तुमच्या रजा अशा न सांगताच घेता!” आणि हा बर्वे तर एक नंबरचा ठोंब्या आहे नुसता! फक्त कंपनीचे दौरे करत असतो. वर ह्याच्या मुली आमच्याच असल्याप्रमाणे हक्काने “जरा लक्ष ठेवा मुलींच्यावर!” म्हणून सांगतो. कारटया तर अशा आहेत‚ कुणाचं ऐकतील तर शपथ! या सुमीमुळे काल रजा पडली आणि रात्री निर्लज्जासारखी हसत आमच्याच घरी डोसे द्यायला आली. कुठल्या मैत्रीणीचा वाढदिवस होता म्हणे तिच्या! तिकडे टळली होती. मैत्रीणीचा कुठला असतोय? रात्री ते डोसे खाल्ले आणि दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये साहेबांचे डोस!
“तुम्ही न सांगता रजा घेतल्यामुळे कंपनीचे केवढे नुकसान झाले माहित आहे का?”
मी न सांगता रजा घेतो त्यादिवशी कंपनीचे केवढे तरी नुकसान होते आणि रोज येतो त्याचे काही नाही. “ऑफिसमधले सगळेजण दगड आहेत नुसते. खायला कार आणि ऑफिसला भार!” असे हा साहेब नेहमी ऐकवतो.
“पण तुम्हांला रजा घेतोय म्हणून सांगायला काय झालं होतं?”
आता ही कारटी कुणाबरोबर तरी पळून जाणार आहे हे माहित असतं‚ तर पळून जाण्याआधी त्या पुरूषाचा मी सत्कार नसता काय केला? डोक्यावरचे एक टेन्शन कमी केलं म्हणून!
नको तेव्हा लाईट जाणे‚ वेळीअवेळी पंखे बंद पडणे हे आमच्याच घराचे वैशिष्ठय. रात्री झोपताना लाईट बंद करावी तर पंखा बंद होऊन उकाडयाने जीव हैराण होतो आणि दिवसा पंखा चालू करावा तर घरातल्या हॉलमधल्या दोन टयुबा एखाद्या तरूणीने पापण्यांची नाजूक फडफड करावी तशा करू लागतात. पंखा आणि लाईटच्या बटनांची अशा प्रकारची व्यवस्था फक्त आमच्याच घरी असते. लाईट गेल्यामुळे फारच उकडतंय म्हणून उघडा होऊन दारासमोर उभा राहिलो‚ इतक्यात एक लठ्ठ गृहस्थ “साले भिकारीसुध्दा आता बिल्डींगमध्ये घुसू लागलेत!” म्हणून माझ्या हातावर आठ आण्याचे नाणे टेकवून गेले.
“अहोऽ तुम्ही मला काय भिकारी समजता काय? छया! काय वैताग आहे‚ स्वत:च्या घरापुढं उभं रहायचीसुध्दा चोरी झाली आहे आजकाल!”
“अहोऽ एक उघडाबंब वेडा घुसलाय बघा या बिल्डींगमध्ये—” असे ओरडत तो म्हातारा धाडधाड करत खालच्या मजल्याकडे गेला.
“हं! ऑफिसमध्ये ती बोंब आणि आत गरम होतंय म्हणून जरा बाहेर आलो तर ही बोंब. सगळे म्हातारे म्हणजे एका माळेचे मनी आहेत नुसते!” एवढयात तिचा आवाज कानावर आला.
“अहो ऐकलं का?”
हिचं आपलं मी घरात असलो की नेहमीच हे चालू असतं. “अहो ऐकलं का?” हे विचारण्याआधी ती काही ऐकवते असंही नाही. “बाजारात चांगली मटार आली आहे‚ पोरांच्या फिया भरायच्या आहेत शाळेत‚ मामा मेंटेनंस मागायला आज आले होते!” हे तिचे उद्गार आमच्या वैतागलेल्या “काय आहे?” नंतर असतात. मला ऐकूच आले नाही अशी तिची समजूत झाली.
“अहो ऐकलं का?”
“आता तुझं आणखी काय आहे?”
“पोयरेकरांच्या सूनीताला आज एक स्थळ आलं होतं. नवरा बँकेत मॅनेजर आहे म्हणे!”
“हो! मॅनेजर हा बँकेचा कोण असतो हे ठाऊक आहे का तुला?”
“हो‚ हो. ठाऊकाय!”
“आणि सूनीची शाळा कितवी झाली आहे? दहावी फेल. आणि नवरा म्हणे बँक मॅनेजर!”
“नशीब असतं हो एकेकांचं. आणि आमचं पण आहेच की!” ही रूसल्यामुळे आम्हांला पडती बाजू घ्यावी लागली.
“अगं‚ तो बँकेत असेल. पण मॅनेजर कुठला असतोय? दहावी फेल पोरीला पास करणारा माणूस बँकेत मॅनेजर असतो काय? शिपाई बिपाई असेल एखादा -”
“पण पोयरेकर म्हणत होते बँकेत मॅनेजर आहे म्हणून!”
“काय करायचंय त्यांच्याशी आपल्याला? जरा माझ्याकडे बघ‚ ह्या पोरांकडे बघ. भूक लागली आहे आम्हांला. जरा काही खायला देशील तर बरं होईल!”
“अगंबाई! विसरलेच की मी. आत्ताच शिरा करून ठेवलाय. मनेऽ ह्यांना आणि बंडयाला शिरा दे बघूऽ आणि तु पण घे गं—”
बर्याच पक्वान्नांपैकी शिरा हे एक माझे आवडते पक्वान्न आहे. त्यामुळे बर्याचवेळा असंही घडतं की मी ऑफिस सुटल्यावर गरम गरम शिर्याची प्लेट संपवतानाची स्वप्ने बघत घरी येतो आणि नेमका त्याचदिवशी शिरा तयार नसतो.
“करू का आता?” ही विचारते.
“नको काही. तयार करून ठेवायला काय झालं होतं? माहित आहे ना माझी घरी यायची वेळ काय आहे ती?”
हल्ली मी वेळेवर घरी येतो. पूर्वी कामाचा भार जास्त असल्यामुळे घरी यायला आठ वाजायचे. त्यावेळी ही मला टोमणे मारायची.
“ऑफिस पाचला सुटतं म्हटलं!” ही माझ्याशी प्रत्यक्षात बोलत नाही. फक्त आम्हांला ऐकू येईल असं स्वत:शीच मोठमोठयाने बडबडत असते. तरीही मी गप्प बसायचो आणि ही जास्तच चिडायची.
“कारटयांची शाळा पण पाचलाच सुटते. त्यांनाही आणायला आम्हीच जायचं!” शिपाई शाळा सुटल्यावर जसा घंटेचा टोल देतो तसा पातेल्याचा एक टोल आमच्या स्टॅन्डवर बसतो.
“जरा हळू. पातेलं फुटेल!”
दोन्हीही पोरं एवढी मोठी झालेत तरीही त्यांना सोडायला आणि आणायला शाळेत जावे लागते. ते काम मात्र रोज हिच करते. उगीच खोटं का बोला? वर्षातून क्वचितच मी त्यांच्या शाळेचं तोंड बघायला जातो. शाळा सुटण्याआधी बाहेरच्या आवारात पालकांची एवढी गर्दी असते‚ की शाळा मुलांची आहे की पालकांची आहे ते कळता कळत नाही. शाळा सुटल्यावर मुलांत पालक – पालकांत मुले असा जो काही हल्लकल्लोळ नावाचा प्रकार होतो तसा हल्लकल्लोळ पानिपतच्या रणसंग्रामातसुध्दा जाहला नसेल. एकदा मी तर त्या गोंधळात बंडयाच म्हणून दुसर्याच एकाचा हात धरला आणि ओढतोय आपला त्याला! कारटं मागं का ओढ काढतंय ते मला कळत नव्हतं. नशीब! त्याच्या पालकिणीने बघितले नाही. नाहीतर मला पोलिसांनी चौकीवर तसाच ओढत नेला असता. शाळा सुटल्यावर मैदानातल्या एका बाजूला उभा राहून निरनिराळी वाक्ये ऐकावीत.
“तो बघ आला आपला सोन्या!”
“ती गुलाबी काडयांच्या फ्रॉकमधली कारटी आहे ना, तीच ती. आमचा विकी दोनवेळा एसेस्सीत गेला होऽ”
“पिंटू, तुला चॉकलेट हवं का?”
“मम्मी, आपल्या घरी प्रणिताच्या घरी आणलंय तसलं कुत्रं केव्हा आणायचं?”
“आणायच्य हंऽ शोन्या!”
तसल्यात एखादा सरकारी आवाजही येतो‚ “मुलांचे दफ्तर अजून कमी करायला पाहिजे. पण रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ना -”
“मला किनईऽ ब्युटी पार्लरमध्ये जायचं होतं. पण आमच्या बंटीला बाई माझा लळाच फार. मी घ्यायला आल्याशिवाय घरी येतच नाही!”
“बाऽय आशूऽ”
आणि आमची वाक्ये –
“चल कारटे‚ तुला घरात गेल्यावर सांगतो. तू आणि ह्या बंडयानं उच्छाद मांडलाय नुसता घरात. जरा कुठे दुर्लक्ष झालं की साखरेची नाहीतर शेंगदाण्याची बरणी फुटलीच!”
घरातले भविष्य डोळयांसमोर आल्यामुळे की काय दोघंही बिचारी अपराध्यासारखी गप्प बसतात. आणि मलाही आपण ह्यांना उगीचच असे बोललो याची जाणीव होते. त्यादिवशी दोघांबरोबर गाडयावर मीही आईस्क्रिम खातो. कितीजरी केलं तरी आमचीच मुलं आहेत ती!
मी अजूनही काही बोलत नाही हे बघून स्टॅन्डवर अजून दोनतीन भांडी आदळतात.
“हो‚ हो. ऐकू येतंय. ऑफिसमध्ये काम करतो आम्ही!”
“शेजार्यांची पण ऑफिसं आहेत. त्यांची पाचलाच सुटतात. ह्यांचंच ऑफिस एक जगावेगळं झालंय मेलं!”
आधी असे प्रकार असायचे. आता वेळेवर येऊन शिरा तयार नसला की आमची बाजू वरचढ असते.
“अहो, बंडया आणि मनीला शाळेतून आणायला गेले होते ना, म्हणून उशिर झाला थोडा!” कधी कधी असेही स्पष्टीकरण मिळते.
“एवढ्यात पेंडसेबाई आल्या, त्यांच्याशी थोडं बोलले. मग कुठल्या काकू गाठ पडल्या, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. नंतर शांताबाई आल्या, त्यांच्याशी बाजारभावाची चर्चा केली. असंच ना? मग घरची वेळ कशी लक्षात राहील?”
मी न थांबता एवढे सगळे बोलल्यामुळे हिला मूड बदलावा लागला.
“इश्श! रागावलात तुम्ही माझ्यावर?”
“नाही. तुझ्यावर कशाला रागवेन गं? शेजार्यांवर रागवायची हूक्की आलेय जरा!”
“थांबा. मी पाचच मिनीटांत गरमागरम शिरा करून आणते!”
“काही नको मला शिरा अन् फिरा!”
माझ्या या सुचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून एव्हाना ती किचनमध्ये घुसतेही. एवढंच नाही, तर पाचच मिनीटांत स्वप्नातली वाफाळणारी शिर्याची प्लेट पुढ्यात येते. एवढ्या झटपट जर ही स्वयंपाक करत असेल, तर इतरवेळी तीन तीन तास किचनमध्ये वेगवेगळे साऊंड इफेक्ट काढत ही काय गोंधळ घालत असते देव जाणे!
…
© विजय माने, ठाणे
आपण माझ्या इतर कथा आणि लेख खालील लिंकवर वाचू शकता.
https://vijaymane.blog/
Leave a Reply